अँडीज पर्वतरांगेच्या छायेत

डॉ. मंगला जोशी
बुधवार, 17 जानेवारी 2018

अर्जेंटिना आणि चिली यांच्या सीमारेषेवरचा प्रवास गारठविणारा अनुभव देतो. एकीकडे तुफानी वारे, गारढोण करणारी थंडी आणि दुसरीकडे कधी हिरवाई, कधी निळे पाणी, तर कधी हिमशुभ्र नद्यांचे दर्शन. हवेहवेसे वाटणारे हे भटकणे होते.

अर्जेंटिना आणि चिली यांच्या सीमारेषेवरचा प्रवास गारठविणारा अनुभव देतो. एकीकडे तुफानी वारे, गारढोण करणारी थंडी आणि दुसरीकडे कधी हिरवाई, कधी निळे पाणी, तर कधी हिमशुभ्र नद्यांचे दर्शन. हवेहवेसे वाटणारे हे भटकणे होते.

पॅटागोनिया म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांतील दक्षिण टोकाच्या जवळपासचा पठारी प्रदेश. अँडीज पर्वतरांगेच्या छायेतील काहीसा खडकाळ, तुफानी वाऱ्यांच्या प्रभावाखालचा, एका बाजूला चिलीमधील फिर्योर्डने वेढलेला. येथे ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या आहेतच, पण केप हॉर्नच्या टोकापर्यंत गेल्यावर अटलांटिक आणि प्रशांत महासागर एकत्र मिळालेलेही दिसतात. एकीकडे गोठवणारी थंडी, धुवाधार हिमवृष्टी, फियोर्डचा रोमांचकारी देखणा सहवास आणि मैलान्‌मैल पसरलेल्या खुरट्या झुडपांत दिसणाऱ्या मेंढ्या अन्‌ हरणे.

या पठारी प्रदेशांवर तुफानी वावटळीसारखे वारे खूप वेळा तुमचा सहलीचा कार्यक्रम बदलून टाकतात. उभी असलेली वाहनेसुद्धा जपावीच लागतात. गटागटाने हिंडताना आपण उडून तर जाणार नाही ना, ही धास्ती वाटतेच. अर्जेंटिनाच्या मानाने चिलीत जास्त हिरवाई आहे. प्रशांत महासागरामुळे पाण्याची मुबलकता आहे. चिलीची राजधानी डोंगरांनी वेढलेली आहे. सांतियागो येथे हवेचे प्रदूषण जास्त आहे. पण इतर सर्व भागात हवा शुद्ध. दोन्ही देशांत भाषा स्पॅनिशच बोलली जाते. ब्राझील या दक्षिण अमेरिकेतील मोठ्या राज्यांत पोर्तुगीज भाषेची चलती आहे. युरोपीय देशांचा प्रभाव दोन्ही देशात जाणवतो. चिलीचे नागरिक हसतमुख. सदैव मदतीला तयार. "स्टेला ऑस्ट्रालिस' या शाही बोटीतील चार दिवसांच्या वास्तव्यात चिली मंडळींची अगत्यशीलता खूपच अनुभवली. पुंता ऍरिनास या शहरापासून "स्टेला ऑस्ट्रालिस'चा प्रवास सुरू होतो. मॅगेला या सामुद्रधुनीतील काही बेटांतून वाट काढत फियोर्डच्या नयनरम्य प्रवाहातून हा शाही प्रवास दक्षिणेच्या शेवटच्या शहरापर्यंत डॉसन बेटाजवळून जातो. नयनरम्य शीतल रात्री बोट प्रवास करते आणि दिवसा वाटेतील नॅशनल पार्क, आइन्सवर्थ बे, टकर्स बेटे, ग्लेशियर्स अशा ठिकाणी छोट्या बोटींतून अत्यंत सुरक्षित प्रकारे प्रवाशांना नेले जाते. त्या भटकंतीत साहस तर आहेच, पण अगत्य, सुरक्षितता नावाजण्यासारखी असते. पेंग्विन पक्षी, डॉल्फिन्स सुखद दर्शन देतात. हिमवर्षाव चकित करतो, तर सोनेरी प्रकाशांतून चमचम करणारी हिमशिखरे, ग्लेशियर्स भान हरपळून टाकतात. केप हॉर्नला वळसा घालून बोट परत उत्तरेकडे थोडा प्रवास करते आणि उशुव्वा या मोठ्या शहरी नांगर टाकते. विद्यापीठासारखी संस्था असलेले हे जगाच्या दक्षिण टोकाचे शेवटचे शहर. अंटार्क्‍टिकाला जाताना सर्वच बोटी येथे मुक्काम करतात. मत्स्याहार हे येथील मोठेच आकर्षण! हे शहर अर्जेंटिनातील इतर मोठ्या शहरांना विमानसेवेने जोडलेले आहेच, पण इतर जगाला सुद्धा!
केप हॉर्नला चिली नौदलाचे शेवटचे ठाणे आहे. या अत्यंत थंड ठिकाणी कुटुंबासह राहणे हे दिव्य चिलीचे नौसेनाधिकारी देशप्रेमाने करीत असतात. डार्विनने या भागात खूप संशोधन केलेले असल्याने त्याच्या नावाची शिखरे लॅब्ज इकडील शहरांतून दिसतात. एखाद्या बेटावर उन्हासाठी टोप्या घालून फिरता-फिरता अचानक पाऊस पडू लागतो. पाऊस वाढतो, गारा पडू लागतात. अशा बदलत्या हवामानाची पूर्वकल्पना दिलेली असल्याने गरम कपडे, विंड चिटर पॅंटपासून अनेक आयुधे प्रवाशांना सतत बाळगावी लागतात. पण असे अनुभव खास येण्यासाठी तर ही सहल आहे. अशा थंडी गारव्यात परत बोटीवर चढत असतानाच हॉट चॉकलेट प्यायला मिळते. सुहास्य वदनाने बोटीवरील कर्मचारी ग्लास पुढे करतात तेव्हा हुश्‍श होते, त्यांच्या अगत्याने ऊबदार वाटते!

