शांतिपुतळा देखिला!

दीप्ती श्रीधर कुलकर्णी
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते.

एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते.

आजही तो दिवस लख्ख आठवतो. आयुष्यात घडणाऱ्या योगायोगांमधला सर्वोत्तम योग. मी अनेक वर्षे हार्मोनियमची साथ करीत होतेच. गायिका शुभांगी मुळे यांना एका कार्यक्रमात एकाच गाण्यापुरती साथ करायची होती. सर्वोदय समाजाचे तीन दिवसीय संमेलन होते. मंचाच्या उजव्या कोपऱ्यात आम्हाला जागा मिळाली. संयोजकांच्या सूचनेनुसार मुख्य अतिथी आले, की गाणे सुरू करायचे. कार्यक्रमात बरीच दिग्गज राजकीय मंडळीही उपस्थित होती. अतिथी आले कळल्यावर गाणे सुरू झाले. ते मंचावर आले, दीपप्रज्ज्वलन झाले. "वैष्णव जन तो'... गाणे इतके छान सुरू होते, की मुख्य अतिथी स्थानापन्न होण्याऐवजी थेट माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. बापरे! काय ते तेज! साधनेचे तेजोवलय... निःशब्द! काय करावे काहीही सुचेना, एकीकडे मी गाणे वाजवत होते आणि हा विलक्षण अनुभव घेत होते. मी पटकन हार्मोनियमवरचा हात काढला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला... मी हार्मोनियमवर गाणे वाजवीत असताना समोर प्रत्यक्ष दलाई लामा इतक्‍या निकट उभे राहावेत, त्यांनी आशीर्वाद द्यावा, हे माझ्यासाठी खूप काही होते. जगाला आपल्या विचारांनी आणि आचारांनी शांतिमंत्र देणारे दलाई लामा यांना पाहता क्षणी "अनंत जन्मीचा शीण गेला' अशी माझी अवस्था झाली. कोणताही अभिनिवेश न बाळगता त्यांनी माझ्या आदरपूर्वक केलेल्या नमस्काराला आशीर्वादरूपी दाद दिली. खरेच ही माणसे फारच वेगळ्या पातळीवरची असतात, याची अनुभूती मला त्याक्षणी येऊन गेली.

अनेक असंतुष्ट राष्ट्रे संहारक शस्त्रे निर्माण करून अशांतता पसरवीत असताना दलाई लामा यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आपल्या उपासनेत आणि त्यातून निर्माण झालेल्या स्पष्ट आणि सत्य वचनांनी आपल्याला कायमच एक ऊर्मी देत राहतात. त्या क्षणाने माझे अंतरंग पालटले. असे क्षण अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी देऊन जातात. काही वेळा निराशेच्या गर्तेमध्ये प्रत्यक्ष प्रकाशमय वाट दाखविणारे हे क्षण असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dipti kulkarni write article in muktapeeth