निरपराध कुठला!

देवा झिंजाड
बुधवार, 14 जून 2017

गाडगेबाबा आणि संतांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्या मार्गावरून जाण्याचा छोटासा प्रयत्न करण्याचे त्याच्या मनात आले. त्याचे हात आता "देणाऱ्याचे हात' झाले. माणसे उभी केली पाहिजेत, यासाठीच त्याचे चालणे आहे, बोलणे आहे.

गाडगेबाबा आणि संतांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्या मार्गावरून जाण्याचा छोटासा प्रयत्न करण्याचे त्याच्या मनात आले. त्याचे हात आता "देणाऱ्याचे हात' झाले. माणसे उभी केली पाहिजेत, यासाठीच त्याचे चालणे आहे, बोलणे आहे.

पसायदानाइतके पावित्र्य आपल्या वागण्यात जरी आले नाही तरी चालेल, पण माणसांची दु:ख धुऊन न टाकता आपल्याला कुणी पवित्र म्हणावे एवढे आपण अजून मोठे नाही झालो, हे सचिन पवार या तरुण वारकरी कीर्तनकाराचे तत्त्वज्ञान. कीर्तन करणे म्हणजे निव्वळ पोट भरायचा धंदा नव्हे. समाजातील गरजूंना मदत करा असे नुसते सांगून सचिन गप्प बसत नाही, तर अनंत हस्ते गरजूंपर्यंत पोचतो. आय.ए.एस. व्हायचे स्वप्न पाहणारा एक गरीब मित्र पाचशे रुपये रोजासाठी कुठल्यातरी पक्षाच्या प्रचाराला गेल्याचे कळताच याच्या काळजात वेदनांचा डोंब उसळला. वाटले की या मुलावर एवढी वेळ का यावी, या प्रश्‍नासरशी त्याने त्याच्यापुरते उत्तरही मिळवले. ग्रामीण भागातून पुण्यात एमपीएससी, यूपीएससीच्या अभ्यासासाठी आलेल्या अत्यंत गरीब अशा वीस मुलांचा जेवणाचा खर्च करायला सुरवात केली. गेले चौदा महिने वीस मुलांना हा जेऊ घालतो आहे. कसे? वक्तृत्व स्पर्धामधून कमावलेले तब्बल साडेसात लाख रुपये त्याने येथे खर्च केले.

व्याख्याने, कीर्तने यातून मिळालेला पैसा हा असा "उधळतो'. काय वाटत असेल याच्या वागण्याबद्दल आई-वडिलांना? ते म्हणतात, "गाडगेबाबांची परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा हा खांद्यावर लीलया पेलतोय हे कौतुकाचे नाही का!'
ज्ञानसंग्रह आणि लोकसंग्रह यापरता आयुष्यात कुठलाच संग्रह करणार नाही या त्याच्या तत्त्वज्ञानात त्याच्या या वृत्तीचे सार सापडते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बालक व युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी "शिदोरी'सारखे उपक्रम घेण्यात सचिनचा मोठा वाटा आहे. माधव पाटील या "वेड्या मुला'सोबत पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी तो फिरतो. "माणूस वेल्हाळ प्राणी' म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या दुष्काळी परिस्थितीत "फक्त एक मूठ धान्य' या त्याच्या फेसबुकवरल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून "सावली फाउंडेशन'च्या साह्याने तब्बल तेरा टन धान्य पुरंदर परिसरातल्या जनतेने यांच्या झोळीत टाकले. ते धान्य सोलापूर जिल्ह्यात नेऊन वाटण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातच शिरापूर या गावी दुष्काळी छावणीतल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून सचिनच्या कीर्तनाचा कार्यक्रम केला गेला. त्याबद्दल त्याने मानधन तर घेतले नाहीच, उलट पाच हजार रुपये मदत केली. गेवराई येथे सचिनचे कीर्तन चालू असताना संतोष गर्जे हा युवक कीर्तन ऐकायला समोर येऊन बसला. बावन्न अनाथ मुलांचा सांभाळ करणारा हा युवक कीर्तन संपल्यावर जायला निघाला, तेव्हा सचिनने मानधनाचे पाकीट त्याच्या हातात देऊन टाकले. सचिन एकदा मदत करून थांबला नाही. तेव्हापासून सचिन "बालग्राम'ला दरदिवशी नव्वद रुपये देतो. बोकडदरा येथील शाळेत खाणकामगारांची मुले शिकतात. इथल्या 292 मुलांसाठी सचिनकडून रोज भात शिजवला जातो. त्याचा मित्र इम्रानच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही सुरवात केली. इथली मुले रोज भात खायला मिळतो म्हणून शाळेत येऊन शिकू लागली आहेत.

अडीच हजार मीटर उंचीच्या डोंगरावर चकदेव हे गाव वसले आहे. गावात एकूण घरे अठरा आणि आता गावात माणसे उरली आहेत फक्त सात. त्यापैकी पाच म्हातारे सत्तरीच्या पुढे, या गावात जायचे असेल तर पुण्याहून बाईकवर साडेतीन तास, नंतर छोट्या बोटीने अडीच तास व पुढे पायी तीन तास असा प्रवास करून जावे लागते. तिथल्या माणसांना साधे दळण दळायलासुद्धा अवघड वाटेने शिंदी या गावात यावे लागते. हे कळल्यावर त्या गावाला पिठाची गिरणी द्यायची कल्पना पुढे आली आणि त्यातून एवढा अवघड प्रवास करून पिठाची गिरणी घरपोच करण्यात आली. यात उमेश कुदळे, सायली धनाबाई यांना सचिनने साथ दिली.

त्याच्या या "देणाऱ्याच्या हाता'विषयी विचारले, तर तो म्हणतो, "मी संतसाहित्याचा अभ्यासक आहे. संतांनी कुठे इस्टेट केली होती? मी त्या मार्गावरून जाण्याचा हा छोटासा प्रयत्न करतो.' गरजूंचे जगणे समृद्ध करणारे उपक्रम हाती घेऊन त्यात तन, मन, धनाने सक्रिय सहभाग घेऊन सचिन पवार सतत कार्यरत राहतो. तरीही समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा रास्त पर्याय अजूनही त्याला सापडत नाही. "देवा, मला कुठल्याच अपराधाची क्षमा करू नकोस!' अशी प्रार्थना करणाऱ्या या नम्र आणि लीन युवकाबद्दल माझ्या मनात सात्विक रागही आहे. त्याला मी विचारतो, की बाबा रे, तू कुठला अपराध केलास? अन्‌ त्या रागापोटी तितकीच दर्जेदार शिवीसुद्धा मी त्याला देतो, "निरपराध कुठला!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dewa zinzad wirte article in muktapeeth