कोठे आहे आनंदी वृद्धत्व?

गौरी रास्ते
शनिवार, 19 मे 2018

थोडा संयम, थोडे मनाचे नियमन, तटस्थ वृतीने राहण्याची सवय, मौन राहण्याचे व्रत, एका मर्यादेनंतर घेतलेला क्षेत्रसन्यास आनंदी आणि सफल वृद्धत्वाकडे घेऊन जाईल.

थोडा संयम, थोडे मनाचे नियमन, तटस्थ वृतीने राहण्याची सवय, मौन राहण्याचे व्रत, एका मर्यादेनंतर घेतलेला क्षेत्रसन्यास आनंदी आणि सफल वृद्धत्वाकडे घेऊन जाईल.

बापूंनी कमलेशला जवळ जवळ दहाव्यांदा विचारले, ""आज तू घरी किती वाजता येणार आहेस?'' आता कमलेशचा संयम सुटला. तो जरा चढ्या स्वरात म्हणाला, ""रात्री अकरा वाजता. तुमचे जेवण, गोळ्या सर्व काढून ठेवेन, रात्री झोपायला सोबत म्हणून बाबू आहे, त्याला सर्व सांगितले आहे, तुम्ही का मला तेच तेच प्रश्न विचारून त्रास देत आहात?'' आज सकाळपासून बापूंनी विविध तऱ्हेने कमलेशला हैराण केले होते. मोठ्याने पेपर वाचून दाखव, शेजारी बसून गप्पा मार, जेवतानासुद्धा ते सुग्रास अन्नाला नावे ठेवीत जेवत होते. एरवीही कमलेश रोज थोडा वेळ तरी बाबांशी बोलत असेच, पण सतत कोणीतरी जवळ असावे, ही त्यांची अपेक्षा पूर्ण करणे शक्‍य नव्हतेच! गोळ्या नीट दिल्यास ना? इथपासून माझे पेन्शन, माझे कपडे, माझे बी पी.... मी, माझे, मला आणि फक्त मी! आपण चढ्या आवाजात वडिलांशी बोललो म्हणून खिन्न होऊन कमलेश बाहेर पडला. त्यावर बापू हातवारे करून काही बडबड करू लागले, तिकडे शांतपणे दुर्लक्ष करून कमलेश बाहेर पडला.

बापूंचा नव्वदावा वाढदिवस नुकताच झाला. कमलेशनेसुद्धा पासष्ठ वर्षे पार केली होती. अजूनही तो त्यांची कंपनी चालवीत होता. आज एकच दिवस कमलेश घरी होता, तेवढ्यात बापूंनी त्याला हैराण केले होते. रोज त्याची बायको नयना हे सर्व पार पडत असे. नयनासुद्धा बासष्ठची होतीच की! कमलेशला आपल्या बायकोचे महत्त्व नव्याने पटले. ती हे सारे कसे सहन करत असेल?
आता घरोघरी हे चित्र दिसत आहे. अति ज्येष्ठ, ज्येष्ठ, त्यांना सांभाळणारे प्रौढ!
वयाची पंच्याऐंशी पार केलेले हे अति वृद्ध आजी-आजोबा स्वतःचे वय झाले आहे, असे मानतच नाहीत. अर्थात, त्यांचे वय सांगण्याची आणि मानण्याची वेळ, हे भावनिक दया गोळा करण्याचे साधन म्हणून ते वापरतात. अजूनही त्यांना प्रत्येक कार्यक्रमात भाग घेण्याची हौस असतेच! दिसत नाही, ऐकू येत नाही, नव्या जमान्यातील गोष्टी समजून घेण्याची ताकत नाही, हे त्यांना मान्यच होत नाही. जीवनाकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा संपतच नाहीत... सगळीकडे मला न्या, हा धोसरा कमी होत नाही. त्यांना सांभाळणारे ज्येष्ठही आता पासष्ठी ओलांडून गेले आहेत, हे त्यांना दिसत नाही. त्यांच्या लेखी फक्त त्यांचे वय वाढले आहे, सर्व सहानुभूती, प्रेम त्यांनाच मिळाले पाहिजे, त्यांच्या मुलामुलींची वाढलेली वये त्यांना पटत नाहीत.
अति ज्येष्ठांना त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांचे वय हा, स्थळ काळ बघून त्यांनीच ठरवण्याचा विषय असतो, कधी ते एकदम तरुण असतात, तर कधी गलितगात्र वृद्ध असतात.

मधली पिढी, या अति ज्येष्ठ आणि तरुण मुले, नातवंडे यांमधील बफरचे काम करत असते. हे खाऊ नको, असे वागू नको, आत्ता रात्रीचा कशाला बाहेर पडतोस, घरचे वाया घालवून बाहेर का खातोस, असे वारंवार नातवंडांना टोकल्यावर, सारखे जुन्या जमान्यातील गोष्टी उगाळत राहिल्यावर, ती मुले त्यांच्या वाऱ्याला उभी राहत नाहीत. सुनांना आणि मुलांना त्यांचीच इतकी व्यवधाने असतात, की यां परम ज्येष्ठांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, उलट त्यांना आपल्या सासू-सासऱ्यांची काळजी वाटते, मुले, लेकी आणि सुना म्हणतात, "आई-बाबा, तुम्ही इतके अडकू नका त्यांच्यासाठी. चोवीस तासांची माणसे नेमू, त्यांना आपण काही वाऱ्यावर सोडले नाही, पण तुमचे आयुष्य तुम्ही जगा, तुम्ही दोघे ट्रीपला जा, प्रकृतीची काळजी घ्या, छंद जोपासा...! जग काय दोन्ही बाजूने बोलते, तुम्ही आपल्या विवेकबुद्धीला स्मरून त्यांची सर्व सोय केली आहे, सेवा केली आहे...आता तुम्ही पण आनंदाने जगा.'

हे सर्व पहिले की वाटते, आनंदी वृद्धत्व नसते की काय? पण असे नाही. थोडा संयम, थोडे मनाचे नियमन, तटस्थ वृतीने राहण्याची सवय, मौन राहण्याचे व्रत, एका मर्यादेनंतर घेतलेला क्षेत्रसन्यास, हे सारे मार्ग आहेत आनंदी आणि सफल वृद्धत्वाकडे जाण्याचे. प्रेमाला बांधून ठेवून, सक्ती करून, जबरदस्ती करून ते मिळत नसते, तर पुढच्या पिढीला मोकळा श्वास घेऊ दे, त्यांना त्यांच्या चुकातून शिकू दे! आपला त्याग त्यांच्यावर लादू नये, त्यांना पंखात ताकद आली की ते मोकळ्या आकाशात उडणारच, त्यांना खेचून जमिनीवर आणणे व्यर्थ आहे. आपले आई-वडील, आजी-आजोबा स्वमग्न नाहीत, तर आत्ममग्न होऊन त्यांच्या आनंदाच्या वाटा शोधून त्यावर चालत आहेत, हे बघून त्यांनासुद्धा आनंदच मिळेल ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauri raste write article in muktapeeth