"झोंबी'कारांची एक आठवण

डॉ. महावीर जिनगोंडा पाटील 
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

27 नोव्हेंबरला लेखक आनंद यादव यांचा पहिला स्मृतिदिन झाला. त्यानिमित्ताने त्यांची एक आठवण आपणाशी शेअर करावी वाटली... 

"झोंबी' ही कादंबरी 90 च्या दशकात प्रकाशित झाली. आनंद यादवांची ही कादंबरी लोकप्रिय झाली. कादंबरी वाचून माझे मनही अस्वस्थ झाले. त्यांना एकदा भेटायचे असा निश्‍चय केला. जवळ जवळ 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यादव यांना भेटण्याचा योग आला. बेळगावचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटोपून ते आपल्या कागल येथील घरी आले होते. 

हे खात्रीलायक वृत्त कळताच मी व माझे शिक्षक मित्र पाटील पूर्वनियोजित वेळेनुसार कागल येथील सणगर गल्लीत त्यांच्या घरी पोहचलो. तो दिवस होता 1 मे 2000. मनात थोडी भिती होतीच. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लेखकाला भेटण्याचा प्रसंग आला होता. थोड्याच वेळात यादव सर हॉलमध्ये आले. प्रथमदर्शनीच त्यांचे व्यक्तिमत्त्व आमच्यावर छाप पाडणारे होते. यादवसरांनी आमची विचारपूस केली. आम्ही गोविंदराव टेंबे यांच्या गावचे आहोत, हे समजल्यावर त्यांना विशेष आनंद वाटला. हळूहळू साहित्यीक चर्चेने गती पकडली. चर्चा अर्थातच यादव सरांच्या साहित्याबद्दल होती. केंद्रस्थानी "झोंबी' हे पुस्तक होते.

यादव सर म्हणाले, आमच्या घरात मागच्या पिढीत कुणीही शाळेची पायरी चढली नव्हती. पण मला सुरवातीपासूनच शाळा व मराठी साहित्य यांची आवड होती. वेड होते. या वेडामुळेच प्रचंड कष्ट घेत घेत मी इंथवर पोहचू शकलो. "झोंबी' वाचून अनेकांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण केले आहे, अशी अनेक पत्रे मला वारंवार मिळत आहेत याचे मला समाधान वाटते. 

चर्चेच्या ओघात पु. ल. विषयी ते भरभरून बोलले. ते म्हणाले, ""माझ्यातील साहित्यिक पहिल्यांदा पु. ल. नी ओखळला. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. "हिरवे जग' हा माझा कवितासंग्रह त्यांना फार आवडला. व्यंकटेश माडगूळकर यांचे सुद्धा माझ्यावर अनंत उपकार आहेत. पु. ल. व माडगूळकर यांनी मला लिहित केलं.'' 
जवळ-जवळ दोन-अडीच तास आमच्याशी त्यांनी मुक्तपणे गप्पा मारल्या. चित्रपट क्षेत्रात मात्र त्यांनी कटाक्षाने प्रवेश टाळला. आमच्यासारख्या अनोळखी लोकांशी ते मनमोकळेपणाने बोलले. शेवटी आम्ही सरांचा निरोप घेतला. सर आम्हाला पोहचवण्यास अंगणात आले. बाहेर कडक उन्हं पडले होते. सर म्हणाले, ""डॉक्‍टर या कडक उन्हात तुम्ही गावी कसे जाणार?'' 

मी सहजच म्हणालो,'' सर आम्ही शेतकऱ्याची मुलं, आम्हाला कुठलं उन्ह लागतयचं ! या वाक्‍यासरशी सरांचा चेहरा फुलला. मला जवळ बोलवून घेतले. पाठीवरती हात ठेवला व म्हणाले, ""आपण शेतकऱ्याची मुलं आहोत हे कधीही विसरू नका.'' सरांच्या या शब्दामुळे आम्ही रोमांचित झालो. सरांचा निरोप घेतला व गावी निघालो. 

यानंतर सरांचे व माझे सूर चांगले जुळले. फोनवरून संवाद साधणे, प्रसंगी पत्राद्वारे एकमेकांचे मनोगत व्यक्त करणे सुरू होते. असाच एकदा मला सरांचा मला फोन आला. म्हणाले, ""मला तुमच्या सांगवडे गावी यायचे आहे. तुमच्या गावातील नृसिंहाचे दर्शन घ्यावे अशी इच्छी झाली आहे.'' 
मी म्हणालो, ""कागलला घरी आलात, तर मला फोन करा. बाकीची येण्या-जाण्याची व्यवस्था मी करतो.'' 

थोड्याच दिवसात तो सोन्याचा दिवस उगवला. ते आमच्या सांगवडे गावी आपल्या पुतण्यासह आले. आम्ही सर्वजण नृसिंहाच्या मंदिरात पोहचलो. ते जुन्या आठवणीत गुंग होवून गेले

ते म्हणाले, "" हे पारकट्ट्यावरचे पिंपळाचे झाड, पानांची सळसळ, हे देवळाचे भव्य शिखर जसच्या तसं आहे.'' देवदर्शन घेत असताना त्यांना वेगळाच आनंद झाला होता. देवळाच्या आवारात एका मोकळ्या हॉलमध्ये सरांचे व्याख्यान आयोजित केले होते.

यादव सर म्हणाले, ""मित्रहो, 50 वर्षांपूर्वी कागलहून मी व माझी आई पायी पायी नृसिंहाच्या दर्शनाला आलो होतो. आज 50 वर्षांनी याच देवळाच्या आवारात माझं मनोगत मांडण्यासाठी मी उभा आहे. आनंदाने माझं मन भरू आले आहे.'' या पहिल्याच वाक्‍याने समोर बसलेले गावकरी रोमांचित झाले. खेड्यातील तरुणांनी जीवनात कसे यशस्वी व्हावे, याचा एक परिपाठ त्यांनी घालून दिला. त्या दिवशी अखंड 7 तास आम्ही त्यांच्या सहवासात होतो. हा दिवस आमच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Mahavir Patil article