मेघपटली हरवलो

डॉ. राजश्री महाजनी
मंगळवार, 10 जुलै 2018

हिमालयातल्या सतत बदलत्या वातावरणाचा अनुभव केदारनाथला घेता आला. थक्क करणारा. ताजेतवाने करणारा.

हिमालयातल्या सतत बदलत्या वातावरणाचा अनुभव केदारनाथला घेता आला. थक्क करणारा. ताजेतवाने करणारा.

आकाशाशी स्पर्धा करणारे उंच पहाड, ढगांचे सुरेख पटल, मधूनच फेसाळते शुभ्र धबधबे यांमुळे मनात आनंदाचे कारंजेच वाहत होते. त्याच वेळी हिमालयाच्या रौद्रतेमुळे ते चौदा किलोमीटर अंतर चढून जाताना कोसळू शकणाऱ्या दरडींची संभाव्य ठिकाणे किंवा अत्यंत अरुंद वाटेने डोंगरांच्या उंच कड्यांखालून जाताना भीती वाटत होती. केदारनाथ जवळ येऊ लागल्यावर भीती कमी झाली. इथे बरीच मोकळी सपाटी जाणवते. आता बर्फाच्छादित शुभ्र शिखरे मनाला मोहून टाकू लागली. रांगेत पाऊण तास उभे राहिल्यावर दर्शन, अभिषेक व्यवस्थित झाले. रांगेत उभे असताना, निसर्ग न्याहाळताना तास कसा गेला कळलेही नाही. खोलीवर परतल्यावर हातपाय, तोंड धुवायला उत्साहाने गेलो, तर अतिथंड पाणी. खोलीतही गारठा जाणवू लागला. पण, तासाभराने वातावरणाशी समरस होत गेलो. तोच पाऊस सुरू झाला. पण, तेही वातावरण बदलले.

आता आकाशाची स्वच्छ निळाई अधिकच सुंदर दिसू लागली. अगदी वीस ते पंचवीस मिनिटे पडलेल्या पावसाने एक वेगळेच स्वच्छ, सुंदर दृश्‍य दिसायला लागले. तेवढ्यात बरोबरच्या पर्यटकांपैकी एक जण ओरडून म्हणाला, ""अरे, दरीकडे बघा.'' पाहिले तर दरीतून आमच्या बाजूकडे खूप मोठे मेघपटल येत होते. तीन ते चार मिनिटे आम्ही सारेच त्यात वेढले गेलो. इतके, की शेजारचेही कोणी कोणालाच दिसत नव्हते. आयुष्यात आलेला हा पहिला-वहिला अनुभव थक्क करणारा, अविस्मरणीय असाच होता. खोलीत थंडीमुळे गारठून पांघरुणात लपेटली गेलेली मी पावसाच्या आधी काही मिनिटे बाहेर येऊन वातावरणाशी जुळू पाहत होते आणि लगेच हा अचंबित करणारा अनुभव घेऊन स्वतःला हरवून गेले.

आता बर्फाच्छादित शिखरांवर सूर्यनारायणाने सोनेरी मुकुट चढवला आहे असेच भासत होते. केदारनाथ मंदिराच्या चारही बाजूने हिंडून ते दृश्‍य मी डोळ्यांत साठवून घेतले. ती सोनेरी संध्याकाळ, आकाशाच्या निळाईखाली हिमपहाडावरचा चमचमता सोनेरी मुकुट, केदारनाथाचे साधे-सुंदर मंदिर आणि आजूबाजूची हिरवी-पिवळी, सोनेरी झालेली वनश्री आठवून आजही ताजेतवाने व्हायला होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr rajshree mahajani write article in muktapeeth