खारीचा वाटा

डॉ. कांचनगंगा गंधे
गुरुवार, 3 मे 2018

खारीच्या वाटेनं नजर फिरवत नेली की पिकलेलं रामफळ दिसतं. एखाद्या पक्ष्यानं साल सोललेली. मग त्यात खारीचा वाटा.

खारीच्या वाटेनं नजर फिरवत नेली की पिकलेलं रामफळ दिसतं. एखाद्या पक्ष्यानं साल सोललेली. मग त्यात खारीचा वाटा.

अनेक वर्षांचा माझा "सखा' नसानसातून उत्साह ओसंडून वाहात असलेला, मऊ-मुलायम पोपटी, हिरव्या कधीतरी पिवळ्या नाजूक पताका सतत झळकावणारा, मोतीया रंगाच्या फुलांचे गुच्छ घेऊन मिरवणारा अन्‌ रंगाच्या उभ्या रेघांच्या झिरमिळ्या लटकवत, किडे मकोडे अन्‌ पक्ष्यांनाही अंगाखांद्यावर खेळायला आमंत्रण देणारा, मनाने अतिशय निर्मळ अन्‌ हळवा असलेल्या माझ्या "दारीच्या शेवग्याचं' शरीर थकलं! गेल्या वर्षीच्या पावसात मी परगावी गेले तेव्हा तो उन्मळून पडला. नेमका तेव्हाच...? खिडकीच्या बाहेर खूप भकास वाटायला लागलं. दुसरं झाड...नकोच!

शेजारच्या इमारतीच्या आवारातल्या रामफळाच्या झाडाच्या फांद्या माझ्या खिडकीतून दिसायला लागल्या. त्याला आता शेवग्याचा अडथळा नव्हता. काही दिवसांतच त्या फांद्यांना उपफांद्या, डहाळ्या फुटल्या. पण अगदीच कशातरी खाली लोंबणाऱ्या. पानं मोठी हिरवी. त्यावरच्या जाड रेषांचं जाळं कायम खाली झुकलेले. शेवग्यासारखा तर त्यांच्यात उत्साह नव्हताच, पण त्यांच्याकडे बघितल्यावर निरुत्साहच जास्त वाटायचा. पानांना येणाऱ्या उग्र कडवट वासामुळे पक्षीच काय पण किडेमकोडे फिरकायचे नाहीत. नाही म्हणायला दुपारी केव्हातरी एखादा कावळा काव काव करून जायचा. बाकी सामसूम. काही दिवसांनी फांद्यावर, डहाळ्यावर, पानांच्या जवळ काही तरी वेगळं दिसायला लागलं. हो नक्कीच त्या पोपटी कळ्या होत्या. मला थोडं बरं वाटलं. आता निदान काहीतरी हालचाल फांद्यावर दिसेल अशी आशा वाटली. तीन आत, तीन बाहेर असलेल्या पाकळ्यांची फुलं उमलली. तीही खाली झुकलेली. किडेमकोडे आता झाडावर हजेरी लावायला लागले. एखाद्या दिवशी अधूनमधून दिसायला लागला. रामफळाला जाग यायला लागली. खारूताई एखाद्या वेळेस फांद्यावरून सरसर पळायची.

हिरवी कच्ची, थोडी गोलसर फळं फांद्यावर लोंबायला लागली. झाड आता थोंड वेगळं वाटायला लागलं. रोज त्याचा रंग, आकार बदलायला लागला. फळांचा देठ चांगला जाडजूड आणि टणक व्हायला लागला. देठ आणि फांदीचा भाग यामध्ये मोठी वर्तुळाकार खोलगट एक जणू लक्ष्मणरेषा होती. अजूनही फळाला खोडाकडून अन्न पुरवलं जात असल्याची ती निशाणी होती. फळ पक्व झालं की दोहोंमधलं नातं संपणार होतं. फळं आता कच्ची राहिली नाहीत. ती पिकायला लागली. देठाकडच्या फळाचा रंग फिक्‍कट गुलबट, पिवळट, केशरट रंगाचं मिश्रण असल्यासारखा दिसत होता, अन्‌ त्यातूनच फळाच्या खालच्या बाजूला पसरल्यासारखा मोतीया रंग! फारच अप्रतिम! सकाळच्या उन्हात तर हे रंग विलक्षण दिसायचे. कोकीळ, बुलबुल हजेरी लावून जायचे. खार आरडाओरडा करत लक्ष्मणरेषेपर्यंत येऊन जायची.

