वंदे मातरम्‌

डॉ. कल्याणी बोंद्रे
शनिवार, 26 जानेवारी 2019

वंदे मातरम्‌ ... रोमांच उभे राहतात. मग आपण वेगळ्या चालीत गायलेले हे गीत इतरांबरोबर गाताना किती आनंद होत असेल!

वंदे मातरम्‌ ... रोमांच उभे राहतात. मग आपण वेगळ्या चालीत गायलेले हे गीत इतरांबरोबर गाताना किती आनंद होत असेल!

एक शास्त्रीय गायिका म्हणून गेली अनेक वर्षे संगीताची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्याचबरोबरच अर्थशास्त्रात पीएच.डी. असल्यामुळे गेली काही वर्षे मी एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवते आहे. या दोन गोष्टी एकमेकांपेक्षा कितीही वेगळ्या असल्या, तरी मला कायमच त्यातून नवीन अनुभव मिळाले. महाविद्यालयामधील तरुण मुलांमुलींपर्यंत आपले अभिजात संगीत पोचवण्याच्या हेतूने अनेक सांगीतिक प्रयोग माझ्याकडून होत गेले. त्यातील एक सुंदर उपक्रम म्हणजे गेल्या सव्वीस जानेवारीला प्रसारित झालेले "वंदे मातरम्‌'. नवीन चालीवर मी स्वरबद्ध करून गायलेले बंकिमचंद्र चॅटर्जीलिखित "वंदे मातरम्‌'! माझा एक विद्यार्थी म्हणाला, ""आमच्या ग्रुपला एक म्युझिक-व्हिडिओ करण्याची इच्छा आहे आणि आपण त्यात आपल्या स्वतःच्या शैलीत "वंदे मातरम्‌' गावे अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे.'' मला ही कल्पना आवडली, पण या मुलांचे ते करण्याबाबत किती गांभीर्य आहे, किती कष्ट घ्यायची तयारी आहे, याची मी आधी खात्री करून घेतली. मगच मी या व्हिडिओमध्ये संगीत देऊन गायन करण्याबद्दल होकार दिला.

आपल्या देशाची संस्कृती, संगीत व नृत्य त्यातून रसिकांपर्यंत, खासकरून तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचा माझा हेतू होता. त्यामुळे जी चाल मी तयार करीन ती कोणत्या तरी रागावरच आधारित असली पाहिजे, असे मी ठरवले. सहज एक दिवस मला भीमपलास रागात एक चाल सुचली आणि मी ती लगेच मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवली! नंतर शांतपणे ती परत ऐकली आणि असे वाटले, की यातून एक छान गीत तयार होऊ शकेल. भीमपलास रागातील भक्तिमय आणि सखोल भाव देशप्रेम व्यक्त करण्यासाठी अतिशय योग्य ठरला. या गीतात "कोरस'चा वापर केला. त्यातही माझे विद्यार्थी गायले व त्यानंतर व्हिडिओ अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आला. आज एक वर्षानंतर मला अतिशय समाधान वाटते आहे, कारण आम्ही तयार केलेले हे गीत सर्व "ई-प्लॅटफॉर्म्स'वर गाजते आहे आणि त्याच्या "कॉलरट्यून्स' सर्व मोबाईल सेवांसाठी उपलब्ध आहेत. मी त्या सर्वांबरोबर "वंदे मातरम्‌' गाते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr kalyani bondre write article in muktapeeth