भ्रमंती विश्वाची

प्रदीप जोशी
शनिवार, 7 जानेवारी 2017

तो केवळ भटक्‍या होता. बॅंकेतील नोकरी सोडून तो जग पाहायला निघाला. सायकलवरून सर्व खंडांमधून त्याने भ्रमंती केली. आता पुन्हा नव्या देशांच्या दिशेने तो निघाला आहे.

तो केवळ भटक्‍या होता. बॅंकेतील नोकरी सोडून तो जग पाहायला निघाला. सायकलवरून सर्व खंडांमधून त्याने भ्रमंती केली. आता पुन्हा नव्या देशांच्या दिशेने तो निघाला आहे.

सारे जग भटकून पाहावे, अशी इच्छा प्रशांत गोळवळकर याला कधी झाली, तो क्षण त्यालाही सांगता येणार नाही; पण नवनव्या देशात भटकण्याची त्याची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. एखाद्या स्वप्नद्रष्ट्याप्रमाणे वयाच्या अठराव्या वर्षी स्वित्झर्लंड पाहण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रशांतला विश्व पाहण्याची प्रेरणा त्याच्या वडिलांकडून मिळाली. प्रशांतचे वडीलही अवलियेच. त्यांनी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी तीन हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली; तर सायकलवरून विश्व भ्रमण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवीस वर्षे नोकरी केल्यानंतर प्रशांतने बॅंकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. 

प्रशांतने सतत अकरा वर्षे अमरनाथ आणि वैष्णोदेवीची पदयात्रा केली. भोपाल ते नेपाळ (खाटमांडू) हा सत्तावीसशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पंचवीस दिवसांत पूर्ण केला. मोटार सायकलवरून सुमारे पाच लाख किलोमीटरचा प्रवास केला. सन १९८५ ते २००१ पर्यंत सायकलवरून सर्व महाद्विपांतील ८७ देशांमधून दीड लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. प्रशांतचे स्वप्न केवळ काही प्रमुख नगर-शहरे, ऐतिहासिक स्थळे किंवा प्राकृतिक सौंदर्यांने नटलेली स्थळे पाहणे एवढेच मर्यादित नव्हते; तर विभिन्न देशांतील गाव, नगर, शहर, तेथील लोक, त्यांचे जीवन, राहणी, त्यांची संस्कृती वगैरे प्रत्यक्ष अनुभवण्याचे स्वप्न होते. 

ज्या वेळी हे सर्व पाहण्याचा आणि अनुभव घेण्याचा विचार आला, तेव्हा प्रशांतने सर्वांत उपयुक्त साधन म्हणून सायकलची निवड केली. सायकलने विश्व भ्रमण करायचे आणि तेदेखील ‘एकला चलो रे’ असा. १९८५ हे आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित झाले होते. त्याचवेळी सायकलने विश्व भ्रमण करण्याच्या स्वप्नाला साकार करण्याची, मूर्तरूप देण्याच्या तयारीला प्रारंभ झाला. त्या वेळी मोबाईल, इंटरनेट काय, दूरध्वनीची सेवाही व्यवस्थित नव्हती. त्या वेळी फक्त पाचशे डॉलर्स एवढेच विदेशी चलन मिळत असे. विश्वाचा नकाशा समोर ठेवून यात्रेचा मार्ग कसा असेल? कोणता असेल? याची रूपरेखा तयार करू लागला. मुंबईहून इस्तंबूलला हवाई मार्गे पोचायचे आणि तेथून पुढच्या सायकल यात्रेची सुरवात करायची. या प्रकारच्या यात्रेच्या प्रथम भागांत संपूर्ण युरोप यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. याप्रमाणे सुरू झालेली यात्रा दुसऱ्या टप्प्यांत दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडापर्यंत चालू राहील, असेही त्याने ठरवले. लक्षावधी लोक आपल्या आयुष्यांत आपला पूर्ण देशही पाहू शकत नाहीत, तेथे प्रशांतचा सायकलने विश्व भ्रमण करण्याचा संकल्प साकार करणे ही एक प्रशंसनीय आणि अद्वितीय गोष्ट आहे. 

नियोजनानुसार प्रशांत मुंबईहून टर्कीला गेला. तेथून पुढे तो बुल्गेरियाला गेला. तेथे जेवताना त्याची भेट एकवीरसिंह या भारतीयाबरोबर झाली. एकवीरसिंह ऑस्ट्रियातील बियानात राहायचा. प्रशांत बुल्गेरियात पोचला आणि बर्फवृष्टी चालू झाली. हॉटेलबाहेर जमिनीवर पाव मीटर जाडीचा बर्फाचा थर जमला होता. बाहेर पडणे मुश्‍कील झाले होते. एकवीरसिंहाने संपूर्ण युरोप पाहिले होते. त्याने प्रशांतला माहिती दिली की, त्याची येथे येण्याची वेळ चुकली आहे. बुल्गेरियाला मे महिन्यात यायला हवे होते. या दिवसात त्याने ग्रीसला जायला पाहिजे, कारण तेथे आता बर्फ पडत नाही. बुल्गेरिया आणि या भागात मार्चच्या शेवटपर्यंत बर्फ पडत राहील. त्याला ग्रीसमध्ये कामही मिळेल. ते दोघे दूतावासात गेले. तेथे त्याने ग्रीस दूतावासाकरिता व्हिसा मिळण्याच्या हेतूने पत्र मागितले. ते मिळाल्यावर नियोजित यात्रेत बदल करून प्रशांत ग्रीसमध्ये गेला. तिथे काही काळ नोकरीही केली. 

स्वित्झर्लंड पाहण्याचे प्रशांतचे स्वप्न एक दिवस पूर्ण झाले. या प्रवासात तो इरिका आणि रोल्फ या स्वीस दांपत्याकडे चक्क आठ दिवस राहिला. त्यांच्याकडून निघताना रोल्फने नकाशाच्या आधारे पुढचा मार्ग निश्‍चित करण्यात प्रशांतला मदत केली. रोल्फला स्वीसमधील रस्त्यांची चांगली माहिती होती. प्रशांतच्या दौऱ्याचा अंदाज घेत त्याचे मित्र, नातेवाईक त्या त्या दूतावासांत, प्रशांतच्या नावाने पत्रे पाठवीत आणि त्या त्या दूतावासाला भेट दिल्यावर त्याची पत्रे त्याला मिळत.

प्रशांतने त्याच्या युरोपच्या सहलीतील विविध अनुभवांवर हिंदीमध्ये एक पुस्तक लिहिले आहे, ‘दुनिया की सडके और मेरी सायकल’. सदुसष्ट वर्षांचा हा ‘तरुण’ या वर्षी सायकलवरून मेक्‍सिको, ब्राझील, कोलंबियाला जाण्याची योजना आखीत आहे. शुभास्ते पंथानः सन्तु।

Web Title: exploring the universe