बाबूजी धीरे चलना, श्‍वानसे जरा संभलना...

डॉ. नीलिमा घैसास
गुरुवार, 24 मे 2018

भटक्‍या कुत्र्यांबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार होऊनच निर्णय झाले पाहिजेत.

भटक्‍या कुत्र्यांबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार होऊनच निर्णय झाले पाहिजेत.

प्रभात फेरीसाठी आमचा नवसह्याद्री भाग रमणीय आहे. उल्हसित मनाने मॉर्निंग वॉक सुरू होता. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात पळत येताना जाणवले. वळून बघेपर्यंत एक काळा झिपरा कुत्रा वेगाने माझ्या अंगावर चढू लागला होता. भीतीने माझी गाळण उडाली. मोठी किंकाळी फोडत मी त्या कुत्र्याला लांब करू लागले. घामाने डबडबले. अंग थरथर कापत होते. त्याचे तीक्ष्ण सुळे दाखवत अंगावर झेपावणे सुरूच होते. छातीत धडधड होणे तेव्हा अनुभवले. तेवढ्यात एक मंजुळ हाक आली, "डॉलर... माय डिअर... कम हिअर' एक पन्नाशीची जीन्समध्ये कोंबलेली महिला कानात वॉकमन घालून त्याच्या तालावर थिरकत येत होती. मी रागाने त्या कुत्र्याच्या मालकिणीकडे कटाक्ष टाकला. तिनेच लाडात बोलायला सुरवात केली, "माझा हा डॉलर किनई इतका शार्प आहे, तुमचा टॉप अगदी माझ्या मुलीच्या टॉपसारखा आहे. त्यामुळेच तो तुमच्याकडे धावला. हाऊ स्वीट!'' मी घाम पुसत एक सुस्कारा टाकला व शांत सुरात तिला समजावले, ""हे सगळं तुमच्यासाठी स्वीट असेलही, पण माझी भीतीने गाळण उडाली त्याचे काय? आता तुम्ही म्हणाल, तो नाही उगाचच चावत. पण, एकदा चावून-ओरबाडून झाल्यावर नंतर काही उपाय असतो का? आपल्यासारख्या सुज्ञ माणसांच्या वागण्याचेही आपण अंदाज बांधू शकत नाही. हे तर मुके जनावरच!'' तिने आपले कुत्रे आपल्याबरोबरच सांभाळत फिरावे. असे मी तिला आडमार्गाने सुचविण्याचा प्रयत्न केला. त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःच्याच तोऱ्यात ती निघून गेली.

यावरून मला गेल्या महिन्यातील प्रसंग आठवला. मी मैत्रीण मेघनाकडे प्रथमच गेले होते. कामवाली मुलगी दार उघडून बसायला सांगून आत गेली, पण तिच्याबरोबर आलेला भला मोठा कुत्रा मात्र माझ्या पाहुणचाराला मागे ठेवला. झाले... कुत्र्याने मला आधी चाटायला सुरवात केली. शिष्टाचाराची पर्वा न करता मी पाय सोफ्यावर घेऊन बसले. मग त्याने लाडाने की रागाने देव जाणे, माझ्या मांडीवर आपले पुढचे दोन पाय ठेवून उभे राहण्याचा पराक्रम केला. माझे हाड-हाड सुरूच होते. तेवढ्यात मेघनाचा आवाज आला, ""अरे, युरो मावशी एवढी आवडली का तुला?'' "अरे बापरे! त्याला मावशी आवडली. पण मावशीचे काय!' भीती अन्‌ राग, असे विचित्र मिश्रण माझ्या चेहऱ्यावर पाहून मेघना म्हणाली, ""अगं माझ्या युरोला सारखी नवीन माणसं लागतात. आज बघ तुला पाहून कसा खूष झाला आहे लबाड!'' आता माझ्या भीतीची जागा नाराजीने घेतली होती. मेघना मात्र त्याच्या कौतुकातच गर्क होती. ""तसा तो कोणाला कधी चावत नाही, पण मागच्याच आठवड्यात त्याला जो मुलगा रोज हिंडवून आणतो, त्यालाच जोरात चावला. खूप खोलवर जखमी झाली होती.'' हे घडल्यावर तरी या लोकांनी सावध व्हायला नको का! कशावरून आज त्याने मला भक्ष्य केले नसते! पुढे सुमारे तासभर मी मेघनाकडे होते; पण एक डोळा मात्र युरोवर ठेवूनच. निघताना एक गोष्ट मात्र मनात पक्की केली, की परत मेघनाला भेटावेसे वाटले, तर तिला आपल्याकडे बोलवायचे.

कुत्रा इनामदार आहे; प्रेमळ आहे, वगैरे-वगैरे...! कुत्रे व मालक यांचे एकमेकांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. भूतदया म्हणून पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचे लाड करणेही मान्य आहे. तरीदेखील कुत्रे पाळणाऱ्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही.

पिसाळलेले कुत्रे चावण्याने योग्य ट्रीटमेंटच्या अभावी रेबीजसारखा रोग झालाच, तर त्याला औषध नाही व मृत्यू हा अटळ ठरतो. तसेच, कुत्र्याच्या विष्ठेतून टॉक्‍सोप्लासमासारखा जंतूसंसर्ग होऊन त्याचा गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो, याची जाणीव तर फारच कमी दिसते. पर्यायाने महिलांनी पाळीव प्राण्यांपासून स्वतःला जपणे आवश्‍यक असते.

भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लेखिका मंगला गोडबोलेंवरील जोरदार हल्ला हे याचे बोलके उदाहरण आहे. श्‍वानदंशानंतर घ्याव्या लागणाऱ्या रेबीज व्हॅक्‍सिनचाही सध्या तुटवडा आहे. यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. बेवारस कुत्र्यांची नसबंदी आवश्‍यक आहे. नसबंदीचा आकडा कागदावर किती दाखवला जातो, त्यातील खऱ्या किती केलेल्या असतात व त्यातील यशस्वी किती झालेल्या असतात, हा भाग वेगळाच! शिवाय नसबंदी झाल्यावरही अशा कुत्र्यांना शहराच्या बाहेर नेऊन सोडून दिले, तर त्यांचा धोका कमी होईल. "प्राणी-मित्र' संघटना या अशा धोकादायक कुत्र्यांना मारण्यास विरोध करतात. पण मग कोंबडी, शेळी, मासे प्राणी नाहीत का? कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार व्हावा.

Web Title: dr. nilima ghaisas write article in muktapeeth