esakal | मन के हारे हार है, मन के जीते जीत’
sakal

बोलून बातमी शोधा

meditation_

नैराश्याची भावना येत असेल तर उत्साह वाढवणाऱ्या प्रसंगांची आठवण करावी. प्रथम काही वेळेला हे जाणीवपूर्वक करावे लागेल. मनाला तशीच सवय होण्यास पण वेळ लागत नाही. काही काळ गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत मग मनात राग, द्वेष किंवा नैराश्य येत नाही. प्रत्यक्षदर्शी रूपाने जरी राग येत नसला किंवा नकारात्मक विचार येत नसले तरी त्यांचे सूक्ष्म बीज मनात नेहमी असतात व वेळप्रसंगी परत वर येऊ शकतात. या भावनांचा समूळ नाश करायचा उपाय पण पतंजली सांगतात

मन के हारे हार है, मन के जीते जीत’

sakal_logo
By
डॉ. अनुपमा साठे

जगभरात लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याचे आपण रोजचं ऐकत आहोत. एका पाठोपाठ एक आत्महत्येचा घटना, छोट्या छोट्या कारणांवरून होणारी भांडणं, घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ व अन्य अशाच प्रकारच्या मनाला व्यथित करणाऱ्या बातम्या सर्व प्रकारच्या माध्यमांतून आपल्यापर्यंत येत आहेत. मानवतेवर आलेल्या वैश्विक संकटामुळे एकंदरीत सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती हतोत्साहित करणारी भासते. पण मनुष्य हा पृथ्वीतलावरचा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. त्याचाजवळ असं एक कमालीचं अस्त्र आहे ज्याचा भरवशावर तो कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. ते अस्त्र आहे त्याचं मन. कबीरजी म्हणतात, ‘मन के हारे हार है, मन के जीते जीत’. मग आपल्या मनाला आनंदी ठेवायचं कसं ?

मनात एकाच वेळेस दोन परस्पर विरोधी भावना राहू शकत नाही. नकारात्मक किंवा हानिकारक विचार घालवून लावायचे असतील तर सकारात्मक विचार मनात आणावे लागतील. परंतु, हे सांगायला जेवढं सोपं आहे, करायला तेवढंच कठीण. ही अवघड गोष्ट साध्य करण्याचे दोन मार्ग ज्ञानीजन सांगतात. पहिला आहे योग मार्ग. पतंजली त्यांच्या योगसूत्रात सांगतात

ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः (समाधी पद, १०)
प्रतिप्रसव अर्थात प्रसवाची विरुद्ध प्रतिक्रिया. नकारात्मक विचारांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांचा नाश करणे. हा प्रवास उलट दिशेने असतो. मनात राग, द्वेष तत्सम विचार येत असतील तर त्यांना परतवून लावणं फार कठीण असतं. समुद्रात येणाऱ्या मोठ्या लाटेसारखेच ते मनाचा ताबा घेतात. अशा वेळेस त्यांना काबीज करण्यास मनात दुसरी विरुद्ध भावनेची सकारात्मक लाट निर्माण करायची. उदाहरणार्थ राग येत असेल तर मनाला शांत करणाऱ्या किंवा आनंद देणाऱ्या एखाद्या घटनेचा विचार करावा.

नैराश्याची भावना येत असेल तर उत्साह वाढवणाऱ्या प्रसंगांची आठवण करावी. प्रथम काही वेळेला हे जाणीवपूर्वक करावे लागेल. मनाला तशीच सवय होण्यास पण वेळ लागत नाही. काही काळ गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत मग मनात राग, द्वेष किंवा नैराश्य येत नाही. प्रत्यक्षदर्शी रूपाने जरी राग येत नसला किंवा नकारात्मक विचार येत नसले तरी त्यांचे सूक्ष्म बीज मनात नेहमी असतात व वेळप्रसंगी परत वर येऊ शकतात. या भावनांचा समूळ नाश करायचा उपाय पण पतंजली सांगतात

ध्यानहेयास्तद् वृत्तयः(११)
ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते व ज्या वृत्ती घालवायला आधी महत्प्रयास करावा लागायचा त्या आता स्वयं बीजरूपात सुद्धा अस्तित्वात राहत नाही. वृत्ती अर्थात मनाचे विभिन्न क्रियाकलाप, मनाला स्थिर न होऊ देणाऱ्या भावना.
भगवान बुद्ध धम्मपदात म्हणतात, जलाशयातून बाहेर काढून जमिनीवर फेकलेल्या मासोळीप्रमाणे हे चित्त मराच्या (मायाच्या) बंधनातून सुटण्यासाठी तडफडत असते (३.३). निग्रह करण्यास कठीण, चपळ, जिकडे इच्छा असेल तिकडे जाणाऱ्या चित्ताचे नियंत्रण करणे चांगले. नियंत्रित मन सुखकारक असते.(३.४)

