लोहगडची जिद्दी कन्या

डॉ. एम. बी. साबणे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तिच्या आयुष्यात किती खडतर वाटेवरचा प्रवास होता. कधी काळोखातून, तर कधी भरदुपारी. दगडधोंड्यांतून ठेचकाळत, तर कधी गवताची कुसळे बोचत. तरीही ती हसतमुख आहे.

तिच्या आयुष्यात किती खडतर वाटेवरचा प्रवास होता. कधी काळोखातून, तर कधी भरदुपारी. दगडधोंड्यांतून ठेचकाळत, तर कधी गवताची कुसळे बोचत. तरीही ती हसतमुख आहे.

मावळातील कादव हे प्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे गाव. कादवच्या मावशीच्या (प्रभावती भोपळे) घरी कार्तिकी एकादशी उत्साहाने साजरी करीत. गावातील लोक असतच, शिवाय तुंग, तिकोना, आंबेगाव, लोहगड येथील लोक आवर्जून हजेरी लावत. रात्री आरत्या-टाळ यांनी घर दुमदुमून जाई. मंत्रपुष्पांजली चढाओढीने म्हटली जात असे. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा बंड्या (प्रभाकर दिघे) याच्या सुरेल आवाजाने आरत्यांना उठाव येई. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे अंध वडीलही येत. बंड्याचा आधार घेऊन ते गावोगावी जाऊन पौरोहित्य करीत. मध्यंतरी एका लग्नात बंड्याची धाकटी बहीण, पंचाहत्तर वर्षांची पुष्पा भेटली. लोहगडच्या या कन्येने गेल्या साठ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला.

पुष्पा सांगत राहिली आणि मी ऐकत गेलो.
तिचे आई-वडील अंध होते. मोठा भाऊ वयाने लहानच. तो काय शेती करणार? भातशेती कुळाकडे कसण्यासाठी दिली. लोणावळा, भाजे- मळवळी, कादव, तुंग- तिकोना या गावांत जाऊन दादा पूजा-अर्चा करीत असे. जाता-येता डोंगर उतरून दहा किलोमीटर चालून फार कष्ट करूनही फार काही गाठीशी पडायचे नाही. तिला कळायला लागल्यापासून तिच्या घराची आर्थिक घडी विस्कटलेली होती. आर्थिक फटके बसतच होते. शेतीचे उत्पन्न नाही. एकवेळच्या अन्नाची भ्रांत पडत असे. म्हणून तिने आणि दादाने दुधाचा धंदा करायचे ठरवले.

त्या दोघांनी खूप खटपट करून पैसे उभे केले. त्यातून त्यांनी म्हैस खरेदी केली. ती म्हशीची स्वच्छता, मलमूत्र, आंबवण- चारापाणी करायला शिकली. दूध कसे काढायचे त्याचे तंत्र शिकून घेतले. शिवाय स्वयंपाक; तो तर ती लहान असतानाच शिकली. दोन घास पोटासाठी कष्ट करायचे, यातूनही चांगले दिवस येतील अशी जिद्द त्या बहीण-भावाची होती.

ती दोघे पहाट व्हायच्या आत म्हणजे चार वाजता उठून कामाला लागत. पुष्पा लोणावळ्याच्या शाळेत चौथीत होती. घरच्यांचा व स्वतःचा दिवसभराचा डबा आणि दुधाच्या भरलेल्या कळश्‍या घेऊन लोहगड उतरावयास सुरवात करी. तांबडी माती आणि दगड-गोट्यांनी भरलेली पाऊलवाट, दुतर्फा बाभळी, शेवरी, करवंदांच्या जाळ्यांची गर्द झाडी. पाऊल फार जपून उचलावे लागे. पावसाळ्यात तर तिला कसरत करावी लागे. गडावर पडणारा पाऊस तांबड्या डोळ्याने- क्रोधी होऊन डोंगर उतरत असे. पुष्पा दुधाच्या कळश्‍या सांभाळत, सुसाट वाऱ्याबरोबर गप्पा मारत, ठेचकाळत मळवली गाठायची. वाटेत कीटक, बेडूक, कोल्हे, सापांची पिल्ले तिच्या पायाला स्पर्श करून जात. उन्हाळ्यात कुसळदार गवत, करवंदाच्या जाळीत लपलेले प्राणी यांची साथ; पण कष्टाशिवाय पर्याय नव्हता. मळवलीला या काळ्या, बुटक्‍या मुलीकडच्या दुधाच्या कळश्‍या शाळेचे विद्यार्थी किंवा इतर प्रवासी लोकलमध्ये उतरून घेत. कष्ट आणि जिद्दीने चौदा म्हशी गोठ्यात बांधल्या. संध्याकाळच्या लोकलने पुन्हा मळवली गाठायची. अंधारात गड चढून दोन तासाने घर गाठत असे. उपाशी जनावरे तिची वाट पाहात असत. ती घरी आली म्हणून हंबरून तिचे स्वागत करीत. जनावरांची वैरण, आंबवण, दूध काढणे, तापवणे आणि स्वयंपाक करून पाठ जमिनीला लागायला तिला अकरा वाजत. एवढी तालीम झाल्यावर अभ्यास कसा होणार? व्याप वाढला, पैशांची आवक झाली; पण कष्टात.

तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आणि परीक्षेआधीच थांबले. अठराव्या वर्षी तिचे लग्न झाले. पती पोलिस खात्यात. सतत बदली. पुष्पा लग्न झाल्यावर भोर येथे राहायला गेली. घरात वयस्कर मंडळी जास्त. त्यांचे सर्व आदराने काम केले. घरकामात वेळ काढून बाहेरून सातवीची परीक्षा दिली. उत्तीर्णही झाली. पतीची बदली येरवड्याला झाली आणि सर्व कुटुंब पुण्यात आले. योगायोगाने पुष्पाला माळवाडी (तळेगाव- दाभाडे) येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली. मुला-मुलींत तिचे मन रमत असे. भोरला ती सायकल शिकली होती, त्याचाही पुण्यात उपयोग झाला. जांबे (मुळशी), हातनोशी (भोर) येथेही नोकरी केली. अशी वणवण करीत आयुष्य काढले. अखेरीला मुख्याध्यापक झाली.

आता तरी निवांतपणा लाभेल असे तिला वाटले; पण सुख दिसत नव्हते. दुःख अजून सोसायचे होते. तिचा ज्येष्ठ पुत्र डॉक्‍टरांकडून तपासून घेऊन आला होता. तासाभराने पुन्हा छातीत दुखतेय म्हणून डॉक्‍टरांना फोन करीत असतानाच त्याच्या हातातून फोन गळून पडला. फोन लोंबकळत राहिला. पुष्पाने पुन्हा त्या लहान नातवांकडे पाहून कंबर कसली. तिचे बालपण, तरुणपणाचे मौल्यवान दिवस अळवावरचे दवबिंदू होते. नव्या जोमाने, जिद्दीने ती उभी राहिली. सर्व संकटांशी दोन हात करीत ती इथपर्यंत आली. खडतर आयुष्याच्या वाटेवर काही सुखाचे क्षण तिच्या झोळीत टाकले गेले. झाले गेले ते गंगेला मिळाले, म्हणत ती आज समाधानी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr m b sabne write article in muktapeeth