बदल मनापासून... घरापासून

डॉ. पीयूषा खरात
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

अर्थहीन परंपरांचा त्याग कधी तरी करायलाच हवा. परंपरेतील अर्थहीनता जोखता यायला हवी आणि ती आसपासच्यांना समजावताही यायला हवी. ती परंपरा टाकून देण्याची सुरवात मनापासून, घरापासून करता आली पाहिजे.

अर्थहीन परंपरांचा त्याग कधी तरी करायलाच हवा. परंपरेतील अर्थहीनता जोखता यायला हवी आणि ती आसपासच्यांना समजावताही यायला हवी. ती परंपरा टाकून देण्याची सुरवात मनापासून, घरापासून करता आली पाहिजे.

माहेरी जातधर्म, जुनाट रूढी-परंपरा, बुवाबाजी, उपवास-नवस, अंधविश्‍वास याला बिलकूल थारा नव्हता. माझ्या वैद्यकीय शिक्षणाच्या आठ वर्षांच्या काळात अभ्यास, परीक्षा, प्रात्यक्षिके यांत चौवीस तासही अपुरे पडायचे, तरी वेळ काढून रुग्णांशी संवाद व्हायचा. दातांचे आरोग्य, स्वच्छतेच्या सवयी, लग्नाचे वय, मुलींचा जन्म या विषयांवरही प्रबोधन चालायचे. रुग्णाला शास्त्रीय कारणे सांगून परंपरेतील अर्थहीनता मी पटवून देत असे.

प्रागतिक विचारांच्या माझे लग्न पारंपरिक गुजराती कुटुंबात झाले. अर्थात, माझा जोडीदार मीच निवडला. लग्नात गुजराती कुटुंबातील वेगळे रीतीरिवाज-विधी होते. सासूबाई खूप हौशी, त्यांनी सारे काही त्यांच्या आवडीनुसार केले. लग्न चक्क चार दिवस चालू होते. मी मराठी कुटुंबातील मुलगी गुजराती कुटुंबात "बहुबेन' म्हणून गेले. माझ्या सासूबाई प्रेमळ स्वभावाच्या आणि खूप हौशी. सासरे मितभाषी. परंतु डॉक्‍टर "बहू' बद्दलचे त्यांचे कौतुक लपले नव्हते. विवाहानंतरचे सात-आठ दिवस आणि दिवाळीमधील दहा दिवस असे पंधरा-सोळा दिवस मी माझ्या सासरी राजकोटला होते. पण या दिवसांत सारे घर प्रेमाने-उत्साहाने न्हाऊन निघालेले. रोज वेगवेगळ्या भरजरी साड्या नेसून, खूप सारे दागिने, मॅचिंग टिकल्या-बांगड्या घालून त्या सजलेल्या असायच्या. खूप छान दिसायच्या, माझ्या हातांवर फार सुंदर मेंदी त्यांनी काढून घेतली होती. त्यांचा उत्साह, प्रसन्न हसरा चेहरा बघून, मीही त्यांच्या इच्छेखातर त्या जड साड्या, दागिने घालून बसत असे. खरेतर जीनची थ्रीफोर्थ पॅंट आणि टी शर्ट हा माझा आवडता पोषाख. पण त्यांच्या समाधानासाठी त्या थोड्या दिवसांत पटणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टीत मी सामील झाले. धनत्रयोदशीच्या दिवशी सारे कुटुंबच उत्साहात ! शिवाय "बहू'ची पहिली दिवाळी. त्या दिवसाचा पारंपरिक पद्धतीने सण साजरा झाला. अनेक गोष्टी मला नवीन होत्या. खूप कमी काळ सासरी मी राहणार होते. त्यामुळे अनेक प्रथा न पटूनही मी गप्प बसले. अर्थात, या सगळ्यात सासूबाईंचे प्रसन्न हसरे रूप मात्र आवडणारे. त्या खूप हौशी आहेत, शिवाय प्रेमळही हे लक्षात आले माझ्या. दिवाळीनंतर लगेचच आम्ही अमेरिकेला निघालो. जडशीळ साड्या-दागिन्यातून सुटका झाल्याबद्दल मी हुश्‍श केले. आणि पुढल्या दोन-चार दिवसांत निरोप आला... माझ्या सासऱ्यांचे हृदयविकाराने निधन झाले. हा साऱ्यांनाच धक्का होता. त्यांचा मृत्यू स्वीकारणे सगळ्यांसाठीच जड होते. आम्ही गेल्या पावली भारतात परतलो. दोघेही निःशब्द, रडवेले होतो. नवेपणाचा माझा साज किंबहुना कुटुंबाचा आनंद अजून साजरा होत असतानाच हा मृत्यू...! घरी आलो. सासूबाईंना पाहिले अन्‌ माझे त्राणच नष्ट झाले. मी हे काय पाहतेय...? माझ्या सासूबाई साध्या सुती साडीत, पांढरे कपाळ, अंगावर कुठलेच दागिने नसलेल्या रूपात.... मला त्यांच्याकडे पाहवेना.

