दाम करी काम

डॉ. एम. बी. साबणे
बुधवार, 28 जून 2017

देवाच्या भेटीसाठी यात्रेला निघाले. मस्त प्रवास झाला. पण परतीच्या मार्गावर बोगी स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आली. ती रात्र फारच भीतिदायक होती. दुसऱ्या दिवशी बोगी पुन्हा गाडीला जोडण्यासाठी पैसाच पावला.

देवाच्या भेटीसाठी यात्रेला निघाले. मस्त प्रवास झाला. पण परतीच्या मार्गावर बोगी स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आली. ती रात्र फारच भीतिदायक होती. दुसऱ्या दिवशी बोगी पुन्हा गाडीला जोडण्यासाठी पैसाच पावला.

आमचं लग्न होऊन दीड वर्ष झालं होतं. आई, मावशी, पत्नी आणि मी असे चौघेजण काशीयात्रेला निघालो. आमची ही तरुणपणातील पहिलीच काशीयात्रा. डब्यात चाळीस- पंचेचाळीस ज्येष्ठ यात्रेकरू होते. त्यात काही वकील, शिक्षक-शिक्षिका होत्या. एक अर्धा श्रावणबाळ, जो आपल्या 75 वर्षाच्या आईला घेऊन काशी यात्रेला निघाला होता. कंपनीचे मालक तरुण होते. मराठी माणसाने धंद्यात पडावे या ईर्षेने ते या व्यवसायात पडले होते. त्यांनी आमची अनेक मुक्कामी स्वतंत्र व्यवस्था केली होती. ज्येष्ठ गप्पा मारायचे. सासू-सून त्यांच्या लढाईचे रसभरीत वर्णन किंवा नाटकाचा प्रसंगही चालत्या गाडीत दाखवला जाई. कधी मुलांचे प्रताप, त्यांचा त्रास यावरही कीर्तन होई. आई, मावशीला घेऊन काशीला चाललो याचे कौतुकही होत होते.

आमचा मुक्काम दिल्लीत होता. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचे ठरले. भेटीची वेळ मिळाली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ठरलेल्या वेळी बंगल्यात प्रवेश दिला. बागेत सतरंजीवर बसलो. इंदिराबाई घरातून बाहेर आल्या. आम्ही बसलो होतो तेथेच थेट आल्या. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व, सौजन्यपूर्ण चेहरा पाहून आम्हाला आनंद झाला. शंभर कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटतो आहोत याचंच आम्हाला अप्रूप होतं. माझ्या पत्नीने इंदिरा गांधी यांच्याशी ओळख करून दिली. ""आम्ही सर्व पुण्याहून काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन, काशीयात्रा करण्यासाठी आलोत, आपणास भेटून आनंद झाला,'' असे सांगितल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला. एकेकाळी त्या हुजूरपागेत शिक्षण घेत होत्या. त्यामुळे त्यांना पुण्याविषयी खूप आस्था होती.

हरिद्वार, हृषीकेश करून आम्ही गयेच्या विष्णुपदावर पोचलो. विष्णुपद हे महत्त्वाचे स्थळ आहे. एका गोलाकार, मोठ्या खडकावर श्रीविष्णूंच्या पावलाचा ठसा उमटलेला आहे, ही लोकांची भावना आहे. या पदावर अनेकजण आपल्या पितरांचे किंवा स्वतःचे सुद्धा जिवंतपणी श्राद्ध करतात. तेथून आम्ही कोलकोत्याच्या दिशेने निघालो. आमची बोगी बाजूला काढून पॅसेंजर ट्रेनला जोडली होती. कारण आम्ही स्टेशनवर उशिरा पोचलो होतो. रेल्वेचं वेळापत्रक बिघडलं त्याची शिक्षा म्हणून बोगी पॅसेंजरला जोडली गेली. कोलकोता जवळ येऊ लागले तसे गाडी थांबविण्यात आली. आमची बोगी बाजूला काढली आणि गाडी निघून गेली. ज्या ठिकाणी आमचा डबा उभा केला होता तेथे प्लॅटफॉर्म नव्हता. तेथे पिण्याचे पाणी व रस्ता अशा सुविधा नव्हत्या. आजूबाजूला दारूडे, जुगारी, मारामारी आणि इतरही धंदे चाललेले होते. संध्याकाळ झाली. सर्वत्र अंधार झाला. रेल्वेने खांबावरचे मिणमिणते दिवे लावले. मद्यपींची आपापसांत मारामारी सुरू झाली. त्या दारूड्यांच्या त्रासापासून व डासांपासून वाचविण्यासाठी बोगीची दारे, खिडक्‍या बंद केल्या. डब्यात रॉकेल व मेणबत्यांचा उजेड पसरला. ज्येष्ठांनी शांताकारम्‌, हनुमानस्तोत्र, रामरक्षा म्हणायला सुरवात केली. नाही उजेड, ना वारा, त्यात उन्हाने तापलेला डबा, बाहेरून मद्यपींचा धिंगाणा. आम्ही गुदमरून गेलो. नशिबाने आमच्यावर अत्याचार, लुटालूट वगैरे झाली नाही.

रोजचा खर्च वाढत होता. उद्या आपण रेल्वे ऑफिसमध्ये जाऊ असं म्हणून डोळे मिटले. झोपेत स्टेशन मास्तर दिसत होता. पहाट झाली, चिमण्यांचा चिवचिवाट झाला. घाबरू नका, धीर धरा, असं त्या आम्हाला सांगत असाव्यात असं वाटलं. बोगीतून आम्ही चोरट्यासारखे बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आलो. भडंग-मुरमुरे यांच्या गाड्या दिसल्या. एक दोन स्वीटची दुकाने दिसली. त्या दुकानातील रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला. तेवढाच पोटाला आधार मिळाला. रस्त्याला ब्रिटिशांच्या काळातील इमारती दिसल्या. मुंबई आणि कोलकत्यात फार फरक जाणवला नाही. जाता जाता हावडा ब्रीज पाहिला. नटश्रेष्ठ अशोककुमार आठवला. आम्ही रेल्वेच्या ऑफिसमध्ये आलो. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे असा खेळ करीत नेमक्‍या अधिकाऱ्याला गाठला. तेव्हा दुपारचा एक वाजला होता. तो अधिकारी स्थानापन्न झाला. तोंडात पानाचा तोबरा भरला. अर्ध इंग्रजी-बंगाली. ती भाषा आम्ही समजून घेतली. आमचं म्हणणं त्याने ऐकून घेतलं. तुमची गाडी लेट आली. वेळापत्रक ऍडजेस्ट करायला कष्ट पडतात माहीत आहे का? एक्‍स्प्रेसला जोडायचा तर एक हजार द्या, आता ऑर्डर देतो. असं म्हणून तो खुर्ची सोडून जो गेला तो चार वाजता उगवला. अडला हरी... असल्या मराठी म्हणी मनात घोळवून झाल्या. तो अधिकारी शरीराने धिप्पाड, काळाकुट्ट, जाड काचांचा चष्मा, तोंडात पान आणि त्याचे शिंतोडे आम्ही झेलत होतो. नाइलाजाने पैसे देऊन ऑर्डर घेतली. अखेर यार्डात पडलेला बेवारशी डबा एक्‍स्प्रेसला जोडला गेला. देवासाठी यात्रा केली आणि अनुभव आला - सबसे बडा रुपैया!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr m b sabane wirte article in muktapeeth