शून्य मशागत

dr shila kalkar write article in muktapeeth
dr shila kalkar write article in muktapeeth

शून्य मशागत तंत्राने शेती होऊ शकते. ती आजच्या काळाची गरज आहे. प्रदूषण व अन्नाचा तुटवडा या दोन गंभीर प्रश्‍नांवर विचार करू लागल्यावर असे प्रयोग सुचू लागतात.

आपली संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. ही कृतज्ञता मातृभूमीबद्दल जशी असायला हवी, तशी शेतकऱ्याबद्दलही असायला हवी. शेतकरी शेतात कष्ट करतो म्हणून माझ्या पानात धान्य, कडधान्य, डाळी, भाजीपाला हे सर्व येते; मी पैसे देते म्हणून हे मिळत नाही, याचे भान आपण प्रामाणिकपणे ठेवायला हवे. उपनिषदात "अन्नम्‌ न निंद्यात' अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे.

निसर्गाचा असमतोल, वृक्षतोड, खते, रासायनिक कीडनाशके व पाण्याचा अतिवापर यांमुळे जमिनीची सुपीकता धोक्‍यात आली आहे. शेतीच्या भवितव्याबरोबरच अन्नसुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. जमिनीची प्रत सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मांडणी होत आहे. पूर्वी शेती म्हटले, की नांगरणी, चिखलणी, लावणी, खर्च, त्रास हे सर्व असे, अजूनही काही ठिकाणी आहे. भारतातली बहुतांश शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. यावर उपाय म्हणून नेरळच्या (ता. कर्जत, जि. रायगड) "सगुणाबागे"चे चंद्रशेखर भडसावळे यांनी "सगुणा राइस तंत्र' (एसआरटी) विकसित केले. गेली अनेक वर्षे वेगवेगळे प्रयोग ते करीतच होते. पण आताचे हे तंत्र परदेशातही पोचले आहे. थायलंडमध्ये भाताचे पीक खूप येते. हे नवीन तंत्र कळल्यावर तेथील लोक नेरळमध्ये आले. त्यांनी भडसावळे यांना थायलंडमध्ये आमंत्रित केले. "तुम्ही हे तंत्र आमच्या देशात, आम्हाला विकसित करून द्या, आम्ही जगाला भात पुरवू शकू' हा आत्मविश्‍वास त्या लोकांना वाटला. भडसावळे यांनी आता अनेक देशांतील व आपल्या देशातील अनेक शेतकऱ्यांना हे तंत्र विकसित करून दिले आहे. त्या तंत्रात ना नांगरणी, ना चिखलणी व ना गुडघा गुडघा चिखलात पाय रोविले हो, पाय रोविले, एकेका भाताचे रोप लाविले हो रोप लाविले. ही यातायात "एसआरटी' तंत्रात नाही.

सगुणा राइस तंत्र हे कायमस्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करून कमी श्रमात भात पिकविण्याचे तंत्र आहे. या तंत्रात भात पिकानंतर थंडीमध्ये (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) वाल, कांदा, कोबी, भेंडी, हुलगा, हरभरा, मका, गहू इत्यादी व त्यानंतर उन्हाळ्यात (जानेवारी ते मे) वैशाखी मूग, भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, सोयाबीन, अशी फेरपालट पिके घेऊ शकतो. या पद्धतीत वापरलेल्या गादी वाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण, तसेच पुरेसा ओलावा राहतो. साच्यामुळे दोन रोपांमध्ये नेमके, सुयोग्य अंतर व त्यामुळे प्रति एकर रोपांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते. अगोदरच्या पिकांची मुळे जमिनीत जागेलाच ठेवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब चटकन वाढतो. परिणामी, रोग व किडींचा त्रास कमी होतो. तसेच विपुल प्रमाणात आपोआप गांडुळांचा संचार सुरू होतो. चिखलणी भात लागवड पद्धतीत अनुरूप बदल करून हे तंत्र विकसित केले आहे.

या तंत्राचे फायदे खूप आहेत. चिखलणी व लावणी करावा न लागल्यामुळे पन्नास ते साठ टक्के खर्च कमी होतो. लावणीचे कष्ट वाचल्यामुळे पन्नास टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप वाचते व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येते. एस.आर.टी. गादीवाफ्यावरील रोपांची पाने जास्त रुंद व सरळ सूर्यप्रकाशाकडे झेपावलेली दिसतात. त्यामुळे जास्त जैविक भार म्हणजे जास्त उत्पन्न मिळते. अगदी नवख्या शेतकऱ्यापासून, सगुणाबाग ते विद्यापीठ या सर्वांचे समान वाढीव उत्पन्न आलेले आढळते. कोळपणी करण्याची गरज नसल्याने अत्यंत कष्टाचे काम आणि वरच्या थरातील माती सैल होण्याची गोष्ट टळू शकते. रासायनिक खताच्या गरजेचे प्रमाण निम्म्यावर येते. या तंत्राने पावसाळ्यात भातामध्ये सुद्धा शेतात गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळते; याचा अर्थ रोपांच्या बुडाशीच गांडूळ खत बनण्याचे "कारखाने' आपोआप चालू राहतात. लावणीमुळे रोपांना होणारी इजा व "ट्रॉमटिक शॉक' टळू शकल्याने रोग व किडींचा त्रास कमी होतो. या पद्धतीत भातपीक आठ-दहा दिवस लवकर तयार होते. तसेच दोन पिकांमधील मशागतीचा वेळ वाचून हंगामाचे अति मूल्यवान असे दहा-पंधरा दिवस हातात मिळतात. एकाच शेतात एका मागोमाग एक वर्षाला तीन पिके घेतल्यामुळे कृषी विकासदरात आमूलाग्र वाढ झालेली दिसते. या पद्धतीने पिकविलेले भात भरडताना वाढीव उतारा मिळतो. एस.आर.टी.मुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढतो. कारण ट्रॅक्‍टर व पॉवरटीलरमुळे जमिनीचा वीस ते तीस सेंटिमीटर पृष्ठभाग भुसभुशीत होतो. त्याचवेळी त्या खालील भागावर फाळाच्या दबावयुक्त घर्षणामुळे कठीण स्तर तयार होतो, परिणामी, पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याऐवजी आडवे वाहू लागते. ते खूप नुकसानकारी असते. हे येथे टळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com