प्रात्यक्षिक परीक्षा

समीर परांजपे
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

माझी चुळबुळ पाहिल्यावर "तुला ही कुत्री काही करणार नाहीत, सो स्टे कूल‘ असे काहीतरी माझ्या शेजारील पोलिस पुटपुटला. मी पुतळ्यासारखा उभा होतो. तोच ती दोन्ही पोलिसी कुत्री माझ्याजवळ आली.

माझी चुळबुळ पाहिल्यावर "तुला ही कुत्री काही करणार नाहीत, सो स्टे कूल‘ असे काहीतरी माझ्या शेजारील पोलिस पुटपुटला. मी पुतळ्यासारखा उभा होतो. तोच ती दोन्ही पोलिसी कुत्री माझ्याजवळ आली.

त्यादिवशी ऑस्ट्रेलियातील व्हॉलेंटियरगिरी मला भलतीच तणाव देणारी ठरली. मी साउथ ऑस्ट्रेलियातील एका सरकारी खात्यात प्रशासकीय कर्मचारी आहे. एके दिवशी सकाळी कार्यालयात गेल्यावर माझ्या ई-मेलवर "स्वयंसेवक पाहिजेत, केवळ पंधरा मिनिटांसाठी‘ अशा मजकुराचा ई-मेल आला. मुळात माझा स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा पिंड नाही. पण आमच्या विभागामधील जवळपास नऊ लोक स्वयंसेवक म्हणून जाणार आहेत, असे कळल्यावर मीही हिरीरिने भाग घ्यायचे ठरवले आणि माझा होकार कळवला. बरोबर दुपारी एक वाजता डायनिंग रूमपाशी मी उपस्थित राहावे, असे मला कळवण्यात आले. ठरल्याप्रमाणे दुपारी एकच्या आधी आम्ही सर्व स्वयंसेवक डायनिंग रूमपाशी येऊन हजर झालो. आपण पंधरा मिनिटांत नक्की काय काम करणार आहोत, याची सर्वांनाच उत्सुकता होती. आपल्याला का बोलावले असावे यासंबंधी काही अनुभवी लोकांनी आपले अंदाज व्यक्त करायला सुरवात केली.

एक जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणाले, ""मी सांगतो. रक्तदान शिबिराला लोक हवे असतील किंवा आगामी स्टेट इलेक्‍शनला माणसे हवी असतील.‘‘ अजूनही एका दोघांनी आपली मते नोंदवली. कोणत्याही गोष्टीवर आपले मत पटकन देऊन टाकणे हा रोग जगात सगळीकडे आहे. तो संसर्गजन्य रोगही असावा. एकाने काही मत व्यक्त केले, की लगेच बाजूचा दुसरे मत व्यक्त करतो. ही साथ फार पसरायच्या आधीच आमच्या मजल्यावरची लिफ्ट्‌सची दारे उघडली गेली. दोन उंचेपुरे निळ्या गणवेशातील पोलिस दोन लॅब्रेडोर्स जातीच्या आडदांड कुत्र्यांना घेऊन आले. त्या दोन पोलिसांनी त्यांची ओळख करून दिली आणि मग त्यांच्या हातातील पट्ट्याने बांधलेल्या दोन शिष्या अनुक्रमे जॅकी आणि जेनी यांचीही ओळख करून दिली.

जॅकी आणि जेनी या दोन श्वानांनी दोन दिवसांपूर्वीच पोलिस अकादमीतून त्यांचे प्रशिक्षण पुरे केले होते. आज त्यांची प्रात्यक्षिक चाचणी होणार होती. थोडक्‍यात, आयुष्यात पहिल्यांदाच श्वानांच्या चाचणीकरिता माझा गिनीपिग म्हणून वापर होणार होता.

दोन मिनिटांत आम्हा दहा लोकांना रांगेत उभे करण्यात आले. आमच्यातील चार निवडक धीट लोकांकडे कुठल्यातरी पांढऱ्या रंगाचे रसायनाचे पुडे देण्यात आले. या चार लोकांनी हे पुडे त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवले. हे पुडे ज्या व्यक्तींकडे आहेत अशा व्यक्ती जॅकी आणि जेनी शोधणार आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले. मी मनातून इतका घाबरलो होतो की, मी पुन्हा पुन्हा माझ्या खिशात तर पुडा नाही ना अशी खात्री करत होतो. एकीकडे हे पुडे आमच्यापैकी काहींकडे लपवले जात असताना, एक पोलिस जॅकी आणि जेनी या स्नातक श्वानांना आमच्यापासून दूर घेऊन गेला. शिट्टी वाजल्याबरोबर क्षणार्धात जॅकी, जेनी आणि त्यांचे पट्टे हातात धरून जवळपास धावतच तो पोलिस आमच्या जवळ आला. जॅकी आणि जेनी रांगेतील प्रत्येकाच्या जवळ येऊन त्यांना हुंगत होते. जसजसे एक एक माणूस हुंगत या श्वान भगिनी पुढे चालल्या होत्या, तसे त्यांचे पट्टे धरलेला पोलिस सतत "गुड गर्ल्स‘, "गुड गर्ल्स‘ असे म्हणत त्यांना थोपटत होता. माझी चुळबुळ पाहिल्यावर "तुला ही कुत्री काही करणार नाहीत, सो स्टे कूल‘ असे काहीतरी माझ्या शेजारील पोलिस पुटपुटला. मी पुतळ्यासारखा उभा होतो. मनातल्या मनात "ओह साहेब ! प्रत्येक मालक असेच सांगतो‘ वगैरे वगैरे घोकत बसलो होतो. मुखी रामनामाचा जप चालू असताना जॅकी आणि जेनी माझ्याजवळ आल्या. मला हुंगल्यासारखे केले आणि पुढे निघून गेल्या. आमच्या बरोबरच रांगेत असलेले आणि रसायनांचे पुडे खिशात ठेवलेले चारही जणांना या दोघींनी बरोबर हुडकून काढले होते. जॅकी आणि जेनी या दोघीही परीक्षा पास झाल्या होत्या. त्यांना घडवणाऱ्या दोन्ही पोलिसांच्या तोंडावर आत्यंतिक आनंदाचे आणि अभिमानाचे भाव दिसत होते. मलाही मनापासून खूप आनंद झाला, पण हा आनंद जॅकी आणि जेनी या परीक्षा पास झाल्या याहीपेक्षा त्यांच्या चाचणीतून मी मोकळा झालो याचा जास्त होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demonstration test