थंडीचे दिवस

डॉ. राजश्री महाजनी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

ऋतुचक्राचा बदल टिपायलाच हवा. काहीशा सुखकर व उबदार थंडीबद्दल मनातील भावफुलांनी सजवलेले हे शिशिर ऋतुचे वर्णन.

ऋतुचक्राचा बदल टिपायलाच हवा. काहीशा सुखकर व उबदार थंडीबद्दल मनातील भावफुलांनी सजवलेले हे शिशिर ऋतुचे वर्णन.

वर्षा ऋतुतील जलधारा पिऊन सुखावलेली, तरारून आलेली शेती डोलू लागते. शेतातल्या नव्या, पिवळ्या धान्याचा एक दरवळ दूरवर पसरू लागतो. नव्या धान्याचे तोरण घरादाराला दिसू लागते. सोनपिवळे धान्य वानवळा म्हणून वाटायला सुरवात होते. दिवसा गरम ऊन, रात्री सुखद गारवा असे आल्हाददायी वातावरण निर्माण होऊन थंडीची चाहूल लागते. सुरवातीला येणाऱ्या हेमंत ऋतूच्या प्रभातसमयी चैतन्य, उत्साहपूर्ण वातावरण असते. दिवस लवकर मावळतो व रात्रही मोठी व्हायला लागते. अशा वेळी थंडीतही गाढ झोप पूर्ण होऊन मनही ताजेतवाने होत राहते. वेळेत येणारी जाग व मस्त गुलाबी थंडीची चाहूल लागताच स्वेटर, कानटोपी, मोजे, मफलर, शाल असा सर्व जामानिमा करून मस्त फिरून येण्याचा आनंद काही वेगळाच. शीत लहरीच्या स्पर्शाने पर्वती, सिंहगडसारखी ठिकाणे चढणे व कोवळ्या उन्हाची ऊब घेत घरी येणे हे दोन्ही उत्साहवर्धकच.

हळूहळू हेमंत ऋतू जाऊन शिशिराची चाहूल लागते. थंडीची तीव्रताही जाणवू लागते. रात्रीच्या बोचऱ्या थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोट्या पेटू लागतात. त्या वेळी गप्पागोष्टीनांही ऊत येतो. गावागावांतून शेकोट्यांची जी रंगत जाणवते ती मजा शहरातील मुलांना मिळत नाही. अशा वेळी माझ्या लहानपणीची आठवण येते. तेव्हा उन्हे वर आली तरी आम्ही शेकोटीजवळच बसून राहत असू.

याच थंडीत शाळा, महाविद्यालयातून स्नेहसंमेलनेही रंगत असतात. कार्यक्रम बसवणे, तालीम करणे यासाठी हा मोसमही चैतन्यदायी. कार्यक्रमानंतर मटार उसळ पावाच्या मेजवानीचा आनंद तर अवर्णनीय. पुणेकर रसिकच नव्हे, तर जगभरातील तमाम रसिकांना आनंद देणारा अभिजात रागसंगीताचा महोत्सव, थंडीत अगदी रंगतोच. पूर्वी कॉफी वडे वगैरेचा आनंद घेत पहाटेपर्यंत मैफलीना ऐक स्वरब्रह्मात रंगायचा आनंद काही वेगळाच असायचा. आता फक्त रात्री दहापर्यंतच हा आनंद मिळतो. फिरण्यासाठी, पर्यटकांसाठी आनंदाचा, सुखाचा असा हा काळ होय. दवबिंदूंच्या थेंबावर चमचमणारी सूर्यकिरणे अंगावर घेत, धुक्‍यात हरविलेल्या निसर्गाचा शोध घेताना मन अगदी मोहरून येते. धुक्‍याच्या शालीत पलेटलेली गावे, शहरे, डोंगरदऱ्या धुक्‍याबाहेर अलगत येतात. तेव्हा ते जागेपण फक्त न्याहाळायचे. गवतावरचे दवबिंदू चिमटीत पकडायचा प्रयत्न करायचा व सृष्टीशी हितगुज करत आपणही धुक्‍यात हरवायचे. मनातल्या आठवणी दाटून येतात व शब्द आठवतात. "आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे.'

खरे तर "थंडीतील धुके' हा स्वतंत्र विषय ठरावा. निराश मनाला थंडीतील धुके उदास वाटते, "धुके धुके धुके, आजोबांचे जग मुके मुके मुके'. तर उत्साही मनाला धुक्‍यात हरवलेली वाटही गवसते. असे वाटते, की "वाट गवसली धुक्‍यामधली, तुझ्या माझ्या विचारातली'. अशी नव्या उत्साहाने, नव्या आशा, नवी स्वप्ने पाहत प्रत्येक नव्या दिवसाची वाट पाहताना जुन्या वर्षाला निरोप देत रात्री बारापर्यंत जागून नवीन वर्षांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करायचे व नवीन संकल्पांचा विचार करत, नवे बेत आखत थंडीच्या कुशीत आधीन व्हायचे.

नव्या वर्षाचा पहिला सण हा संक्रांत. सर्वांशी गोड बोलायचे, सौहार्दपणे वागायचे हा संदेश देणारा सण. संक्रातीच्या निमित्ताने ऊस, बोरे, गाजर यांची जोरदार आवक असते. थंडीची कमाल पातळी या वेळी जाणवते. शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ, गूळ इत्यादी पदार्थ आणि हरभरा, गाजर यांच्या वैविध्यपूर्ण पदार्थांमुळे नव्या ऋतुबदलाचा योग्य परिणाम साधला जातो. याच वेळी हुरडा पार्टीही रंगते व रसना तृप्त होते.
गोठविणाऱ्या शिशिर ऋतूने झाडे निष्पर्ण होतात. खूप पानझड होते. पण त्याच वेळी ही कडक थंडी आंब्याचा मोहर येण्यास अनुकूल ठरते. इतरही काही पिकांसाठी आवश्‍यक असते.

सुखदुःख, आशानिराशा, ऊनसावल्या या प्रतिकात्मक खेळाप्रमाणे पानगळ आणि नंतर येणारी नवपालवी या दोन्ही गोष्टी आहेत. अलीकडे पूर्वीसारखी थंडी नसते. दिवाळीला पूर्वीसारखी पहाट शिरशिरी जाणवत नाही. उलट गरमच वाटते तरीही ऋतुचक्राचा बदल टिपायलाच हवा. काहीशा सुखकर व उबदार थंडीबद्दल मनातील भावफुलांनी सजवलेले हे शिशिर ऋतूचे वर्णन करताना एक कविता मनात साकारली -
शिशिर ऋतुचं गान गाऊया
शिशिर ऋतुचं गान।।धृ।।
कडाक्‍यातली गोठवणारी
फुलतो काटा, गोड शिरशिरी
वेळेवरती जाग येई परि
साखरनिद्रा छान।।
चमचम दहिवर गवतावरती
झाडेवेली गोठून जाती
दवात भिजुनी कळ्या उमलती
कुठे दिसेना पान।।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr rajshree mahajani write article in muktapeeth