दुःख सारूनी दूर...

डॉ. चित्रलेखा पुरंदरे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

निसर्गाबरोबर राहणाऱ्यांना निसर्गच बळ देतो. जगण्याचे, दुःख दूर सारण्याचे, पुढे जाण्याचे...

साठ जणांचा गट एका पर्यटन कंपनीच्या रिसॉर्टमध्ये येऊन दाखल झाला. रिसॉर्ट अगदी जंगलातच. आसपासच्या परिसरात माणसेही दिसत नव्हती. रिसॉर्ट अद्ययावत, सुसज्ज, प्रसन्न आणि रमणीय असे!

निसर्गाबरोबर राहणाऱ्यांना निसर्गच बळ देतो. जगण्याचे, दुःख दूर सारण्याचे, पुढे जाण्याचे...

साठ जणांचा गट एका पर्यटन कंपनीच्या रिसॉर्टमध्ये येऊन दाखल झाला. रिसॉर्ट अगदी जंगलातच. आसपासच्या परिसरात माणसेही दिसत नव्हती. रिसॉर्ट अद्ययावत, सुसज्ज, प्रसन्न आणि रमणीय असे!

सगळी मंडळी रात्रीच्या रुचकर भोजनानें आणि यजमानांच्या लाघवी, आपुलकीच्या बोलण्यानें तृप्त झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेक्षणीय ठिकाणें पाहायला निघायचें होतें. पण त्या दिवशी ते तसें घडायचें नव्हतें. कविमनाच्या निसर्गप्रेमी वडिलांनी सुरू केलेल्या या कंपनीची जबाबदारी त्यांनी नुकतीच मुलगी आणि जावयाकडे सोपवली होती. त्या सकाळी अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्‍यानें वडिलांचें रिसॉर्टमध्येच निधन झालें. वातावरण दुःखाने भरून गेलें. नातेवाईक जमू लागले. आजूबाजूच्या परिसरातून, कुठून कुठून गर्दी जमा होऊ लागली. मुलगी, जावई दुःखाच्या आवेगानें सुन्न. असा बराच काळ गेला आणि त्या दोघांच्या एकदम लक्षात आलें...आपल्याकडे उतरलेल्या पर्यटकांच्या जेवणाची वेळ झालीय. त्यातल्या कोणाकोणाला काही व्याधी असतील, त्यासाठी औषधे घ्यायची असतील. पण त्याआधी त्यांच्या पोटात अन्न असणें आवश्‍यक आहे.

पुढील विधीसाठी पार्थिव नेल्यानंतर मुलगी उठली. त्या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात गेली. रोज स्वयंपाक करणाऱ्या मंडळींना मालकांच्या अशा अचानक जाण्यानें झालेल्या दुःखानें काही सुचत नव्हतें. पण आपली ताई दुःख बाजूला सारून उठलेली पाहून तेही स्वयंपाकघरात आले. पर्यटक मंडळी ताईला सारखी, "आमची काळजी करू नका. आम्हाला जेवायला नको' अशी हात जोडून विनंती करत होती. पण "अतिथी देवो भव' या वडिलांच्या संस्कारात घडलेल्या ताईनें त्या सर्वांना जेवू घातलें. दुसऱ्या दिवशीपासून ठरल्याप्रमाणे पुढचे कार्यक्रमही सुरू झालें. खरें तर किती दुःखद प्रसंग. पण केवढें धैर्य, केवढा विचार, केवढी काळजी...स्वतःचें हिमालयाएवढें दुःख बाजूला ठेवून अतिथींचा विचार करणाऱ्या "प्राची-अनिरुद्ध'ला सलाम करावासा वाटतो. हे सगळें बळ तुम्ही कुठून गोळा केलें?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr chitralekha purandare write article in muktapeeth