एक छोटीशी कहाणी

डॉ. ज्योत्स्ना महाजन
गुरुवार, 1 मार्च 2018

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पाणबुडीला पन्नास वर्षे झाली, या निमित्ताने झालेल्या समारंभाची कहाणी एका नौसैनिकाच्या पत्नीच्या नजरेतून...

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पाणबुडीला पन्नास वर्षे झाली, या निमित्ताने झालेल्या समारंभाची कहाणी एका नौसैनिकाच्या पत्नीच्या नजरेतून...

दिवाळी होती. दूरध्वनी खणखणला. माझ्या पतींचे नौदलातील एक सहकारी मित्र पाटील बोलत होते, ""वहिनी, पाणबुडीच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती "कलर्स निशाण' देणार आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या सोहळ्याला तुम्हाला आमंत्रण आहे. कलवरी ही पाणबुडी नौसेनेमध्ये दाखल होणार आहे. त्यानिमित्त होणाऱ्या समारंभालासुद्धा!'' माझे पती केशव कृष्ण महाजन पाणबुडी सेवेतून निवृत्त झाले, त्याला बेचाळीस वर्षे लोटली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना देवाज्ञाही झाली; पण नौसेना एका माजी नौसैनिकाच्या पत्नीला समारंभासाठी बोलावत होती. खूपच छान वाटले. यांची सर्व कागदपत्रे काढून नावनोंदणी करताना मी एकदम लहानच झाले जणू! लग्नानंतर विशाखापट्टणमला जायचे म्हणून जेवढा आनंद झाला होता, किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीच आता झाला. इतकी वर्षे लोटली मध्ये अन्‌ विशाखापट्टणम परत पाहायला मिळणार.

डिसेंबरचा पहिला आठवडा होता तो. नुसता जल्लोष, भेटीगाठी आणि मेजवानी. एका वेगळ्याच जगात होते सर्वजण. आजी-माजी अधिकारी, नौसैनिक सर्वांमध्ये एकच सूत्र पाणबुडीकर. येथे पाणबुडी शाखेचे एकमेव महावीरचक्रपदक विजेते कॅप्टन मोहन सामंत यांची भेट झाली. 1971 च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी कलवरी याचे कॅप्टन सुब्रह्मण्यम्‌ यांचीही भेट झाली. माझे पती याच पाणबुडीवर अभियंता होते. त्या वेळेस झालेल्या आमच्या भेटीची आठवण करून देताच या एक्‍याण्णव वर्षांच्या नौसैनिकाला खूप आनंद झाला. बहुमानप्राप्त सर्व नौसैनिकांच्या आठवणींना उजाळा देऊन, वीर नारींचा सन्मान व कुटुंबीयांना भेटी देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते. एकहृदय व अभिमानास्पद असा हा सोहळा होता.

पन्नास वर्षांपूर्वी, आठ डिसेंबर 1967 रोजी रशियाच्या किनाऱ्यावर रिगा येथे पहिली पाणबुडी दिमाखदार सोहळ्यात भारतीय नौदलात समाविष्ट झाली होती; पण हा समारंभ भारताबाहेर झाला होता. याच पाणबुडीवर माझे पती अभियंता म्हणून काम करत होते. हा दिवस "पाणबुडी दिवस' म्हणून साजरा होतो. टपाल खात्याने "पनडुब्बी दिन' म्हणून तिकीट काढले. महावीरचक्र प्राप्त कॅप्टन सामंत यांच्या नावाने काढलेले तिकीटही त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आले. अतिशय अभिमानास्पद अशा या समारंभांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आता पाणबुडी शाखेला "कलर निशान' देण्याची वेळ जवळ आली होती. नौसैनिकांचे संचलन, ती शिस्त, आसन व्यवस्थेपासून ते निवेदनापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नेटके आयोजन होते.

भारतीय नौदलाला याआधी 27 मे 1951 रोजी "कलर्स' मिळाले होते. तीनही दलांमध्ये प्रथम बहुमान नौदलाचा झाला होता. त्यानंतर आता पाणबुडी शाखेला हा बहुमान परत मिळणार होता. या शाखेने युद्ध व शांतता या दोन्ही पातळ्यावर काम केल्याची जाणीव ठेवून हा बहुमान मिळणार होता. राष्ट्रपतींचे निशान (प्रेसिडेंट कलर्स) हे भारतीय नौदलाला शौर्य आणि जिद्द याचे प्रतीक म्हणून प्रदान करण्यात येत होते. विशाखापट्टणमच्या कार्यक्रमानंतर सहाच दिवसांनी मुंबईला पूर्ण भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी नौदलात समाविष्ट झाली. या "बारशा'लाही मला निमंत्रण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. येथेही तीच शिस्त, तशीच सुरक्षा व्यवस्था. नावानिशी दिलेली निमंत्रणपत्रिका "के. कृ. महाजन यांच्या पत्नी, ज्येष्ठ पाणबुडीकर' ही पत्रिका गळ्यात घालून मिरवताना अभिमान वाटला नवऱ्याचा. महाजनांबरोबर काम केलेले अभियंता, कमांडर रामनाथन हे महाजनांच्या कामाची पद्धत व शिस्तबद्ध नियोजन याविषयी बोलले. आताच्या "कलवरी'चे कॅप्टन श्रीकृष्ण मेहेंदळे यांचे वडील ज्येष्ठ पाणबुडीकर कमांडर दिलीप मेहेंदळे यांनी महाजनांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर जोर दिला. खूप कौतुकाने सांगितले, की महाजनांनी त्यांना आयएनएस वीरबाहू येथे शिकवले होते. मी पुन्हा जुन्या काळात पोचले होते. कित्येक पाणबुडीकर भेटले, ज्यांची जिद्द व आत्मविश्‍वास कमी झालेला नाही. मत्स्योत्पादन व आयात-निर्यात यात प्रावीण्य मिळवून एक हजार माणसांना रोजगार उपलब्ध करून देणारे अंजेनेल्यू अजूनही पाणबुडी शाखेत मिळालेल्या प्रशिक्षणाला महत्त्व देतात. समोरच "कलवरी' दिमाखात उभी होती. नौदल व फ्रान्सच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या प्रोजेक्‍ट 75 अंतर्गत ही पाणबुडी माझगाव गोदीत बांधण्यात आली. मल्याळम भाषेतील "कलवरी' या शब्दाचा अर्थ "टायगर शार्क' असा आहे. चपळपणा, शक्ती व दुसऱ्यांवर चढाई करून जाण्याची जिद्द या गोष्टी एका पाणबुडीत असायलाच हव्यात ना!

पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही पाणबुडी देशसेवेसाठी नौदलात येणार आहे. समुद्रावर भारताची सत्ता राखणार आहे. भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे हा. देहावर रोमांच उभे राहिले होते. मन भारून आणि डोळे भरून आले होते. "ज्येष्ठ पाणबुडीकर' म्हणून पहिल्याच रांगेत बसले होते. वाटले की हा मान खरे तर माझ्या नवऱ्याचा. त्यांच्या वतीने मी आहे इथे. माझ्यातून तेच उपस्थित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr jyotsna mahajan write article in muktapeeth