स्पर्शाचे जग

कुमुद कदरकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

आयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते.

आयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते.

बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या जावळाला, गुलाबी तळव्यांना स्पर्श करताच गोड शिरशिरी आली. लहान मुले आई-वडिलांना स्पर्शज्ञानानेच ओळखतात ना? आईचा मायेने डोक्‍यावरून फिरणारा हात हवाहवासा वाटतो. स्पर्शाची दुनिया व अनुभूती न्यारीच असते. झाडांचा नवा लुसलुशीत पालवी स्पर्श, मोरपिसाचा मखमली जादुई स्पर्श, समुद्राच्या वाळूचा पायांना होणारा निसटता स्पर्श, अंगाशी लाडीक लगट करणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श, पहिल्या पावसाच्या थेंबांचा शिरशिरी स्पर्श, पाळीव प्राण्यांना केलेला आपुलकीचा स्पर्श जाणवत राहतो नंतरही किती तरी वेळ. मोगरा-चाफा यांसारख्या फुलांचा स्पर्श ओंजळच सुगंधी करून टाकतो जणू. मृगाच्या सरीचा धरणीला होणारा स्नान-स्पर्श तिला किती तृप्त करतो! नव्या पुस्तकांचा, वस्त्रांचा स्पर्श वेगळाच गंध देतो!

मित्राने पाठीवर मारलेली थाप, मुलगी सासरी जाताना थरथरणाऱ्या पित्याच्या कवेतली आश्‍वासकता, राखी बांधताना बहिणीची निर्व्याज्यता हवीशी असते. नववधूला सप्तपदी वेळी होणारा हवाहवासा व लाजरा स्पर्श, प्रियकराच्या मिठीतला अधीर स्पर्श, हे सारे स्पर्श वेगवेगळ्या पातळीवरचे आहेत, नाही का?
स्पर्श बोलके, अधीर मूक, आत्मीयतेचे असतात आणि विखारी, काटेरी, बोचरेही असतात. स्पर्शात ताकद असते. स्पर्श जादू घडवतो, रडवतो, डोळ्यांतून सांडत राहतो अन्‌ धीर, मायाही देतो.

पण, हल्ली संवाद, अगत्य जसे हरवत चालले; तसे माणूस स्पर्श करायचा विसरत चालला. टाळ्या देणे, थापट्या मारणे, जवळ घेणे या गोष्टी सभ्यपणाच्या नाहीत, असे मानले जाऊ लागले. प्रार्थनेत, सकारात्मकतेत जशी शक्ती आहे, तशी स्पर्शात शक्ती आहे. स्पर्श ही एक "हिलिंग थेरेपी' आहे; ज्यात मनाचे धागे प्रेमाने बांधण्याची शक्ती आहे. ईश्‍वराला साष्टांग नमस्कार घालताना किंवा एखाद्या समाधीवर डोके टेकवताना होणाऱ्या स्पर्शाने मन निवते अगदी! कृष्णाच्या पायाचा यमुनेला झालेला स्पर्श किती पावन असेल ना! वृद्ध आई-वडिलांच्या थरथरत्या हातांना व शरीराला आधार देणारा मुलांचा स्पर्श किती दिलासा देत असणार! त्या बालस्पर्शाने अचानक हा स्पर्शाचा आविष्कार प्रगट झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb shinde write article in muktapeeth