कार्बन एम. ए. 

Dr. Aruna  More
Dr. Aruna More

गेल्या सत्रातील परीक्षेची मी आमच्या महाविद्यालयात सिनियर सुपरवायझर होते. सर्वांना कॉपी न करण्याची, तसेच मोबाईल जवळ न बाळगण्याची सूचना देत फिरत असताना माझे लक्ष वर्गाच्या दाराबाहेर गेले. तिथे सर्वत्र गाईडस्‌चा, तयार नोटस्‌चा ढिगारा पडला होता. काही ठराविकच नोटस्‌ बुक होत्या. ते सर्व पाहात असताना माझे मन भूतकाळात गेले. आपण कशा प्रकारच्या नोटस्‌ काढत होतो, किती संदर्भ पुस्तके वापरत होतो हे सारे आठवले. तसेच त्या काळात गाईड वापरणे दुय्यम दर्जाचे मानले जायचे. त्यामुळेच एम. ए.साठी अविरत कष्ट घेतल्याचा चलत्‌पट डोळ्यांसमोरून जाऊ लागला.

मी पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात एम. ए. केले. मी, श्रुती भातखंडे आणि संजीवनी देशपांडे अशा आम्ही तिघी मैत्रिणी होतो. विद्यापीठातील डॉ. अ. रा. कुलकर्णी, डॉ. के. एन. चिटणीस, डॉ. अरविंद देशपांडे, डॉ. सुषमा वर्मा, डॉ. श्रीपती शास्त्री व डॉ. रेखा रानडे यांची कीर्ती ऐकून होतो. त्यांच्या इंग्रजीमधून शिकविण्यामुळे सुरवातीस आम्हाला अभ्यासाचे खूप दडपण येऊ लागले. आमचे मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने सुरवातीला महिनाभर आम्हाला फारसे काही समजतही नव्हते. आमची ही माध्यमाची अडचण जाणून रानडेबाई आम्हाला मराठी भाषेतील संदर्भ पुस्तकांची, सोप्या इंग्रजी पुस्तकांची नावे देत. त्या आम्हाला स. प. महाविद्यालयातही शिकवायला होत्या, त्यामुळे त्यांना आम्ही माहित होतो. देशपांडे सरही आम्हाला  समजून घेत. 

सत्र परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली होती आणि आता एवढ्या चार पेपरांचा अभ्यास एका महिन्यात कसा करायचा? आम्ही तिघींनी एक शक्कल लढविली. त्या वेळी प्रत्येक सत्रात चार पेपर होते व प्रत्येकी शंभर गुण होते. प्रत्येक विषयाचे वीस महत्त्वाचे प्रश्‍न असलेल्या प्रश्‍नपेढ्या मिळायच्या. आम्ही त्या प्रश्‍नपेढ्या घेऊन तिघींनी तीन विषय वाटून घेतले. प्रत्येकीने आपापल्या प्रश्‍नपेढीतील वीस प्रश्‍नांची उत्तरे आठ दिवसांत लिहून काढायची व लिहिताना कागदाच्या खाली एक कार्बन पेपर टाकून उत्तराच्या दोन कार्बन कॉपी काढायच्या. सर्व उत्तरे लिहून झाल्यावर स्वतःजवळ मूळ प्रत ठेवून उरलेल्या दोघींना कार्बन कॉपी द्यायच्या. उरलेल्या चौथ्या विषयाचे वीस प्रश्‍न तिघी जणींनी सात/सहा/सात या प्रमाणे वाटून कार्बन कॉपी काढायच्या. अशा रीतीने प्रत्येक सत्राला आम्ही असेच विषय वाटून घेतले आणि सोळा पेपरांचा चार सत्रांत सोळाशे गुणांचा अभ्यास केला. आम्हाला उत्तरांबद्दल काही शंका वाटल्यास त्या त्या मैत्रिणीला आम्ही विचारत असू. आमच्या तिघींचा असा घट्ट ग्रुप तयार झाल्याने आम्ही इतरांना फारसे काही सांगत नसू. पण आमच्या देशपांडे सरांना व कोपरगावचे इतिहास संशोधक डॉ. अभंग सर यांना एके दिवशी आमच्या या ‘अभ्यास पद्धती’बद्दल समजले व त्यांनी आम्हाला चिडवणे सुरू केले. ‘काय म्हणतंय तुमचं कार्बन एम.ए.!’ तोपर्यंत आमचे चौथे सत्रही पूर्ण झाले होते. पण त्यावेळी एक-एक प्रश्‍न परिपूर्ण व्हावा म्हणून तीन-तीन, चार-चार संदर्भ पुस्तके वाचावी लागायची. दिवसभर अकरा ते पाच जयकर ग्रंथालयात बसून संदर्भ पुस्तके शोधायची, वाचायची, रात्री जागरण करून नोटस्‌ काढायच्या, असा दिनक्रम होता. त्यामुळे खूप संदर्भ पुस्तके वाचून काढली होती. या अशा प्रकारच्या प्रामाणिक मेहनतीचा आणि कष्टाचा उपयोग व्याख्याता म्हणून निवड होताना, वर्गात शिकविताना झाला. विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी झाला. खरे तर या गोष्टीने आम्हाला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनविले आणि आमचे ‘कार्बन एम.ए.’ फक्त कार्बन न राहता त्याने आम्हाला इतिहास शिकण्याचा आणि शिकविण्याचा ऑक्‍सिजन पुरवला.

आजच्या इन्स्टंटच्या, रेडिमेडच्या जमान्यात १९७९ ते १९८२ या काळात आम्ही केलेला अभ्यास आज रेडिमेड नोटस वापरणारे, सदैव शार्टकटचा मार्ग अवलंबू पाहणारे नाही करू शकत. म्हणून केवळ परीक्षार्थी झालेले आणि परीक्षेच्या काळात रेडिमेड नोटस आणून महत्त्वाचे प्रश्‍न सांगा असे विद्यार्थी पाहिले की सात्विक संताप येतो. शेवटी ‘कालाय तस्मै नमः’ जग वेगाने धावतेय हेच खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com