पीएमपीएमएलचा दणका

डॉ. एस. एस. नंदरगी
शनिवार, 2 मार्च 2019

पीएमपीएमएलच्या गाड्यांना अपघात होणे हे नित्यनेमाचे झाले आहे. किमान अपघातग्रस्तांना लगेच वैद्यकीय मदत देण्याइतकी संवेदनशीलता ड्रायव्हर-कंडक्‍टरना शिकवली पाहिजे.

पीएमपीएमएलच्या गाड्यांना अपघात होणे हे नित्यनेमाचे झाले आहे. किमान अपघातग्रस्तांना लगेच वैद्यकीय मदत देण्याइतकी संवेदनशीलता ड्रायव्हर-कंडक्‍टरना शिकवली पाहिजे.

रविवार असल्याने सगळीकडे निवांतपणा होता. मी भाभीजींसोबत सकाळी साडेआठच्या सुमारास नियमित तपासणीसाठी औंधमधील रुग्णालयाकडे निघाले होते. स्वारगेट-सांगवी (क्रमांक 21) बसने निघालो. बसमध्ये आम्ही दोघीच प्रवासी. सिमला ऑफिसकडून गाडी पुढे गेलो. इतक्‍यात उड्डाण पुलावर आमच्या बसने पुढच्या टेंपोसारख्या गाडीला धडक दिली. मी चौथ्या सीटवरून थेट ड्रायव्हर जवळील बॉनेटपाशी उडून पडले. बसच्या पायरीला घट्ट पकडले. माझे केस बॉनेटच्या झाकणात अडकलेले. पाठ पत्र्याने कापली गेली. आधी एक शस्त्रक्रिया झालेला उजवा पाय विचित्र दुमडला गेल्याने मला उठताही येत नव्हते. तेवढ्यात वेगाने दुसरी गाडी बसजवळून गेली. माझा पायरीला पकडलेला हात निसटला असता तर...?
मी जिवाच्या आकांताने ओरडले. मग कंडक्‍टरने येऊन उठवून बसवले. उजवा गाल आणि मानेला सूज येऊ लागलेली. खांद्याचे हाड ठणकू लागलेले. पाठीच्या बरगड्यांतून तीव्र वेदना. मला बसणेही मुश्‍किल झालेले. तिकडे भाभीजी दोन सीटच्या मध्ये अडकलेल्या. त्यांनाही मुका मार लागलेला. आम्हाला रुग्णालयात नेण्याची कंडक्‍टरला विनंती केली. ते म्हणाले, "पंचनामा झाला की सोडतो. त्यासाठी एक-दोन तास लागतील.' मला आता चक्कर येऊ लागलेली. कंडक्‍टर काहीच संबंध नसल्यागत उभा. ड्रायव्हर त्याच्या जागी ढिम्म. अपघात असल्याने रिक्षा-मोटार कोणीही थांबायला तयार नव्हते. शेवटी कसेबसे एक रिक्षावाले काका थांबले. त्यांनी आम्हाला रुग्णालयात सोडले. डॉक्‍टरांनी ताबडतोब उपचार सुरू केले. माझ्या "कॉलर बोन'ला इजा झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. तीन महिने उजवा हात अडकून राहिला. आता चार महिने उलटले, पण अजूनही त्या हाताने नीट काम करता येत नाही. मानसिक धक्का आणि आर्थिक फटका बसला तो वेगळाच. सात ऑक्‍टोबर 2018 ला या अपघाताचा पंचनामा झाला असेलच. पुढे काय झाले, हे या अपघातांचा फटका बसलेल्यांना कळत नाही. मला वाटते, चूक कोणाची, कसे घडले, यापेक्षाही "अनफिट' गाड्या रस्त्यावर आणून प्रवाशांच्या जिवाशी खेळणे थांबले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr s s nandragi write article in muktapeeth