या वृत्ती काय आहेत ? एखाद्या शांत जलाशयात दगड फेकल्यास पाण्यावर जशा लहरी निर्माण होतात व सर्व पाणी ढवळून निघते तसेच मनातही लहरी निर्माण करून या वृत्ती मनाची शांतता घालवून लावतात. यात मुख्य आहेत राग, द्वेष, आसक्ती, घृणा व नैराश्य इत्यादी. या सर्व भावना मनावर नकळत खोलवर परिणाम करतात. एकवेळ राग आला तर नंतरही त्या घटनेच्या स्मृतीने परत तीच रागाची भावना उफाळून येते. हेच तथ्य द्वेष किंवा घृणा व अन्य नकारात्मक भावनांसाठी पण सत्य आहेत. दिवसभरात अशा अनेक घटना व त्यांचा स्मृतींमुळे आपलं मन कायम अस्वस्थच राहतं. म्हणून मन:शांतीसाठी या वृत्तींवर ताबा मिळवणे आवश्यक आहे.

दुसरा मार्ग आहे भक्तिमार्ग. भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला माहीत आहे. त्याची भगवान विष्णूंवर अनन्य भक्ती होती. वडील हिरण्यकश्यप यांनी त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, विष प्यायला लावलं, पर्वताच्या टोकावरून खाली ढकललं व होलिका समवेत जाळायचाही प्रयत्न केला. परंतु, मनात फक्त भगवान विष्णूची भक्ती असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही भावनेला त्याचा मनात यायची संधीच नव्हती. तो सदा हसतमुखच असायचा. एकनाथ महाराजांची गोष्टही सर्वांच्या परिचयाची आहे.

एकनाथ महाराज नदीतून स्नान करून येत असताना एक मनुष्य त्यांच्या
अंगावर थुंकला. ते काही न बोलता परत आंघोळ करून आले. त्या मनुष्याने परत तेच दुस्साहस केले व एकनाथ महाराज परत स्नानास गेले. असं एक दोन नाही, तब्बल एकशे आठ वेळा झालं. पण एकनाथ महाराजांच्या मनाला राग शिवला नाही !

मीराबाई, तुलसीदास, सूरदास, चैतन्य महाप्रभू अशी अनेकानेक उदाहरणं आहेत. त्यांच्या मनात राग, द्वेष, अहंकार या वृत्ती कधी आल्याच नाही कारण त्यांचं मन भक्तिभावनेने परिपूर्ण होतं. त्या परमशक्तीला संपूर्ण समर्पण केल्यावर मनातला अहंकारच नाहीसा होतो. सुख दुःख या सर्व भावना अहंकारजनित आहेत. जर अहंकारच नसला तर तो सुखावण्याचा किंवा दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्याही संत पुरुषाचे उदाहरण बघितले तर ते सदैव आनंदी असल्याचेच दिसून येते. त्यांना कधी नैराश्य आलेलं किंवा मनोविकारतज्ज्ञाची गरज पडलेली ऐकण्यात येत नाही. आपलं व परकं हा भेदभाव पण त्यांचा गावी नसतो. सर्व जगंच त्यांना आपलं वाटतं तर नकारात्मक भावना ठेवणार तरी कुणाच्या प्रति? त्यांचा जवळ कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी श्रद्धेची ताकद असते.

जसे आकाशाचे वेगवेगळे रूप आपल्याला दिसतात, कधी ते सूर्यप्रकाशात स्वच्छ असतं; कधी घनमेघांनी संपूर्ण आच्छादित; कधी वादळामुळे धूलिकणांनी गढूळ झालेलं; तर कधी धुरामुळे मळकट. आभाळ, पाऊस, वादळ, धूळ व धूर अशा अनेक वृत्ती आकाशात येतात व जातात पण त्याचा मूळ स्वभाव कायम अबाधित राहतो. तसेच आपले मन असले पाहिजे. ‘चिदाकाश’ ही उपमा म्हणूनच मनाला दिलेली आहे. चिदाकाश म्हणजे मनाचे आकाश. जसे आकाश त्यात येणाऱ्या विविध वृत्तीपासून निर्लिप्त राहतं तसेच मनाच्या आकाशानेही त्यात येणाऱ्या असंख्य वृत्तींपासून निर्लिप्त राहण्याची कला शिकली पाहिजे. ही शिकवण आपल्याला आपले ग्रंथ व स्वत:च्या उदाहरणाने संत पुरुष कायम देत आले आहेत. आपण स्वत:ला ती ग्रहण करण्यास समर्थ केलं पाहिजे.

loading image
go to top