श्रमप्रतिष्ठा

बाळासाहेब शिंदे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे.

पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल सुरू केले होते. या हायस्कूलचा मी विद्यार्थी, विशेष म्हणजे गावकऱ्यांनी या हायस्कूलला 8-10 एकर शेती बक्षीस दिलेली.

कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे.

पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल सुरू केले होते. या हायस्कूलचा मी विद्यार्थी, विशेष म्हणजे गावकऱ्यांनी या हायस्कूलला 8-10 एकर शेती बक्षीस दिलेली.

इयत्ता नववीचे पेपर्स संपले होते. एक दिवस सय्यदभाई नावाचे गावातील पोस्टात काम करणारे रनर-कम-पोस्टमन मला भेटले. त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, "मी 15 एप्रिल ते जून 15 पर्यंत 2 महिने रजेवर जाणार आहे. तेव्हा दोन महिने तू "रनर'चे काम करशील का? त्यांना म्हटले, ""का बुवा तुम्ही कुठे निघालात? आजारी तर नाहीत ना? तेव्हा ते म्हणाले, "सध्या आंब्याचा सीझन सुरू होतो आहे. मी वाई, सातारकडून आंबे आणून विकणार. तुझी परीक्षा संपली आहे. रोज सकाळी 10 वाजता सायकलीवरून पाच किलोमीटरवरील धर्मपुराच्या एसटी स्टॅंडवर जायचे. पोस्टाची बॅग घेऊन यायची. पोस्टात द्यायची व 4/2 पत्रे असतात ती वाटायची. बस्स! झालं काम.''

या कामाची मला गंमत वाटली. शिवाय 80 रुपये महिना पगार असे. दोन महिन्यांचे 160 रुपये मिळणार. मी घरून परवानगी काढली आणि दुसऱ्या दिवसांपासून रनर-कम-पोस्टमन या हंगामी पदावर रुजू झालो. ही माझ्या आयुष्यातील पहिली नोकरी असल्याने उत्साह जबरदस्त! मी बारा रुपये महिना भाड्याची सायकल घेऊन तयार झालो. मी वेळेत धर्मपुरी एसटी स्टॅंडवर पोचायचो. 10 वाजता पंढरपूर-अणे गाडीने आलेली बॅग घ्यायची. 11 वाजता शिंदेवाडीत यायचे. अर्ध्या तासात पत्रे वाटून रिकामा व्हायचो. दिवसभर शेळ्या राखायचे काम.

एके दिवशी माझी सायकल पंक्‍चर झाली. 2 ते 2.5 किलोमीटर पळत धर्मपुरी एसटी स्टॅंड गाठले. स्टॅंडवर सव्वादहाला पोचलो. एसटीची वाट पाहिली. इकडे-तिकडे चौकशी केली. काही समजेना. शेवटी 2 तासांनी मी 7-8 किलोमीटर अंतरावरील नातेपुते इथल्या पोस्टात गेलो. ते म्हणाले गाडी वेळेवर होती. एसटीच्या नेहमीच्या गाडीत पोस्टाची बॅग टाकली. मग फलटणला फोन लावला. तेथे समजले बॅग धर्मपुरी एसटी स्टॅंडला दिली. मला 10 मिनिटे उशीर झाल्यामुळे हे सगळे रामायण घडले. नंतर पोलिस तक्रार केली. पोलिसांना बरोबर घेऊन धर्मपुरी एसटी स्टॅंडवर आलो. तपास करता कोणी एका हॉटेलमधल्या पोराने ती बॅग घेतली होती आणि तो आजारी होता म्हणून तो डॉक्‍टरकडे गेला होता. विशेष म्हणजे त्या बॅगेत 50/50 रुपयांच्या 2 मनीऑर्डर होत्या. त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त. त्या काळात पोस्टाच्या बॅगेतून या मनीऑर्डरच्या रकमा पाठवत.

इकडे शिंदेवाडीत मी वेळेवर न पोचल्यामुळे गोंधळ सुरू होता. घरी शेळ्यांनी ओरडून धिंगाणा केला होता. शेजाऱ्यांनी त्यांना गवत देऊन पाणी पाजले. पोस्टातले तांबोळी गुरुजी तणावात होते. शेवटी या सगळ्या रामायणानंतर संध्याकाळी 5 वाजता शिंदेवाडीत पोचलो. कडाक्‍याची भूक लागली होती. अगोदर जेवलो. नंतर पोस्टाचे काम केले. महिन्याच्या अखेरीला तेव्हा मला पगारातचे पैसे मिळाले. तेव्हा हा माझा कष्टाने मिळवलेला पहिला पगार होता. त्याचा मला सार्थ अभिमान व अवर्णनीय आनंद होत होता. याच पगारातून मी बारामतीच्या जुन्या बाजारातून इयत्ता दहावीची पुस्तके-वह्या शालेय साहित्य खरेदी केले. तसेच शालेय गणवेशही घेतला. कोण म्हणतो काम नाही? कामे शोधा ती नक्की मिळतात. फक्त त्यासाठी शोधकदृष्टी हवी! आणि कष्ट करण्याची तयारी हवी!
पुढील काळातही सुटीचा काळ कधीही मौजमजेत नाही घालवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb shinde write article in muktapeeth