नातं विठ्ठल मंदिराशी

फय्याज हुसेन खॉं
बुधवार, 18 जुलै 2018

बालपणी विठ्ठल मंदिराशी नाते जुळले. पुढे पंढरीरायासमोर व्हायोलिनवादन करता आले.

आम्ही नुकतेच लकडीपूल विठ्ठल मंदिरापाशी राहायला आलो होतो. माझे वडील उस्ताद महंमद हुसैन खॉंसाहेब यांनी जवळच "अरुण म्युझिक क्‍लास' सुरू केला होता. आम्ही भावंडे आणि जवळची काही मुले विठ्ठल मंदिरात खेळायला जात असू. अजूनही संभाजी पुलाजवळच्या मशिदीत शुक्रवारच्या नमाजाला जाताना पावले आपोआप मंदिराच्या दाराशी थांबतात. तेथे दर्शन घेऊन मगच पुढे जायचे हे जणू ठरूनच गेले.

थोडे मोठे झाल्यावर व्हायोलिनवादनाचा रियाज सुरू झाला. कार्यक्रमही सुरू झाले. मोठमोठ्या गायकांना व्हायोलिनची साथ करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळेच पुढे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी माझे नाते जुळले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बसून संगीताचा आनंद घेणे किती अवर्णनीय आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला. पंडित जगन्नाथबुवा पंढरपूरकर यांचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गाणे होते. तिन्ही दिवस त्यांच्या व्हायोलिनच्या साथीला मी आणि तबल्याच्या साथीला उस्ताद गुलाम रसूल खॉं होतो. बुवांनी गायलेला "बिहाग' राग अजून माझ्या स्मरणात आहे. त्या भक्तिमय वातावरणात मंदिराच्या सभामंडपात बसून संगीताचा आनंद घेणे हा विलक्षण अनुभव होता. "आनंदाचे डोही आनंद तरंग' असेच काहीसे त्याचे वर्णन करावेसे वाटते. त्या वेळची एक आठवण कायम स्मरणात आहे. विठ्ठलाची पूजाअर्चना चालली होती. विठ्ठलाला दागिने घातले जात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाला पेशवे सरकारांनी भेट दिलेले ते अप्रतिम दागिने होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आम्हाला ते आवर्जून दाखवले. ते दागिने घातलेले पंढरीरायाचे दर्शन कधीच विसरू शकत नाही. असे भाग्य फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येत असावे. त्यानंतर विठ्ठलाचा प्रसाद म्हणून की काय; पण पंढरपूरला माझे तीन कार्यक्रम झाले. तेथील रसिक मंडळाच्या निमंत्रणावरून मी पंढरपूरला गेलो होतो. तसेच मंगळवेढेकरबुवांच्या "क्‍लास'च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमातही त्यांनी मला आमंत्रण दिले होते. अशा प्रकारे बालपणी विठ्ठल मंदिराशी जुळलेले नाते पुढेही चालू राहिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fayyaz hussain kha write article in muktapeeth