अनुभवाच्या शाब्दिक वांत्या, व्यवस्थापनात अडथळा

डॉ. मृणालिनी नाईक
Friday, 23 October 2020

ऑफिस असो वा घर, पण काही गोष्टी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरतात. जिथे अनुभव आणि काही स्वघटीत गोष्टींचा वापर स्वतःला व्यवस्थापन योग्य बनविण्याच्या दिशेने केला जातो तिथे मग तुलना आणि मानापमान अशा बाबींपेक्षा आदर आणि सन्मान जागा घेतो.

कधी विचार केलाय, एकट बसून , मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात काय केल ते ? काय मिळवल वा काय गमावल ? असो, कधी फक्त एक विचार केलाय की आतापर्यंत आयुष्यात किती struggle म्हणजेच संघर्ष केलाय ? हा विचार तर नक्कीच केला असेल. विचार काय आजवर कितीतरी लोकांपुढे त्याचे कितीतरी गोडवे वा रडगाणे पण गाऊन झाले असावेत. आमचे एक आजोबा होते, एखाद्या पारिवारिक बैठकीत त्यांनी सुरवात केली की आधी स्वतःच्या कितीतरी संघर्षांच्या कहाण्या सांगायचे. बघा विचार करून आपल्या पण लक्षात येतील असे कितीतरी जे सतत स्वतःच्या आयुष्यात कसं, कधी, किती वगैरे वगैरे उदाहरण देताना दिसतील. किंवा काही असेही दिसतील जे सतत तुमच्या प्रत्येक गोष्टीबरोबर स्वतःची व स्वतः कधी सामोरे गेलेल्या परिस्थितीची तुलना सुद्धा करताना दिसतील. आता एक दुसरा विचार करा , असे किती लोक तुम्हाला पटतात आणि अशा किती लोकांबरोबर तुम्हाला राहावेसे वाटते.

हा स्वाभाविक विचार आहे, वा ही स्वाभाविक गोष्ट आहे की जुन्या आठवणी वा अनुभव सतत सोबत असतात. पण कधी विचार केलाय का , की या जुन्या आठवणी वा विचार इतरांना खरंच हव्या आहेत का. आपण का खरंच समोरच्याला उपयोग करून घेता येईल अस काही बोलतो आहोत का? आपले अनुभव व्यक्त करताना आपण समोरच्याच्या आनंदावर विरजण तर नाही ना घालत ? आता तुम्हीच सांगा तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट घडत असताना, जर कोणी तुम्हाला अस म्हटलं, की आमचं तर हे झालच नाही, किंवा आमच्या वेळी हे अस नव्हतं, किंवा मलाही हेच करायचं होत पण राहिला का आनंद शिल्लक? आनंद सोडा, राहिला का त्या व्यक्तीविषयी आदर शिल्लक. आता विचार करा, हे जर तुमच्या हातूनच घडलं तर. होईल का पुढे व्यवस्थापन काय म्हणतात ते ? स्थळ कोणतही असो, पण स्वतःचा मान हा स्वतःच्या वागण्या बोलण्यात असतो. मग ते अनुभव असो वा काहीही , पण त्याने समोरच्याला काही आनंद मिळत असेल, आणि आपला मान शाबूत राहत असेल तरच व्यक्त करण्यात काही अर्थ. नाहीतर अनर्थ व्हायला वेळ लागत नाही.

महाभारताचा इतिहास कितीही जुना असला तरी एक बाब लक्षात घ्यायला हरकत नाही आणि ती म्हणजे स्वतःवर झालेल्या अन्यायावर किंवा आपल्याला कोणीतरी सूतपुत्र म्हणत आहे म्हणून त्याची सतत सल बाळगणाऱ्या कर्णाविषयी आपण सहानुभूती व्यक्त करतो हे म्हणून की त्याच्यावर अन्याय झाला आणि कुठेतरी त्याने सुद्धा याचा उपयोग करूनच घेतला पण खरंच ज्यांच्यावर अन्याय झाला ते कधीच त्या घटनेची जाणीव करून देऊ पाहताहेत अस दिसून येत नाही. अस नाही का वाटत खरा अन्याय भीष्मावर झाला, जो एकमेव खऱ्या अर्थाने हस्तिनापूर आणि कुरु वंशाचा अधिकारी होता. भीष्म सोडा कृष्णावर अन्याय झाला. ते तर उदाहरण सोप आहे. त्याला लहानपणापासूनच किती तरी सहन करायला लागलं. जन्म घेताच मामा मारायला निघाला, यदु वंशाचा असून गवळ्याचा मुलगा म्हणून राहिला. त्याच्या पदरी किती कटू अनुभव पडले पण आपल्याला कुठेही हा उल्लेख दिसत नाही की अर्जुनाला गीता सांगताना कृष्ण स्वतःचे अनुभव , उदाहरण वा तुलना करत आहे. कदाचित म्हणूनच त्याचे व्यवस्थापन सटीक होते. आपण म्हणू तो कृष्ण होता पण व्यवस्थापन तर आपणही करतो ना.

ऑफिस असो वा घर, पण काही गोष्टी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरतात. जिथे अनुभव आणि काही स्वघटीत गोष्टींचा वापर स्वतःला व्यवस्थापन योग्य बनविण्याच्या दिशेने केला जातो तिथे मग तुलना आणि मानापमान अशा बाबींपेक्षा आदर आणि सन्मान जागा घेतो. कारण जुन्या अनुभवांना नव्या पिढीची साथ आवडली असते आणि नवीन विचारही पटलेले असतात. मग नव्या विचारांनाही जुने अनुभव फक्त शाब्दिक वांत्या वाटत नाही कारण डोईजड शब्दांची जागा प्रोत्साहनाने घेतली असते. तेव्हा त्या काळाला अनुरूप असे व्यवस्थापन करता येणे सहज शक्य होते आणि रडगाण्याला थारा मिळत नाही, कारण प्रत्येकाला त्याचा मिळावा तो मान आणि अधिकार मिळाला असतो. कारण व्यवस्थापन म्हणजे फक्त नियंत्रण नसून प्रोत्साहन सुद्धा आहेच. पहा पटतंय का आणि व्यवस्थापन मग जमतंय का ?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experience and Management