esakal | आईचा धाक
sakal

बोलून बातमी शोधा

आईचा धाक

आईचा धाक

sakal_logo
By
दयानंद खरात

तिचा साऱ्या घरादाराला धाक होता. तिच्यापुढे सारेच दबून असत, बोलणेही दबकत चाले. ती स्पष्ट आणि भीडभाड न ठेवता बोलत असे. मुलांनी शिकावं यावर तिचा कटाक्ष होता.

आमची सर्व खरात घराण्याची आई एकच होती. ती साहित्यिक शंकरराव खरातांची आई सावित्री. आम्हा सर्वांचीसुद्धा तीच आई होती. आम्ही खरात कुटुंबातील सर्व जण स्वतःच्या आईला तिच्या नावाने किंवा उपनावाने हाक मारत असू व आजीलाच फक्त "आई' म्हणत असू. शंकरराव माझे थोरले काका. त्यांनी "बारा बलुतेदार' व "तराळ अंतराळ' या पुस्तकांमध्ये आई व अण्णांवर खूप काही लिहिले आहे. त्यात शंकरराव म्हणतात, "आमचे वडील म्हणजे अण्णा शांत, मायाळू होते. आईचा घरात दरारा होता. आईचा शब्द अंतिम असायचा. आईला आम्ही सर्व जण घाबरत असू. आईचा स्वभाव स्वाभिमानी होता. घरात आई आहे म्हणजे निस्तब्ध शांतता राहायची. ती स्पष्ट बोलायची. कोणाची भाडभीड ठेवायची नाही.'

शंकरराव वकील होते, म्हणून आटपाडी गावात तिला वकिलाची आई किंवा पंचाची आई म्हणायचे. आईला खोटे बोलणे आवडत नव्हते. अन्याय सहन होत नव्हता. वावगे बोलणे खपत नव्हते. आपल्या घरात कोणीही लुडबूड करणे पसंद नव्हते. पूर्वी गावात पाटील, देशमुख पाहिला तर जोहार घालायची पद्धत होती. परंतु आईने कधीही जोहार घातला नाही. त्यामुळे गावातील सवर्ण लोक म्हणायचे, "साउबाई कधीही जोहार घालत नाही. तिचा मुलगा वकील झालाय ना.' पण खरे तर तिने शंकरराव वकील व्हायच्या आधीही कधी जोहार घातला नाही. तिला ते पसंतच नव्हते.
आमच्या आटपाडीच्या घरात आजूबाजूच्या स्त्रिया आमच्या घरात यायला घाबरायच्या. जर का चुकून आल्या तर आई त्यांना म्हणायची, ""तुम्हाला घरात काम न्हायत का? दुसऱ्यांच्या घरात येण्यापेक्षा स्वतःच्या पोरांवर लक्ष द्या. शाळा शिकवा पोरांना, दुसऱ्यांच्या घरात लुडबूड करू नका.'' आमच्या घरात शेजारच्या स्त्रियांना मज्जाव होता; मग पुरुषांची काय हिंमत होती!

मी लहान दोन वर्षांचा होतो, तेव्हा माझे मामा माझ्या आईला माहेरी नेण्यास आले होते. आटपाडीला दर शनिवारी बाजार भरतो. माझे वडील आबा बाजारात बसले होते. मामा आबांना म्हणाले, "हिराबाईंना माहेरला चार दिवसांसाठी घेऊन जातो.' तेव्हा मामाला आबा म्हणाले, "घरी जावा, माझ्या आईला विचारा व घेऊन जावा.' तेव्हा मामा म्हणाले, "तुम्हाला विचारले आहे. मग आईंना विचारण्याची आवश्‍यकता काय?' आबा फक्त हसले. संध्याकाळी मामाने आटपाडीत मुक्काम केला. सकाळी मामा व आई निघाले. मी आजीजवळ होतो. एसटी स्टॅंडवर गेलो. एसटीमध्ये मामा व आई बसले. दुसऱ्या दिवशी आई परत आली. मला आंघोळ-जेवण आजीच द्यायची.
हल्ली अनेकांच्या घरातील अवस्था आई-वडील अशिक्षित व मुले शिकलेली अशी आहे. मी जिल्हा परिषदेत नोकरी करीत असताना एका प्राथमिक शिक्षकाच्या घरी गेलो होतो. त्या वेळेस ते शिक्षक शाळेवर शिकवायला गेले होते. त्याच्या वडिलांना मी म्हणालो, "मोरे आहेत का?' तेव्हा ते म्हणाले, "खरातसाहेब, गुरुजी शाळेवर गेले आहेत.' मी थोडा दचकलो व म्हणालो, "शाळा कुठे आहे?' त्यावर ते म्हणाले, "शेजारीच आहे. आणतो बोलावून.' ते शाळेत गेले व मोरे यांना घेऊन आले. मला म्हणाले, "साहेब, "गुरुजी' आले.'

मला प्रश्‍न पडला, ही कुठली प्रथा आहे. वडील मुलाला नावाने हाक मारत नव्हते. "गुरुजी' म्हणत होते व त्याचे दुःख मुलाला नव्हते. स्वतःच्या मुलाला पोलिस झाल्यावर "हवालदार' म्हणू लागलेत. मास्तर म्हणू लागलेत. तलाठी झाल्यावर "तलाठी भाऊसाहेब' म्हणू लागलेत. आमची आई (आजी) दादांना म्हणजे शंकरराव खरातांना नेहमी "संकर' म्हणायची. माझ्या वडिलांना, ज्ञानेश्‍वर खरात यांना ते सरपंच असतानासुद्धा "देनू' म्हणायची. माझे धाकटे चुलते नेव्ही ऑफिसर होते, त्यांना मारुतीऐवजी "मारवती' म्हणायची! या शब्दांत माया, प्रेम आपुलकी होती, गोडवा होता.

वडील हे वडीलच असतात. तशी आईसुद्धा आईच असते. मुलगा किंवा नातू कितीही मोठे झाले तरी मुलगा मुलगाच असतो व बाप बापच असतो. हे नाते आपण जपायचे असते. आपले आई-वडील आपल्याला मास्तर, हवालदार म्हणत असतील तर त्यांची चूक नाही. मुलांनी त्यांना अशी हाक नका मारू, असे सांगायला हवे. मी कितीही मोठा झालो तरी तुमचा मुलगाच आहे. मला नावानेच हाक मारा.

आम्हाला आमच्या आईचा सार्थ अभिमान आहे. ती आम्हाला नावानेच हाक मारायची. आम्ही कितीही मोठे झालो, तरी आईची जागा तीच होती. आमची जागा तिच्या पायावर होती व या पुढेही राहणार!

loading image
go to top