चिरंतन छत्र

डॉ. नीलिमा राडकर
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

वडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल.

वडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल.

माझ्या आईचं पत्र हरवलं... हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. शाळेमध्ये हा खेळ खेळताना होस्टेलच्या मैत्रिणी हळव्या होत. पत्र हरवलं म्हणताना त्या हिरमुसत, तर पत्र सापडलं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असे. मैत्रिणीला याबाबत विचारल्यावर ती म्हणाली, "अगं मला ना पत्रातून आई भेटते, ती माझ्याशी बोलते, माझी काळजी करते आणि मग मला कुशीतही घेते.' मोठेपणी त्या पत्राच महत्त्व समजू लागलं. मोबाईल तर दूरच. टेलिफोनही दुर्मीळ असलेल्या त्या काळात पत्रातल्या शब्दांमध्ये केवढी ताकद होती. कारण ते पत्रच नाही तर आईचं प्रेमळ छत्र होते.

खरंच आई-वडील, गुरू, मातृपितृसमान वडीलधारे, प्रेरणादायी व्यक्‍ती याचं मायेचं छत्र सदैव आपल्या डोक्‍यावर असतं आणि त्याच्या छायेखाली आपण निश्‍चिंत, निवांत आणि सुरक्षित असतो. या छत्रातून जाणवतो कधी कौतुकाचा स्पर्श, कधी शिस्त लावणारी करडी नजर, कधी कानउघाडणी, कधी क्षमाशीलता अन्‌ अपार जिव्हाळा. एखादी सुष्ट शक्तीच आपल्यावर कृपाछत्र धरते अशीही काहींची श्रद्धा असते.
आईचं निधन झाल्यावर हे छत्र हरपल्याची भावना मनात दाटून आली. पण लगेच विचार आला की, आपल्या वडीलधाऱ्यांच्या डोक्‍यावरील छत्र जेव्हा हरपलं तेव्हा त्या दुःखाने खचून न जाता त्यांनी स्वतःच ते छत्र आपल्या मुलाबाळांसाठी हाती धरलं. आपणही त्यांच्याप्रमाणे छत्र धरण्यातला आनंद आणि समाधान याचा अनुभव घ्यायचा.

वास्तविक ही प्रक्रिया पूर्वापार सुरू आहे. वयानं, अनुभवानं ज्येष्ठ असलेल्या व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यावर छत्र धरतात. त्यांच्या संस्कारांनी, आशीर्वादांनी, प्रोत्साहनांनी पुढील पिढी घडत जाते. केवळ ममताच नाही तर खंबीरपणे आधार देणार, आयुष्यातील चढउतार पचवण्याची हिंमत आण संयम, धीर देणारं हे छत्र जीवनात सत्कार्य करण्यासाठी उभारी देण्याकरिता ऊर्जेचा स्रोत असणार. क्वचित छायेखालच्यांना जाणीव नसली तरी तळमळीनं त्यांना ऊब देणारं, पुढे इतरांवर छत्र धरण्याचं सामर्थ्य देणार हे छत्र. काळ बदलला तरी हे छत्र चिरंतन असणार आहे, भावी पिढीला सक्षम करण्यासाठी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr nilima radkar write article in muktapeeth