माझ्या मृत्यूची गोष्ट

डॉ. दीपक शिकारपूर
मंगळवार, 8 जानेवारी 2019

आपल्या मरणाची बातमी आपणच ऐकली तर? होते असे कधी कधी. कुणाच्या तरी ऐकण्यात चूक होते आणि आपले मरण फोनवर ऐकू येते.

आपल्या मरणाची बातमी आपणच ऐकली तर? होते असे कधी कधी. कुणाच्या तरी ऐकण्यात चूक होते आणि आपले मरण फोनवर ऐकू येते.

आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य। आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने।। असे संत तुकाराम महाराजानी म्हटले आहे. मरण हे अटळ आहे. माझी पन्नाशी उलटली, पण उमर नाही जाहली. हे सगळे आठवले एका दूरध्वनीमुळे. गेल्या वर्षी एका सकाळी मी सिंहगड रस्त्यावर पु. ल देशपांडे उद्यानात नेहमीप्रमाणे चालायला गेलो होतो. हे उद्यान देशातील एक सर्वोत्तम नयनरम्य उद्यान आहे. इथे चालणे हा एक उत्साहवर्धक अनुभव असतो. तेवढ्यात भ्रमणध्वनी वाजला. आवाज नीट ऐकू येण्याची थोडी समस्या होतीच. तरी ऐकत होतो. सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा यांचा फोन होता. एवढ्या सकाळी मुथा यांनी फोन का केला असेल, असा विचार करीत मी फोन घेतला. मी फोनवर "हॅलो' म्हणताच त्यांनी विचारले, ""तू दीपक शिकारपूरच बोलतोय ना?'' ""हो, मीच बोलतोय. सांगा, इतक्‍या सकाळी काय काम काढले?'' मीच फोनवर असल्याची खात्री झाल्यावर म्हणाले, ""इकडे बोल.'' आता माझ्याशी कृष्णकुमार गोयल बोलत होते. मीच बोलत असल्याची त्यानीही खातरजमा केली. मी त्यांना म्हटले, ""साहेब, काय भानगड आहे?'' ते म्हणाले, ""आम्ही काही मित्र विद्यापीठ उद्यानात प्रभात फेरीला आलो आहोत. आमच्यातील एकाने छातीठोकपणे सांगितले की, काल तुझे मुंबईत अपघाती निधन झाले. म्हणून फोन केला.'' मला झालेला गोंधळ लक्षात आला.

आदल्याच दिवशी मुंबईत पूर आला होता आणि त्यात गेले होते ते डॉ. दीपक अमरापूरकर. आडनाव साधर्म्याने घोळ झाला होता. मी गोयल-मुथा या सन्मित्रांना सांगितले की, "मी हयात आहे. अजून तरी धडधाकट आहे आणि तुमच्याशी फोनवर बोलतो आहे.' नंतर मी गोयल व मुथा साहेबांना कधीही भेटलो की ते विचारतात, "आहेस?' मीही म्हणतो, "अजूनही जिवंत आहे.' दोघेही हसतो. इतर लोकांना कळत नाही की, हे दोघे अशी कशी चौकशी करतात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr deepak shikarpur write article in muktapeeth