चैत्र सुरू झाला. झाडांवर नवीन पालवी यायला लागली. रामफळांवर मात्र त्याची निशाणी नव्हतीच. तरी उत्साहाचं वारं वाहायला लागलं! कोकीळ आंब्याच्या झाडावरून रामफळाच्या झाडावर येऊन कुहूकुहू करायला लागला. आजूबाजूला बघून हळूच फळाजवळ यायला लागला. फळ पिकलंय का नाही याची बहुधा चाचपणी करत असावा. तुरेवाला, लालबुड्या बुलबुलही हजेरी लावायला लागले. सूर्यपक्षीही कधी तरी यायचा. पण त्याचं फळांकडे लक्ष नसायचं. फळं आता पूर्ण पिकली. देठाकडे आत दबल्यासारखं दिसायला लागलं. आकार बदलला. हृदयाकृती झाला. रंग अधिकच गडद झाला. फळ आता गरदार अन्‌ तजेलदार दिसायला लागलं. झाड आता जिवंत वाटायला लागलं. कोकीळ, खारीच्या फेऱ्या वाढल्या.

सकाळी कोकीळ फळांपर्यंत यायचा. फळाला चोच मारायची लकब खूप छान वाटायची. एक दोन दिवसातच चोच मारून फळाची साल थोडी सोलण्यात त्याला यश आलं. त्याच्या सखीला बोलवत होता. पण तिला बहुधा रामफळात रस नव्हता. ती कधीच झाडावर दिसली नाही. झाडावर आता खारीची चपळाई वाढली. त्यामुळे कोकीळही सावध झाला. ती जरा दूर गेली की कोकीळ यायचा आणि सालीच्या लगतचा आतला गर खायचा. तो दुसऱ्या फांदीवर गेला की तुरेवाला यायचा. खारीला तर रामफळ फक्त माझंच आहे असं वाटत असावं. कोकीळ, कावळा, बुलबुल अगदी तिच्या जवळून उडायचे तिला हाकलण्यासाठी. पण ती रामफळाच्या जवळ असायचीच. तिचं फळातला गर खाणं, पाहाणं म्हणजे तिच्या शरीराच्या लवचिकतेची कमाल बघणं, फळ खाण्यासाठी येताना मात्र ती अजिबात ओरडायची नाही. फळाच्या देठावर मागचे पाय घट्ट रोवायची.

पुढचे पाय आणि तोंड फळातल्या गरापर्यंत नेऊन उभीच्या उभी लटकत गर खायची. तेव्हा तिला जगाचा विसर पडायचा. तिच्या धक्‍क्‍यानं फळाची दिशा बदलली. तरी ती पठ्ठी एखादा फिरकीचा सांधा फिरवावा तसा पंजा घोट्याभोवती फिरवायची. शरीराची विलक्षण लवचिकता! मल्लखांबपटूच जणू! पक्ष्यांकडून रामफळाची साल निघाली की आतल्या गराचा हक्क जणू तिचाच. एका वेळेला गर ती कधीच खायची नाही. थोडा गर खाऊन झाला की ती फांद्यांवरून चपळाईने फिरून यायची, दुसरं एखादं फळ पक्व झालं की नाही बघायला. झाडावरची सगळी रामफळं तिचीच. पूर्वीपासूनच तिच्या घराण्याला साक्षात प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त आहे ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr kanchanganga gandhe write article in muktapeeth