आनंदाची संकल्‍पना आणि तिची व्‍याप्‍ती

किशोर कवठे kavathekishor@gmail,com
Thursday, 6 August 2020

परिवर्तनाची दिशा चक्राकार असते. मग ते निसर्गाचे असो की समाजाचे. नव्‍वदनंतर जागतिकीकरणाचा विचार समाजाच्‍या प्रत्‍येक घटकाला स्‍पर्शून गेला. गावांतून महानगरांकडे नव्‍यापिढीची वाटचाल सुरू झाली. गावं ओस पडत गेली. शहरं विस्‍तारली. गाव केवळ सणासुधीचं निमित्‍त राहिलं. पुढे-पुढे तोही प्रवाह आटत गेला. गावाच्‍या आनंदाला नव्‍या प्रवाहाचे ग्रहण लागले.

आनंदाची संकल्‍पना आणि तिची व्‍याप्‍ती व्यक्तिपरत्‍वे बदलत असते. सुख वैभवाची साधनं चार भिंतीत कोंबून असली तरी, खऱ्या जीवनाचा आनंद घेता येत नाही. निसर्गाच्‍या कुशीत समरस होऊनही अतृप्‍त राहिल्‍याची जाणीव माणसाला कधी कधी अस्‍वस्‍थ करीत असते.

एखाद्या कृतीतून आनंदाच्‍या वृक्षाला बहर येतो आणि क्षणात ढळूनही जातो. प्रत्‍येकाची आनंदानुभूती निराळी. काहींना इतरांच्‍या आनंदात आनंद शोधायचा असतो, तर काहींना इतरांच्‍या दुःखात स्‍वतःचा आनंद शोधण्‍याची ‍ विकृत बुद्धी असते. कष्‍टक-यांना श्रमाच्‍या मोबदल्‍याची आस, तर मालकांना श्रमीकांचा पगार कापण्‍यात आनंद. आनंदाची परिभाषाच निराळी. मात्र ज्‍याला जे हवं, ते साध्‍य करणा-या व्‍यक्‍तीला प्राप्‍त झालं म्‍हणजे; साधकाच्‍या चेह-यावर दिसणारा आनंद कुठल्‍याही फुटपट्टीत मोजता येत नाही.

ज्‍यांचे हात शेती-मातीत रमले, अशा मायबापांना शहराची हवा मानवत नाही. घरच्‍या जनावरांना बघितल्‍याशिवाय, शेतीवर नजर फिरवल्‍याशिवाय त्‍यांना चैनच पडत नाही. प्रत्‍येकांच्‍या चेह-यावर आनंद फुलून येण्‍यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी ‘जो जे वांछिल तो ते लाभो’ अशी प्रार्थना निसर्गाला केली आहे. संत तुकारामांनी ‘आनंदाचे डोही/ आनंद तरंग/ आनंदची अंग/ आनंदाचे’ अभंगातून आनंदाची व्‍याप्‍ती व खोली सांगितली आहे. शेतक-याला शेतीत राबल्‍याचा आनंद, कलावंतांना कलेत, शिक्षकांना विद्यार्थ्‍यात रममान होण्‍यात अधिक आनंद प्राप्त होत असतो. कधी असेही चित्र बघायला मिळते की, शेतकऱ्यांच्‍या पोटी जन्‍माला आलेल्‍या पटवा-याला शेतकऱ्यांची पिळवणूक करण्‍यात आनंद मिळतो.

शैक्षणिक सत्र संपले की, विद्यार्थी प्रवेशभरती मोहीम डोंगराळ माळरानात वसलेल्‍या आदिवासी गाव भेटीने सुरू व्‍हायची. आदिवासी आश्रमशाळेत काम करणा-या प्रत्‍येकाने स्‍वीकारलेले हे व्रतच म्‍हणा. अठरा वषांपूर्वी माझ्याकडे दुचाकी नव्‍हती. एक तर सायकलने किंवा ज्‍या शिक्षकांकडे दुचाकी होती, अशांसोबत विद्यार्थी भरती आरंभली जायची. जीवती तालुक्‍यातील कोलामगुड्यावर मी आणि आमचा शिपाई हातात प्रवेशभरतीचे अर्ज घेऊन पोहोचलो.

