दारू वाहणारा माणूस

डॉ. वसंत ज. डोळस
शुक्रवार, 10 मार्च 2017

 

आम्ही पाणी वाहिलं तरी दारू वाहत असल्यासारखे पोलिस आमच्याकडे पाहतात. डॉक्‍टरेट मिळविलेल्या एका प्राध्यापकाकडेही... पोलिसांनी संशय घ्यावा आणि लोकांनी हसावं असं जीणं वाट्याला आलेलं असतं पिढ्यान्‌पिढ्या.

 

 

आम्ही पाणी वाहिलं तरी दारू वाहत असल्यासारखे पोलिस आमच्याकडे पाहतात. डॉक्‍टरेट मिळविलेल्या एका प्राध्यापकाकडेही... पोलिसांनी संशय घ्यावा आणि लोकांनी हसावं असं जीणं वाट्याला आलेलं असतं पिढ्यान्‌पिढ्या.

 

मी पीएच.डी. झाल्यानंतरची गोष्ट. पीएच.डी. झाल्यावर वेतनात खूपच वाढ झाली होती. आतापर्यंत जीवनात झालेली ओढाताण थांबली होती. महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून पत्नी कमल कार्यरत होती. महाराष्ट्रातील निरनिराळ्या नियतकालिकांमधून, मासिकांमधून माझे साहित्य प्रसिद्ध होत होते. त्यांचे मानधन मिळत होते. राजेश, वैशाली, विशाल या आमच्या मुलांचं शिक्षण सुरू होतं. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं.

घराभोवती मोकळ्या जागेत छोट्या-छोट्या खोल्या बांधल्या. अंघोळीसाठी बाथरूम नव्हतं, ते बांधलं. शौचासाठी उघड्यावर जावं लागतं म्हणून घराजवळ शौचालय बांधलं. ते थिगळस्थळमधील पहिलं शौचालय होतं. त्या वेळी थिगळस्थळामध्ये पाण्याची म्हणजे नळाची सुविधा नव्हती. त्यामुळे पाण्याची अडचण नेहमी जाणवत असे.

त्यासाठी घराजवळ मी घरगुती वापरासाठी एक पाण्याची टाकी बांधली. डाक बंगल्याजवळ रस्त्याच्या पलीकडे एक कारखाना होता. त्या कारखान्याजवळ एक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरीत.

मी पाणी आणण्यासाठी एक जुनी सायकल विकत घेतली होती. त्या सायकलीच्या दोन्ही बाजूंना बसविण्यासाठी लोखंडी हूक तयार करून घेतले होते. सायकलीच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन लोखंडी हूक लावून त्यावर वीस-वीस लिटरचे पाण्याचे कॅन बसवून पाणी आणून घरासमोरील पाण्याची टाकी भरीत असे. कॉलेजवरून आल्यावर कपडे बदलून पाणी आणण्यासाठी जात असे. त्या वेळी अंगावर जरा जुनेसेच कपडे असत. घामानं व पाण्यानं भिजलेल्या कपड्यांना माती लागून ते खराब होत म्हणून जुने कपडे वापरणंच योग्य असे. डाक बंगल्याजवळील कारखान्यात त्या वेळी कोकणातील जुजम नावाची माणसं कामगार म्हणून कामाला होती. त्यांचा परिचय झाल्यावर ती माणसं कॅनमध्ये पाणी भरण्यासाठी, कॅन सायकलला अडकविण्यासाठी मदत करीत.

एकदा मी पाणी आणण्यासाठी गेलो होतो. मी पाण्याचे कॅन भरले, ते सायकलला अडकवून रस्त्याच्या कडेने, घराच्या रोखाने येत होतो. घरापासून फर्लांग-दोन फर्लांग अंतरावर असेन. सावकाश चाललो होतो.

इतक्‍यात मागून पोलिसांची गाडी वेगाने आली. त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवून मला थांबवले. त्यातून साहेब उतरले. त्यांच्या अगोदरच गाडीतून उड्या टाकून चार-पाच पोलिसांनी माझ्याभोवती व सायकलभोवती कडं निर्माण केलं. वेढाच टाकला. आता मी त्यांच्या वेढ्यातून निसटणार नाही याची त्यांना पक्की खात्री होती. तोवर गाडीतून उतरून साहेब माझ्याजवळ आले. येतानाच ते मला खालपासून वरपर्यंत निरखत होते. त्यांचा पक्का अदमास असल्याचा विश्‍वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ते जरा जवळ आले आणि म्हणाले,
""काय रे, दारूचे कॅन घेऊन कुठे चाललास?'' असं उग्र स्वरात त्या साहेबांनी विचारलं. त्या दरडावणीच्या प्रश्‍नाने कोणाचीही भीतीने गाळण उडाली असती. मी शांत होतो. विनम्र स्वरात म्हटलं,
""ही दारू नाही. मी कॉलेजमधील प्रोफेसर आहे. कपडे बदलून पाणी आणतो. हे पाणी आहे!''
माझ्या अंगावरचे जुने कपडे, सायकलला मोठाले कॅन पाहणाऱ्या त्या पोलिसांचा माझ्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही. ते पोलिसांना म्हणाले,
""कॅन उघडून बघा रे!''
पोलिसांनी सर्व कॅनची झाकणं उघडून पाहिली. वास घेतला आणि साहेबांना म्हणाले,
""साहेब, पाणी आहे!''
साहेबांचा चेहरा हिरमुसला. सर्व पोलिस व्हॅनमध्ये बसले. पोलिस व्हॅन गावाच्या रोखाने निघून गेली.
दुसऱ्या दिवशी डॉ. विंचुरकरांच्या दवाखान्यात गेलो. ते आमचे फॅमिली डॉक्‍टर होते. त्यांच्याजवळ एक गृहस्थ बसले होते. त्यांच्याबरोबर माझा परिचय करून देत, डॉक्‍टरसाहेब म्हणाले,

"हे आमचे डॉ. डोळस. सर, ते पीएच्‌.डी. असून पुण्या-मुंबईच्या नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध होतात. ते आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत!''
निळसर पॅंट, सफेद बुशशर्ट, बारीक सोनेरी काड्यांचा चष्मा त्याच्यातून त्या गृहस्थांनी माझ्याकडं पाहिलं. मलाही त्यांना पाहिल्यासारखं वाटलं. डॉ. विंचुरकर त्यांच्याकडे पाहत म्हणाले,
""हे डीएसपी साहेब!''
त्यावर मी म्हणालो,
""कालच आमचा परिचय झाला आहे!''
त्यावर काही न बोलता साहेब उठले व दवाखान्यातून बाहेर पडले. ते गेल्यावर डॉक्‍टरांना मी त्यांच्या संदर्भातील आदल्या दिवशीची आठवण सांगितली. त्यावर ते हसू लागले.
मी मात्र गप्प बसलो. कारण लोकांनी हसावं आणि त्यातून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करावी. असं जीणं सुरवातीपासूनच आमच्या वाट्याला आलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr vasant dolas write article in muktapeeth