किनारा तुला पामराला...

डॉ. विनय कोपरकर
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

यकृत रोपण झाल्याने प्रकृतीबाबत विशेष दक्षता घ्यायची सूचना होती. तरीही गोव्याचा समुद्रकिनारा मनात जिद्दीचे धुमारे फुलवत होता. अखेरीला मोठ्या हिमतीने अल्ट्रा सायकल रिले स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला. अन्‌...

यकृत रोपण झाल्याने प्रकृतीबाबत विशेष दक्षता घ्यायची सूचना होती. तरीही गोव्याचा समुद्रकिनारा मनात जिद्दीचे धुमारे फुलवत होता. अखेरीला मोठ्या हिमतीने अल्ट्रा सायकल रिले स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला. अन्‌...

अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन्‌ आशा, किनारा तुला पामराला... कुसुमाग्रजांची ही कविता माझ्या मनावर कायमची कोरली गेली. कारण इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर आपण आकाशालाही गवसणी घालू शकतो, याचा अनुभव मी स्वत: नुकताच घेतला. काही दिवसांपूर्वी मी पुणे-गोवा या अल्ट्रा सायकल रिले स्पर्धेत आपल्या गटासह सहभागी झालो. ही स्पर्धा केवळ पूर्णच केली नाही, तर आमच्या गटाने या स्पर्धेत पहिला क्रमांकही पटकविला. आता तसं पाहायला गेलं तर ही घटना तशी फारशी महत्त्वाची नाही. कारण दरवर्षी ही स्पर्धा अनेक जण पूर्ण करतात. तथापि, माझ्यासाठी आणि मला ओळखणाऱ्यांसाठी ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे जणू चमत्कारच होता. कारण, मी ही स्पर्धा वयाच्या छप्पनव्या वर्षी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका वर्षांत पूर्ण केली होती. प्रत्यारोपणामुळे आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्यायच्या डॉक्‍टरांच्या सूचना होत्या. औषधांचा मारा होता. तरीही स्पर्धेत सहभागासाठी मनातली इच्छा सारखी उसळी घेत होती. जेव्हा सहभागाचा निर्णय घेतला तेव्हा हे अवघड कार्य कसे पार पाडले जाईल, असं इतरांना वाटत होतं.

एखाद्या व्यक्तीवर एखादी शस्त्रक्रिया झाली आणि जर ती यकृत प्रत्यारोपणासारखी जटिल शस्त्रक्रिया असेल तर त्यातून आपली दिनचर्या पूर्वीसारखी सुरू करायलादेखील त्या व्यक्तीला अनेक महिने कष्ट घ्यावे लागतात. मात्र, या एका वर्षांत मी जिद्द आणि चिकाटी याबरोबरच काहीतरी वेगळे करून दाखविण्याची इच्छा या जोरावर या स्पर्धेत उतरलो आणि ती पूर्णदेखील केली. वयाच्या छप्पनव्या वर्षी पुणे ते गोवा या दरम्यान झालेली तब्बल 643 किलोमीटर अंतरांची अल्ट्रा सायकल रिले स्पर्धा केवळ 28 तास 36 मिनिटांत पूर्ण करीत मी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये मी पहाटे, मध्यरात्री, चढ-उतार, काही ठिकाणाची रस्त्यांची बिकट अवस्था, वळणे ही सर्व आव्हाने झेलत आणि वाटचालीत येणारे अडथळे दूर करीत ही स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेच्या वर्षभरापूर्वी यकृत प्रत्यारोपणाशिवाय मी जगू शकणार नाही, असे निदान डॉक्‍टरांनी केले होते. त्यानंतर यकृत प्रत्यारोपणासाठी सुरवातीला दाता शोधण्याचा प्रयत्न माझ्या कुटुंबीयांनी केला. तथापि, अनेक दिवस प्रयत्न करूनही दाताच मिळाला नाही. त्यातच कुटुंबीयांमधील कोणाचेही यकृत माझ्या शरीरासाठी योग्य नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्याने सगळ्यांनी आशा सोडल्या होत्या. सुरवातीला दाता नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते; पण मी मात्र सकारात्मकरीत्या विचार करीत होतो आणि झालेही तसेच. एका अनामिक दात्याच्या दातृत्वाने मला नवीन जीवन जगण्याची संधी मिळाली. इतकेच नाही तर शस्त्रक्रियेला वर्ष पूर्ण होते न होते तोच मी या रिले सायकलिंग स्पर्धेत सहभागी होत ती पूर्ण केली आणि आमच्या "फॅन्टॅस्टिक फोर' या ग्रुपने स्पर्धेच्या मिश्र गटात पहिले पारितोषिकही पटकाविले. आत्मविश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकते, हेच मी या वेळी स्वत:ला आणि जगाला दाखवून दिल्याचा आनंद मला झाला.

मला ज्या दात्याने आपले यकृत दिले, त्या दात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने गेल्या वर्षभरात मी अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी काम करीत आहे. या दरम्यान मी अनेक स्वयंसेवी संस्था, समुपदेशन केंद्रे, सार्वजनिक गणेश मंडळे या ठिकाणी आतापर्यंत बत्तीसहून अधिक व्याख्याने दिली आहेत. आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि आत्मबल यांच्या जोरावर मी आजारावर मात करीत एक वेगळे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. आज मिळालेले हे यश मी मला जीवनदान देणाऱ्या डॉक्‍टरांना आणि त्या अनामिक दात्याला समर्पित करतो.

Web Title: dr vinay koparkar write article in muktapeeth