कायझन

डॉ. नीलिमा घैसास
बुधवार, 3 जानेवारी 2018

प्रसंग तसा छोटासाच असतो, पण आपल्याला मनस्ताप चार दिवस पुरतो. आपण हातोहात फसवले गेल्याचे दुःख त्रासदायक ठरते. मग स्वतःपुरते छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतात.

प्रसंग तसा छोटासाच असतो, पण आपल्याला मनस्ताप चार दिवस पुरतो. आपण हातोहात फसवले गेल्याचे दुःख त्रासदायक ठरते. मग स्वतःपुरते छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतात.

गोधडी शिवा गोधडी
तुमच्या मायेची पोतडी
भागवेल ही छान थंडी
उब देईल ही हरघडी...

रस्त्यावरून जाणारी एक चाळीशीची बाई, मोठ्या तालासुरात गाणे गात, तिच्या गोधडी शिवून देण्याच्या उद्योगाबद्दल हाळी देत चालली होती. आज रविवार होता. मुलगा-सून कालच दोन दिवसांसाठी सहलीला गेले होते. अन्वी..., माझी नात आणि मी दोघीच घरी! मी अगदी निवांत बाल्कनीत उभी होते. माझ्याकडे माझी एक सुती साडी होती... जुनी, अगदी मऊ असलेली. डोक्‍यात आले, की घ्यावी गोधडी शिवून... तिला वर बोलावले... अडीचशे रुपयात सौदा ठरला. गोधडीला भर म्हणून तिने आणखी दोन साड्या देण्यासाठी सांगितले. त्याही मी चांगली रंगसंगती साधून दिल्या... शिवाय या दोन साड्या मात्र माझ्यासाठी जरा स्पेशल होत्या... खास होत्या. गोधडीला उब यावी म्हणून एक जुनी विटलेली चादरही तिने मागून घेतली. मी विचार केला, की आता गोधडी चांगली, दणकट होईल म्हणून!

थोडावेळ विचार करून, चंपा नावाची ती बाई म्हणाली, ""दोरा आणायचा विसरले आहे, तो घेऊन येते.'' पंधरा मिनिटांत हजर... दोरा अन्‌ दोऱ्याबरोबर अठरा-वीस वयाची तिची मुलगी! दोघींनी सराईतपणे काम सुरू केले... दहा मिनिटांतच आणखी दोघी आल्या... म्हणाल्या, "चौघी मिळून पटापट काम उरकतो.' दीड-दोन तासांनी त्यांनी हाक मारली, ""ताई, या बघा गोधड्या.'' एका गोधडीऐवजी दोन गोधड्या करून त्या म्हणाला, ""आता याचे पाचशे रुपये झाले.'' मी म्हणाले, ""मी तर एकच गोधडी सांगितली होती.'' त्यावर जरा घुश्‍श्‍यात चंपा म्हणाली, ""पण आम्ही तर दोन गोधड्या केल्या आहेत नं... आता पाचशे रुपये तरी द्या. नाही तर एक गोधडी घ्या... एक आम्ही घेऊन जाणार.'' मी यास तयार नाही असे दिसताच त्या सर्वजणींनी मिळून जोरदार आवाज वाढविला. कसे आहे की, प्रश्‍न पाचशे रुपयांचा नव्हता तर तत्त्वाचा होता. हातोहात त्यांनी मला फसविले होते. त्यांच्या दंग्याला तर आपण नेहमीच घाबरतो. एव्हाना आजूबाजूच्या बंगल्यातील लोक गॅलरीत यायला लागलेले पाहून मी मुकाट्याने पाचशे रुपये दिले व त्या दोन गोधड्या अक्कलखाती जमा केल्या. म्हणजे आपले आडाखे व अंदाज किती चुकीचे निघू शकतात हे जाणवले.

हा सर्व प्रकार माझी नात थोडीशी बावचळून बघत होती. पण झाला प्रकार तिच्या आई-वडिलांच्या कानावर ते आल्याबरोबर जाणार, हे तिच्या डोळ्यातील चमक पाहून मी ओळखले. मग काय त्यावर मिळणारा झाप आधीच माझ्या कानात घुमू लागला. ""चांगली मऊ ब्लॅंकेट्‌स बाजारामध्ये मिळतात, ते सोडून काहीतरी खूळ डोक्‍यात घ्यायचे.'' गोधडी करून घेण्यामागे माझी काही भावना होती. आता माझी आई हयात नाही. गोधडीसाठी दिलेल्या पैकी एक साडी आईने मला मोठ्या प्रेमाने माझ्या वाढदिवशी दिली होती. दुसरीही तिनेच आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आणली होती. या तिने मला दिलेल्या शेवटच्या भेटी ठरल्या होत्या. म्हणूनच आयुष्यभर त्या मला जपायच्या होत्या. मला वाटले, गोधडीच्या रूपाने मला तिचा सहवास जाणवेल. तिचे वात्सल्य अनुभवता येईल. त्यात मिळणारी मायेची उब "रेडिमेड ब्लॅंकेट'मध्ये कशी बरे मिळू शकेल?

नंतर माझ्या मैत्रिणींना मी मुद्दाम सावध करायला गेले, तर त्यांनी सांगितले, की "अगं, मशिनवर दोनशे रुपयांत सुरेख गोधडी शिवून मिळतात. कशाला तू असल्या नादाला लागलीस!' हे तिचे बोल ऐकले, मग तर अजूनच माझ्या जखमेवर मीठ चोळले गेले.

असे अनेक प्रसंग आपल्या सर्वांच्याच आयुष्यात घडतात... म्हटले तर किरकोळ. पण तेवढ्यापुरता का होईना, आपल्याला खूपच मनःस्ताप होतो. आपण हातोहात फसविले गेलो आहोत, याचा त्रास होतो. त्यामुळे येथून पुढे तरी अशी "डिल्स' करताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे. काय ते एकदाच सणसणीत क्‍लिअर-कट ठरवून घेतले पाहिजे व त्यावेळेस आपण एकटे-दुकटे न राहता आपल्या बरोबरही आपली चार माणसे ठेवली पाहिजेत. अशातच अनुभवाने शहाणपण येते... चुका केल्याने अनुभव येतो... दुसऱ्याच्या अनुभवातून शहाणपण शिकणारा एखादाच! अशा छोट्या प्रसंगातून आपण स्वतःत छोट्या सुधारणा केल्या पाहिजेत. "कायझन' म्हणजे छोट्या सुधारणा. भव्यदिव्य सुधारणा एकदम होणे अशक्‍यप्रायच. त्यापेक्षा स्वतःमध्ये "कायझन' करूयात. या चुकांची पुनरावृत्ती टाळणे हीच मोठी सुधारणा.
चुकणे ही प्रकृती... चूक मान्य करणे ही संस्कृती आणि चूक सुधारणे ही प्रगती आहे!

Web Title: dr nilima ghaisas write article in muktapeeth