त्यांचे हसरे, खेळते खूप सजलेले, छान छान टिकल्या रेखाटलेले रूपच माझ्या मनात होते. अंत्यविधी पार पडले. सासऱ्यांना आवडणाऱ्या साऱ्या छोट्या-मोठ्या वस्तू, पूजापाठ करायला आलेल्या पंडितजींना "दान' करण्यात आल्या. अखेर मला राहवेना. तेराव्या दिवशी सारे सख्खे-चुलत कुटुंब एकत्र जमले असताना, मी म्हटलें, ""... मॉं अभी ऐसीही नहीं रहेगी... मॉं चुडी पहेनेंगी, छोटीसी बिंदी-टिका लगायेगी...'' बोलता बोलता मला रडू कोसळले. थोडीशी कुजबूज झाली, माझ्या नवऱ्याने माझी बाजू उचलून धरली. चुलत सासरे, दीर यांनीही मान्यता दिली. सासूबाई नकारार्थी मान हलवत होत्या. पण त्यांनी माझे ऐकले, थोड्या वेळाने त्या छोटीशी टिकली लावून दोन बांगड्या घालून हलक्‍या रंगाची साडी नेसून आल्या. आजूबाजूच्या नातेवाईक स्त्रियांना हे रुचले नाही, काही धुसफूस... चर्चा सुरू झाली, पण साऱ्यांनीच माझ्या भावनेची कदर केली. जग इतके बदलले, पण आजही काही अर्थहीन रीतीरिवाज, खानदान, इभ्रत वगैरे शब्द लावून जपले जातात. आपल्या आईचे ते भेसूर रूप पाहून, माझा नवरा, दीर अगदीच व्याकूळ झाले होते. पण आता त्यांनाही बरे वाटलेले माझ्या लक्षात आले.

गेलेली व्यक्ती ही स्मरणात कायमचीच असते. प्रेमाचे बंध असे मृत्यूमुळेही तुटत नसतात, पण मग गेलेल्या व्यक्तीने पूर्वायुष्यात दिलेली समृद्धी, सुख, प्रेम, आधार, लक्षात ठेवूनच मजबूत होऊन जगायचे असते... सासऱ्यांच्या नंतर आणि आधीही सासूबाईच, घराचा "कणा' होत्या. त्यांच्या रूपाची इतकी अवकळा सासऱ्यांच्या पश्‍चात होणे योग्य नाही. मी माझा विचार कुटुंबात थोड्या स्वरूपात का होईना रुजवला. अमेरिकेला परत निघताना आम्ही दुःखीच होतो, पण सासूबाईंचे विधवापणाचे रूप, ती अवकळा नक्कीच आमच्या मनावर नव्हती. त्या बरी साडी नेसून, छान टिकली लावून आम्हाला निरोप देत होत्या. डोळ्यांच्या कडा ओलावूनही मन शांत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr piyusha kharat write article in muktapeeth