अर्जेटिनातील एल्‌ कॅलाफेट या शहरांत ब्यूनॉस आयरिस राजधानीहून विमानाने तीन तासांत पोचलो. पेरिटो मोरेनो ग्लेशियर या प्रसिद्ध ठिकाणी जाण्यासाठी जय्यत पूर्वतयारी प्रवाशांना करावीच लागते. भरपूर थंडी, अतिशीत वारे, कधी पाऊस तर कधी हिमवर्षाव अशी अनिश्‍चितता असल्यामुळे उन्हापासून ते बर्फ वर्षावापर्यंत सामना करता येईल, असा जामानिमा तयार ठेवून आम्ही सर्व प्रवासी शहरातील म्युझियम आधी बघून आलो. एकोणिसाव्या शतकात फ्रान्सिस्को मोरेनो या अर्जेटिनाच्या नागरिकाने अर्जेंटिना आणि चिलीच्या सीमांबाबत होणारा वाद समाधानकारक रीतीने सोडवला जावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली. मोरेनो ग्लेशियर त्याच्याच नावाने प्रसिद्ध पावले. मोरेनो हिमनदी खूप जुनी आहे, प्राचीन काळापासून आजतागायत त्या ग्लेशियरवर भरपूर संशोधन झालेले आहे. पेरिटो मोरेनो ग्लेशियरचे वेगळेपण असे, की जगातील बहुतेक ग्लेशियर्स बदलत्या हवामानामुळे अरुंद होत आहेत, पण हे ग्लेशियर वाढतेच आहे. "ग्लेशियॉलॉजी' हा विषय दक्षिण अमेरिकेतील विद्यापीठांतून अभ्यासला जातो आणि संशोधन करणारे तज्ज्ञ त्याविषयी माहिती द्यायला तत्पर असतात. जवळ जवळ शून्य अंशापलीकडे गेलेल्या तापमानात बोटीच्या उघड्या डेकवरून ग्लेशियरचे दर्शन घेताना भान हरपते.

या आगळ्या-वेगळ्या सहलीत नैसर्गिक संपदेचे नेत्रसुखद दर्शन झाले. दक्षिण गोलार्धांतील नभोमंडळाचे कोजागरीच्या रात्री वेगळाच सुखद अनुभव आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr mangla joshi write article in muktapeeth