माझ्यालेखी माझ्या लेकी

धनश्री अजित जोशी
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सहा वर्षे बागडल्या इथे. आता फुलपाखरू होऊन निघाल्या. आपल्या आकाशात झेपावतील सगळ्या. माझ्या बोटांवर उमटलेले असतील या फुलपाखरांच्या पंखांवरचे नाजूक रंग...

सहा वर्षे बागडल्या इथे. आता फुलपाखरू होऊन निघाल्या. आपल्या आकाशात झेपावतील सगळ्या. माझ्या बोटांवर उमटलेले असतील या फुलपाखरांच्या पंखांवरचे नाजूक रंग...

दहावीच्या वर्गावरचा शेवटचा तास. वर्गात गेले. बाई वर्गात आल्या आहेत याची जाणीव कोणालाच झाली नाही. सर्व विद्यार्थिनी काही ना काही लिहीत होत्या. आता या कशाला वर्गात आल्या आहेत. असा काहीसा भाव. त्या तरी काय करणार? सगळ्या वह्या, प्रोजेक्‍ट्‌स पूर्ण करण्याची आजची शेवटची तारीख. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वर्षभर वारंवार सूचना देऊनही वह्या अपूर्णच. त्या पूर्ण करण्यासाठी त्यांची धांदल. त्यांना परीक्षेसंदर्भात काही महत्वाच्या सूचना द्यावयाच्या होत्या. "गुड आफ्टरनून' करून त्या साऱ्याजणी परत लिहिण्यात गुंग झाल्या. मला खरे तर त्यांच्याशी खूप बोलायचे होते. शेवटचा तास म्हणून जरा मनमोकळ्या गप्पा मारायच्या होत्या. शेवटी, ""जरा इकडे लक्ष द्या, पेपर नीट व्यवस्थित लिहा, आत्मविश्‍वासाने परीक्षेला जा, तुम्हाला चांगलेच गुण मिळणार आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.'' बोलताना मला जाणवले, की माझा आवाज भरून आला होता. काहींनी "थॅंक्‍यू मॅडम' असा प्रतिसाद दिला. तेवढ्यावरच समाधान मानून मी वर्गाबाहेर पडले.
हा माझा अनुभव दरवर्षीचाच. चला, आता या विद्यार्थिनींचा आणि माझा संबंध कधी भेटल्याच तर हाय, हॅलो पुरता. पुढच्या वर्षी नवीन तुकडी. प्रत्येक तुकडीला निरोप देताना एक वेगळेच रिकामेपण जाणवते. पाचवी ते दहावी शाळेत असतात, बागडतात आणि असंख्य आठवणी आमच्या जवळ ठेवून आपापल्या अवकाशात झेपावतात. प्रत्येक तुकडीचे काही ना काही तरी वेगळेपण असते. सगळ्या कायम लक्षात राहतात असेही नाही. खेळात, नाटक, वक्तृत्व यात सहभागी होणाऱ्या, आपली काही वेगळी ओळख ठेवून जाणाऱ्या विद्यार्थिनी लक्षात राहतात. काहीजणी कायम मागे मागे राहतात. कशातच भाग घेत नाहीत. काही आपणाहून बोलायला येणाऱ्या, काही अबोल. प्रत्येक जण वेगळी. प्रत्येकीच्या आपल्या शाळेबद्दलच्या काही आठवणी असतात. निरोप समारंभाच्या वेळी साड्या नेसून, नटून थटून येतात. एकदम ओळखायलाच येत नाहीत. लाडाने वाढविलेली आपली कन्या जेव्हा प्रथम साडी नेसून आपल्या समोर उभी राहाते तेव्हा आईच्या हृदयात काय होते, ते शब्दात नाही व्यक्त करता यायचे. तसेच काहीसे या आपल्या विद्यार्थिनींकडे पाहताना वाटते.

त्या आपल्यातच मग्न असतात. बोलतात, हसतात, आता तर "फोटो' आणि "सेल्फी' काढण्यात मग्न असतात. तेव्हा निरोप समारंभातला "भाव' काहीसा हरवल्यासारखा वाटतो, मन उदास होते. पण शाळेचा निरोप घेताना हळव्या होतात. "बाई, आम्ही तुम्हाला, शाळेला कधीच विसरणार नाही. रोज शाळेत येणार, आम्हाला करमणारच नाही,' असे म्हणून निरोपाचे "बाय' करतात. त्यांच्या त्या बोलातले केवळ भाव स्वीकारायचे, काही अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे त्यांनाही कधीतरी शाळा आठवत असेलही, पण येणे जमत नाही. "करमणार नाही' हे त्या निरागसतेने सांगतात खऱ्या, पण लवकरच आपल्या नव्या विश्‍वात रमणार असतात, हे जाणायचे. किंबहुना, त्यांनी त्यांच्या जगात रमावे असाच तर आशीर्वाद देतो आपण.

मग कधीतरी एकदम रस्त्यात भेटतात, पाया पडतात. "बाई, ओळखलंत का?' माझ्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह. कोणत्या तुकडीची, चेहरा ओळखीचा वाटतोय, नाव आठवत नाही. अशी अवस्था बऱ्याच वेळा होते. "नाव नाही गं आठवत' असे म्हणताना अपराध्यासारखे वाटते. इंजिनियर, डॉक्‍टर, कुणी सी.ए. एन्ट्रन्स दिलेली असते. काही जणींबरोबर एखादी गोंडस मुलगी किंवा मुलगा असतो. ""या आमच्या बाई बरं का?'' अशी ओळख करून देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. कोणत्याही समारंभात जा एखादी "लेक' भेटतेच. धावत धावत येते. आपले वय विसरून, आपली गृहिणी झालेली तृप्त लेक बघून खूप समाधान वाटते. त्यांच्याही चेहऱ्यावरून बाईंबद्दलचा नितांत आदर ओसंडून वाहत असतो. ""आम्ही तुम्हाला खूप मिस करतो,'' शाळेतल्या एखाद्या "ऍक्‍टिव्हिटी'चा तिला कसा फायदा झाला हे सांगताना तिला वाटणारा शाळेविषयीचा आदर जाणवतो.

एकदा का शाळा सोडून गेल्या की शाळेकडे न फिरकणाऱ्या बऱ्याच. कदाचित त्यांना ओढ जाणवतही असेल, पण नेहमीच्या कामांमध्ये वेळ होत नसेल, असे समजून घेते. काही वेळा "बाई' येताना दिसल्या की तोंड चुकवून एखादी रस्ता बदलून जातानाही दिसते. असे झाले की, मन खट्ट होते. का बरे तिने ओळख दाखवली नसेल? असे मनात आल्यावाचून राहत नाही. कितीतरी विद्यार्थिनी हाताखालून गेल्या. फुलपाखरे असतात ना त्यांना पकडल्यावर ती नाराजी दाखवतात, फडफड करतात आणि सोडून दिल्यावर अवकाशात झेपावतानाही आपल्या बोटावर त्यांचे रंग उमटवून जातात. अशाच या माझ्या लेकी त्यांच्या आठवणींचे रंग अजूनही मला आनंद देतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanashri joshi write article in muktapeeth