लिंबाचे ते झाड...

छाया रसाळ
शनिवार, 9 जून 2018

काही आठवणी मनात कायमच्या घर करून राहिलेल्या असतात. मनाला कितीही बजावले तरी त्या पुसल्या जात नाहीत. त्या आठवणीत मायेचा ओलावा दडलेला असतो.

आठवणी...आठवणी या अशा का असतात. कधीतरी अचानक मनाला हेलावून जातात. नकळतं तशा या आठवणी येतात अन्‌ ओल्या थेंबात चिंब करून जातात. खरं तर माहेरी माझे वरचेवर जाणं-येणं असतं. पण या वेळेस जाणं जरा वेगळंच वाटत होतं. अस्वस्थता जाणवत होती. आज तो वाडा, ते लिंबाचे झाडं सारखं मनात येत होतं. एक वेगळीच ओढ वाटत होती.
सध्या तिथे कोणीच राहत नाही. सर्व जण नोकरी, व्यवसाय, शेतीच्या निमित्ताने परगावी गेलेले. तर शेतीवर काही जण राहायला गेलेले.

काही आठवणी मनात कायमच्या घर करून राहिलेल्या असतात. मनाला कितीही बजावले तरी त्या पुसल्या जात नाहीत. त्या आठवणीत मायेचा ओलावा दडलेला असतो.

आठवणी...आठवणी या अशा का असतात. कधीतरी अचानक मनाला हेलावून जातात. नकळतं तशा या आठवणी येतात अन्‌ ओल्या थेंबात चिंब करून जातात. खरं तर माहेरी माझे वरचेवर जाणं-येणं असतं. पण या वेळेस जाणं जरा वेगळंच वाटत होतं. अस्वस्थता जाणवत होती. आज तो वाडा, ते लिंबाचे झाडं सारखं मनात येत होतं. एक वेगळीच ओढ वाटत होती.
सध्या तिथे कोणीच राहत नाही. सर्व जण नोकरी, व्यवसाय, शेतीच्या निमित्ताने परगावी गेलेले. तर शेतीवर काही जण राहायला गेलेले.

मी आज गावाच्या बाहेरून न जाता वाड्याकडे जायचे आणि डोळे भरून पाहायचे ठरवले. जशी वेशीतून गाडी आत गेली तशी मनात कालवाकालव व्हायला लागली. समोर थोडं पुढे गेले तो उजव्या बाजूला तो हातपंप दिसला. ज्यावरून आम्ही पाणी भरायचो, नंबरला थांबायचो. सगळी वर्दळच वर्दळ तिथे असायची. पण आज तो कोरडा ठाक पडलेला दिसला. ना ती वर्दळ, ना त्या पंपाला पाणी, ना तिथे कोणी दिसले. तिथून पुढे गेले की आमची आळी, एकदम सरळ आणि आळीच्या शेवटी तो वाडा, ते लिंबाचं झाड अन्‌ फिरंगाईच मंदिर. माझी अस्वस्थता अजूनच वाढली. खूप भयानक शांतता वाटली. हिरव्या फांदीवर पाखरानं सहज उतरावं तसं मन अलगद या भयानक शांततेला धक्का देऊन भूतकाळात उतरलं.

वाड्यासमोरचे ते मोठे लिंबाचे झाड. जे गेली कित्येक वर्ष दिमाखात उभे आहे. माझ्या अगोदरच्या कितीतरी पिढ्या त्याच्या अंगा खांद्यावर खेळल्या असतील. त्याच्या बुंध्याला खूप मोठा चारी बाजूंनी साध्या दगड मातीचाच पार बांधला होता. ते लिंबाचं झाड त्या वाड्याची शान होतं. स्वतःचा वेगळा रुबाब होता. त्यांच्या बुंध्याजवळ शेंदूर लावलेला मुंजाबा छोटासाच शोभून दिसायचा. येणारा जाणार वाटसरू, फिरणारे विक्रेते त्या झाडाचा आधार घेत. आपली पथारी तेथे कधीतरी मांडायचे. नंतर परत दुसरे गावं.
सकाळी गावातील वयस्कर मंडळींची गप्पांची मैफल बसायची. सुखदुःख, चांगल्या वाईट बातम्या तिथेच तर कळायच्या. समोरच फिरंगाईच मंदिर, मातीचच पण प्रसन्न वाटायचं अन्‌ एका बाजूला तो 40 खणांचा वाडा. पहिल्या मोठ्या दरवाजातून पाहिले की सहा आतले दरवाजे व 2 चौक पार करून थेट मागची भिंत दिसायची. नवीन कोणी आले तर त्यांना ते एक मंदिरच वाटायचे. हो, खरंतर ते एक मंदिरच होते. एका प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या गोदावरी आजीचे. संध्याकाळी आजी वाड्याच्या ओट्यावर जप करत बसायची. कपाळावर मोठा बुक्‍क्‍याचा टिळा, डोक्‍यावर पदर, गोरीपान आजी अशी बसलेली रुबाबदार दिसायची. तिच्या साऱ्या सुखदुःखाला ते लिंबाचे झाड जणू साक्षीदार होते.

चिवचिवत्या मंजूळ आवाजांनी झाडाची पाने झंकारत असतं. सकाळी सकाळी निरागस पान अंगणात मनसोक्त रांगत असतं. त्याच झाडाच्या साक्षीने दोन अडीच हजार लोकांसमोर माझं लग्न झालं. ते सारं लोभस वातावरण सगळं काही आताच घडल्यासारखं डोळ्यांसमोर उभं राहिलं होतं. अचानक कोणीतरी मला हाक मारली आणि वास्तवात आले. ते सारं लोभस वातावरण आज कुठे आहे? लिंबाचं झाड पूर्ण वठलं आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. मुंजोबाचे मंदिर सिमेंटचे झाले. पण पूर्वीचा रुबाब नाही. भकास, भयानक वाटत होतं सगळं. वाडा पण सुन्न... वाड्यातील सर्व जण बाहेर गेले म्हणून तर त्या लिंबाच्या झाडाने हाय खाल्ली नसेल ना...? कदाचित...डोळ्यांतून टचकन पाणी गालावर ओघळलं. आज माझ्याच अंगणात मी पाहुणी झाले. आज तिथे ना आई, ना आजी, ना कोणी...कोणीच...ना त्या वाड्यात अन्‌ त्या झाडात प्राण...निष्प्राण सगळं.
नकळत मला ऐकलेल्या एका गाण्याच्या ओळी आठवल्या.
""सांजवळी यायचे राघू जिथे,
पिंपळाचे (लिंबाचे) ते झाड गेले कुठे...
ते ना अंगण, ते ना घरही राहिले,
हाक आईची निनादत राहिली...''
निनादत राहिली....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhaya rasal write article in muktapeeth