राजेश्‍वर आमच्‍या शाळेत शिकणारा विद्यार्थी. त्‍याच्‍या लहान भावाचा इयत्‍ता पाचवीकरिता फार्म भरत असताना, माझ्या पेनातल्या रिफीलने दगा दिला. शिपायाकडेही पेन नाही. ते कोलामगुडं म्‍हणजे दहा वीस शासकीय आवास योजनेची घरं. गावात साधे दुकानही नाही. माझी तगमग सुरू झाली. माझा फार्म अर्धवट राहिल्‍याने, पुन्‍हा अडगळीच्या डोंगरावर यावे लागेल म्‍हणून मी अस्‍वस्‍थ झालो. माझी अस्‍वस्‍थता राजेश्‍वरच्‍या आईने हेरली. आणि घरात जाऊन काहीतरी हुडकून, ‘फोंटोन सीम’ (पेन घे) म्‍हणत माझी अडचण दूर केली.

शाळेमार्फत पुरवली जाणारी ती पेन होती. आमची मुलं शाळेतल्‍या वस्‍तू शाळेतच ठेवणारी. शाळेतून जे मिळालं, ते शाळेला दान करून को-या हातानं घरी परतणारी…पण, राजेश्‍वरनं पेन घरी नेऊन माझी अडचण दूर केली होती. ही आठवण मला अतिशय आनंद देणारी. आयुष्‍यात कधीही न विसरणारी. माझ्या आनंदाचं प्रतिबिंब त्‍या माऊलीच्‍या चेह-यावर दिसलं. मी कृतकृत्‍य झालो. एखाद्या माळरानावर पुन्‍हा जाण्‍याचा त्रास वाचला. याचा आनंद फारच.लेखणी क्रांतीचे प्रतीक आहे. अभावग्रस्‍त भागात परिवर्तन करणारी साधनं दिसली म्‍हणजे माणसाला आनंदच होतो.

परिवर्तनाची दिशा चक्राकार असते. मग ते निसर्गाचे असो की समाजाचे. नव्‍वदनंतर जागतिकीकरणाचा विचार समाजाच्‍या प्रत्‍येक घटकाला स्‍पर्शून गेला. गावांतून महानगरांकडे नव्‍यापिढीची वाटचाल सुरू झाली. गावं ओस पडत गेली. शहरं विस्‍तारली. गाव केवळ सणासुधीचं निमित्‍त राहिलं. पुढे-पुढे तोही प्रवाह आटत गेला. गावाच्‍या आनंदाला नव्‍या प्रवाहाचे ग्रहण लागले.

आनंदाच्‍या अनुभूतीचा एक प्रसंग आठवतो. नदीम हा इयत्‍ता ६ वी करिता नवप्रवेशित मुलगा. त्‍याची आई आमची जुनी विद्यार्थीनी. नदीमचे आई-बाबा महाराष्‍ट्रातले पण, कामगार म्‍हणून हैद्राबादला केमीकल कंपनीत कामाला. आर्थिक भार पेलत नसल्‍याने मुलाला CBSE बोर्डाच्‍या शाळेतून आमच्‍या शासकीय आश्रमशाळेत दाखल केलं.

आई-बाबा लांब. मामाचं गाव तसं आमच्‍या शाळेपासून जवळच. आदिवासींची बरीच नाव मुस्लिम नावांसारखी. त्‍यांचे कुटुंब कुठल्‍यातरी पीराचे उपासक होते. म्‍हणून त्‍याचं नाव नदिम ठेवलं होतं. त्‍याच्‍या आईने मुल दत्‍तक द्यावं तशी नदीमला देऊन गेली. नदीम खूप कुशाग्र मुलगा. आश्रमशाळेतलं जेवण त्‍याच्‍या अंगवळणी पडलं नव्‍हतं. तो उपाशी राहायचा. मी आणि माझा मित्र प्रवीण तुरानकर घरून आणलेला दुपारचा डबा त्‍याला द्यायचो. त्‍याच्‍यासाठी फळेही आणायचो. त्‍याला अन्‍नापेक्षा शिक्षणाची चिंता भारी होती.

