जगातील सर्वात सुंदर , सहज आणि निकोप नाते मैत्री

friendship
friendship

जगातील सर्वात सुंदर , सहज आणि निकोप नाते कोणते असेल तर ते मैत्रीचे नाते ! मैत्रीचे नाते मागणी करते ते केवळ निर्व्याज मैत्रीची ! त्यात कुठलीच व्यावहरिकता नाही की कुठलीच अपेक्षा नाही की देवाणघेवाण नाही ! असते ती फक्त सुलभ , निष्पाप मैत्री! मैत्रीला कुठलेच बंधन नाही! ना वयाचे ना लिंगाचे ना जातीचे ना धर्माचे ना प्रांताचे ना राष्ट्राचे ! मैत्री ही या सर्वांच्या पल्याड आहे ! मैत्री ही एकच अशी गोष्ट आहे की ती वरील कोणत्याही बंधनात न अडकता खुलेपणाने ज्याच्याशी आपल्या मनाची व अर्थात मताची तार जुळते, त्याच्याशी करता येते.

पण हां ! मैत्रीला बंधन जरी नसले तरी एक नियम मात्र पाळावा लागतो बरं ! तो नियम म्हणजे मैत्री निभावण्याचा ! एकदा तुम्ही कोणाला मित्र किंवा मैत्रीण मानले की त्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारण्याची तयारी मात्र हवी ! मग त्यात मागे हटायचे नाही. आपल्या मित्रात असलेले गुण आपण स्वीकारावे , काही दोष असतील तर ते दूर करण्यास त्याला मदत करावी ! फक्त एवढीच काय ती देवघेव ! बाकी काही अपेक्षा नाही ! एकमेकांवर कुरघोडी करण्याची गरज नाही !

वर म्हटल्याप्रमाणे मैत्रीला कसलेच बंधन नाही. ती कुणाही सोबत होऊ शकते. मग ते पती पत्नी असो नाहीतर तर सासू सून ! नणंद भावजय असो नाहीतर जावाजावा असोत ! काय ? चरकलात ना वाचून ! पण हे खरे आहे. मी या सर्व नात्यातील मैत्री अनुभवतेय ! अश्या नात्यातील मैत्रीमुळे ते नाते अधिक घट्ट होते. आणि नात्यातील वीण घट्ट झाली की त्यातील मैत्री अधिक फुलते , नाही का ! असे सुंदर , सहज , सौहार्दपूर्ण ,अनोखे , मैत्रीचे नाते मी अनुभवतेय !

या अनोख्या मैत्रीमुळे होते काय की नात्यात कधी कटुता येत नाही व ते नाते कधीच जुने होत नाही ! कधीच कोमेजत नाही ! उलट दिवसेंदिवस ते फुलत जाते ! मुरत जाते , जसे जुने मुरलेले लोणचेच जणू ! जसे मुरलेल्या लोणच्यात फोडी एकजीव होतात तसे मुरलेल्या नात्यात आपणही एकजीव होतो ! असे मैत्रीपूर्ण नाते असले की त्यातील गोडवा कमी न होता वाढतच जातो. ते नाते कधीही शिळे होत नाही . त्यातील ताजेपणा कायम राहतो. आपल्याला या नात्यांतून समाधान लाभते .

आपण आपल्या आजुबाजुला असणारे नातेसंबंध पाहतो तेव्हा प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की आजकाल नातेसंबंध लवकरच दुरावतात. याचे कारण शोधताना असे लक्षात आले की आपण नाती व मैत्री या दोन बाबी वेगवेगळ्या ठेवतो. परंतु जर नात्यातील मैत्री फुलवली तर नातेसंबंध दुरावणार नाहीत तर त्यात सहजता येईल. एकप्रकारचा हलकेफुलकेपणा येईल ! या नात्यांचा भार न वाटता ती हवीहवीशी वाटतील ! त्यात कटुता निर्माण होणार नाही. नातेवाईकांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारण्याची आपली मानसिकता तयार होईल सख्यांनो !

एकदा का असे मैत्रीपूर्ण नाते तयार झाले की त्यात काही अपेक्षा राहणार नाहीत आणि जिथे अपेक्षा नाहीत तिथे अपेक्षाभंगाचे दुःख कसले ! तिथे असेल फक्त शुध्द , सच्चे मैत्रीचे नाते ! अशाप्रकारचे अपेक्षाविरहित , सहज , निकोप , मैत्रीपूर्ण नाते ही आज काळाची गरज आहे सख्यांनो ! आधीच अपले जीवन धकाधकीचे झालेय ! त्यात नात्यांतील कटुता आणखी भरच घालतेय ! त्याने नाती तुटण्याची भीती निर्माण होतेय आणि पर्यायाने आपण दुःखी होतोय !

ही जन्मजन्मांतरीची नाती दुरावू नये , तुटू नये यासाठी नात्यातील मैत्री फुलणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील ! परंतु ही मैत्री फुलवायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे ! आपण आज सगळेच कामासाठी म्हणून बाहेर जातोय . नवनवीन परक्या लोकांना भेटतोय . त्यांच्याशी पटवून घेतोय ! मग आपल्याच नातेवाईकांशी पटवून घ्यायला काय हरकत ! हं, त्यासाठी थोडा कमीपणा घ्यावा लागेल पण त्याने नाती दुरावण्यापासून , तुटण्यापासून तर बचावतील ! गुणदोष तर प्रत्येकातच असतात की ! कोणीच शंभर टक्के परफेक्ट नाही ! मग दुसऱ्यांकडूनच का अपेक्षा करायची , नाही का !

चला तर मग आपण सगळे मिळून ही नात्यातील मैत्री फुलविण्याचा प्रयत्न करूया ! एकदा का ही मैत्री फुलली की नाती कधीच तुटणार नाहीत ही आशा नव्हे तर खात्रीच आहे माझी ! प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळेल , हो ना !
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com