दिव्यदृष्टीचा दिव्यांषु

डॉ. दीपक शिकारपूर
शनिवार, 3 मार्च 2018

"पंगु लंघयते गिरीम्‌' हे ऐकून होतो; पण अशा गोष्टी सहसा सुभाषितातच असतात. मात्र सुभाषिते खरी होताना पाहतो, तेव्हा आपण चकीत होऊन जातो.

"पंगु लंघयते गिरीम्‌' हे ऐकून होतो; पण अशा गोष्टी सहसा सुभाषितातच असतात. मात्र सुभाषिते खरी होताना पाहतो, तेव्हा आपण चकीत होऊन जातो.

एका प्रथितयश वाहिनीवर "आज की रात है जिंदगी' असा असामान्य व्यक्तींच्या असीम कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. त्याचे अँकर होते "बिग बी' अमिताभ बच्चन. एका कार्यक्रमात एक गोरापान, थोडासा हृतिक रोशनसारखा दिसणारा युवक पॅरा ग्लायडिंग, ट्रेकिंग करताना दाखवत होते. हवेच्या झोतावर मस्त तरंगत होता तो युवक, तर कधी डोंगरकडा लंघून जात होता. असे करणारे साहसी तरुण आपण अनेक पाहतो. मग या कार्यक्रमात विशेष काय होते? माझ्याबरोबर हा कार्यक्रम बघणाऱ्या एका मित्राने ही शंका बोलूनही दाखवली, ""यात विलक्षण काय? थोड्या सरावाने बरेच लोक हे सर्व करतात.'' काही सेकंदांनीच बच्चन साहेबांनी सांगितले, की "ही व्यक्ती अंध असून कुठल्याही सहायकाशिवाय या सर्व क्रिया लिलया करते.' आता थक्क व्हायची पाळी आमची होती. "पंगु लंघयते गिरीम्‌' हे ऐकून होतो; पण अशा गोष्टी सहसा सुभाषितातच असतात. मात्र सुभाषिते खरीही होतात? समोर घडत असते तेव्हा आपण चकीत होऊन जातो. नंतर जेव्हा कळले, की दिव्यांषु गणात्रा हे पुणेकर आहेत, तेव्हा तर त्याचा अजून जास्त अभिमान वाटला. पुण्यात अनेक अवलिया विक्रमादित्य वास्तव्य करतात. आता त्यात अजून एकाची भर पडली आहे.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ग्लुकोमामुळे त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. प्रथम त्यांनी वैद्यकीय इलाज करून बघितले; पण जेव्हा लक्षात आले, की आता आयुष्यभर ही दृष्टी परत येणार नाही, तेव्हापासून सुरू झाली एक वेगळीच वाटचाल. दिव्यांग पुनर्वसन केंद्रात गेल्यावर त्याच्या लक्षात आले, की दृष्टिहीन व्यक्तींसाठी फारसे करिअर पर्याय उपलब्ध नाहीत. प्रथम जिद्दीने त्यांनी संगणक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले. आयटी व्यावसायिक म्हणून कामही केले. स्वतःला व समाजाला जाणीव करून दिली, की ते खूप काही करू शकतात. काही वर्षं हे केल्यानंतर त्यांनी मानसशास्त्र शिकायचा निर्णय घेतला. त्यांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. सुरवातीला महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला होता.

आपल्या देशात सुमारे तीन कोटी दिव्यांग व्यक्ती राहतात. त्यामध्ये जगातील वीस टक्के अंध व्यक्तींचा समावेश होतो. दिव्यांग व धडधाकट व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी साहसी खेळ, ट्रेकिंग, सायकलिंग, पॅराग्लायडिंग असे क्रीडा प्रकार निवडले. "ऍडव्हेंचर बियॉन्ड बॅरिअर्स' या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेत सर्व प्रकारच्या व्यक्ती एकत्र येतात. आत्तापर्यंत दहाहून जास्त मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. 2014 मध्ये एकट्याने पॅरा ग्लायडिंग करणारी पहिली दृष्टिहीन व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव झाला. साहसी खेळ हे माध्यम म्हणून लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ते वापर करतात. त्यातून अनेक नैराश्‍यग्रस्त व्यक्तींना प्रेरणा मिळते. अनेक संगणक उद्योग त्यांना व्याख्यान व बाह्य खेळ कार्यक्रम करण्यासाठी बोलावतात. अशाच एका कार्यक्रमात माझीही त्यांच्याशी ओळख झाली व दिव्यांग व्यक्तींकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला.

http://adventuresbeyondbarriers.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती मिळेल. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांना समाजाकडून अनेक मानसन्मान मिळाले. पण जोपर्यंत समाज दिव्यांग व्यक्तींकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत नाही, तोवर कार्य अपूर्ण आहे असेच त्यांना वाटते. त्यांच्या कार्यशाळांमध्ये दिव्यांग व्यक्तींबरोबर साहसी खेळात भाग घेतल्याने अनेक धडधाकट व्यक्तींचे विचार बदलले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr deepak shikarpur write article in muktapeeth