इंग्रजी माध्‍यमातून मराठी माध्‍यमात प्रवेश घेतल्‍याने त्‍याचा गोंधळ उडाला होता. सतत कुठल्‍या ना कुठल्‍या शिक्षकांच्‍या मागे असायचा. आई-बाबांना आमच्‍याकरवी फोन करून ‘मला काही समजत नाही, मुलं गोंधळ करतात’. असंच म्‍हणायचा. रोज रात्री तो जेवत नव्‍हता. आमची चिंता वाढली. त्‍याच्‍या कुशाग्र बुद्धीचं कुठंतरी दमन होत आहे, हे आमच्‍या लक्षात आलं. आम्‍ही त्‍याच्‍या आई-बाबांना समजावून एक वर्ष मामाच्‍या घरून इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत प्रवेश घ्‍यायला लावला.

 आदिवासी विद्यार्थ्‍यांसाठी चालवण्‍यात येणा-या CBSE बोर्डाच्‍या एकलव्‍य रेसिडेंसियल पब्‍लीक स्‍कूलची प्रवेश परीक्षा तो नक्‍की पास होईल यावर आमचा विश्‍वास होता. दुसरा पर्यायही आम्‍ही निश्चित करून ठेवला होता. मामामार्फत आवेदनपत्र भरून घेतलं. त्‍याची निवड एकलव्‍य रेसिडेंसियल पब्‍लीक स्‍कूलमध्‍ये गुणवत्‍तेच्‍या निकषांवर झाली. त्याला इयत्ता सातवीत प्रवेश मिळाला. मागील सत्रात एकलव्‍य शाळेत जाण्‍याचा योग आला. मला मागून कुणीतरी मिठी मारली. मागे वळून बघितले तर नदीम. नदीमच्‍या डोळ्यांतून ओसंडून वाहणारा आनंददायी कृतज्ञतेचा भाव माझ्यातील माणूसपण जागे करून गेला. मुलं अंगाला बिलगली की शिक्षकांच्‍या ऊर्जेला उधाण येत असते. कर्तव्‍याचा भाग म्‍हणून आपण बजावत असलेली एखादी जबाबदारी आनंदाच्‍या सागराला भरती आणणारी असते.

निघुनिया जाता, राहील रे काय?
मातीतले पाय, मातीवर
उचलून काटे, पेरावे सुमन
आनंदे भरण, होवो सदा

कुणाच्‍याही डोळी, असू नये आसू
ओठांवर हसू, नांदो सदा

जगण्‍यातला आनंद शोधण्‍यासाठी अनेक पाखरे आपला गाव, राज्‍य, देश सोडून पोट भरायला बाहेर पडतात. जिथे जातात तिथे नवे जग निर्माण करतात. भाषा, संस्कृती, माणसं आपलीशी करून घेतात. नव्‍या प्रांतात वावरतानाही आठवणींचा आनंद कायम त्‍यांच्‍या सोबत असतो. खरं तर ही माणसं जीवनाच्‍या संघर्षाने आनंदाच्‍या डोहात पडलेली असतात. भुकेची दाहकता लपवता येत नाही. नव्‍या माणसांशी सर्वस्‍व जुळवून घेतल्‍यावर कुणीतरी त्‍यांना तिथून पिटाळून लावत असेल तर, आनंदाच्‍या डोहाला आग लागते.

अचानक नकारात्‍मक भावना उत्पन्न होते. क्षणात आनंदाचे रुपांतर द्वेषात होते. आम्‍हाला इतरांच्‍या आनंदाचा विचार करता आला पाहिजे. कुणाच्‍यातरी ओठावर दिसणारं हसू आपल्‍यातील निर्मळ मन जागं करून जाते. इतरांच्‍या डोळ्यात आनंदाचे आभाळ स्‍वच्‍छ दिसले पाहिजे. ढगांचे येणे जाणे प्रवाहासोबत असेच सुरुच राहील. जगण्‍याच्‍या पायवाटेत आपण इतरांसाठी हिरवळ होणे पसंत करुया. मग काटे आपोआप तुडवले जातील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defination of happyness