मधमाश्‍यांचा हल्ला 

डॉ. राजश्री महाजनी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

काही कळायच्या आत मधमाश्‍यांनी चावायला सुरवात केली. काही वेळात त्यामुळे हातापायावर सूज आली. दुसऱ्या दिवशी गायनाची स्पर्धा असल्याने मला भीती वाटायला लागली. 

एसएनडीटी विद्यालयाच्या माझ्या विद्यार्थिदशेतील म्हणजे 1989मधील ही घटना आहे. मी संगीत विषयात एम.ए. करत होते. त्या वर्षी मुंबईला झालेल्या युवा महोत्सवातील मी शास्त्रीय संगीत स्पर्धेत यशस्वी होऊन उदयपूरला गेले. तिथे झालेल्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेत माझा क्रमांक आल्यामुळे मी आता राष्ट्रीय युवा स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशातील रुरकी येथे निवडले गेले होते. चिपळूणहून पुण्यात 3 वर्षे शिकायला आलेली मी अजून बाहेरगावी कुठेच न गेल्याने अगदी मुंबईपासून सर्वच नवखे, पण आनंददायक वातावरण अनुभवत होता.

आकाश अगदी ठेंगणे झाले होते. एवढी मोठी संधी मिळाल्याने (कै.) वीणाताई सहस्रबुद्धे, (कै.) शोभा गुर्जर, मालुताई ऊर्फ सुचेता बीडकर या सर्वच प्राध्यापिकांनी माझे कौतुक करत काही उपयुक्त सूचना केल्या. तब्बलजी मिराशी व मालुताई माझ्यासोबत जायचे ठरले. रुरकीला उत्तम व्यवस्था पाहून आनंद द्विगुणित झाला. आता इथे होणाऱ्या स्पर्धेत जिंकायचे आहे हा निश्‍चय व आत्मविश्‍वास बाळगून झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी उद्‌घाटन, भाषण व तिसऱ्या दिवशी विविध स्पर्धा असा कार्यक्रम होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाहनातून एका मैदानाकडे समारंभस्थळी नेण्यास सुरवात झाली. तेथे पोचत असतानाच आरडाओरडा, पळापळ, गोंधळ सुरू झाला. काय झाले असे विचारणार तोच एकदम सर्वत्र माश्‍या दिसू लागल्या. वाटेत येणाऱ्या लोकांना माश्‍या चावत होत्या. लोक सैरावैरा धावत होते. तेवढ्यात माझ्याही कपड्यांवर माश्‍या आल्या. प्रतिक्षिप्त क्रियेने मी हाकलताच मला हाताला, मानेला चावल्या. ओढणीवरील माश्‍या अजिबात जाईनात शेवटी मी ती रस्त्यात फेकून दिली व थोडी बाजूला झाले. मी रुमालही टाकून दिला. दरम्यान, ज्यांना चावल्या त्या बऱ्याच लोकांना उलट्या झाल्या. डॉक्‍टरांना बोलविले. सर्वांवर उपचार झाले.

थोड्या वेळाने सर्व शांत झाले आणि मग उद्‌घाटन झाले. माझ्यासारखे अनेक जण समदुःखी पाहून माझे दुःख हलके झाले. हाताला, मानेला रात्री सूज दिसली तेव्हा भीती वाटली की स्पर्धा कशी पार पाडायची म्हणून. पण नशीब व गुरुकृपासुद्धा, दुसऱ्या दिवशी सूज कमी झाली. घाबरायचे कारण नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता संगीत स्पर्धेला सुरवात झाली. 

तिथली कडक थंडी, मधमाश्‍यांचा हल्ला, स्पर्धेचा तणाव होता, तरीही आत्मविश्‍वासाने गायनाला सुरवात केली. मी बागेश्री राग गायले आणि सर्वांनी उत्स्फूर्त दाद दिली. निकाल जाहीर झाला त्यात उत्कृष्ट 4 जणींमध्ये माझी निवड झाली. सर्व संकटातून तावून सुलाखून बाहेर पडल्याचा मोठा आनंद झाला. तेथे सर्वांनीच कौतुक केले. परक्‍या ठिकाणी ऐनवेळी आलेल्या संकटास तोंड द्यायला आत्मविश्‍वास व गुरुकृपा फळाला आली हे निश्‍चित. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bees Attack Muktapeeth Article

टॅग्स