गावाकडे वळताना (मुक्तपीठ)

विठ्ठलराव ठाकर पाटील
बुधवार, 6 जुलै 2016

निवृत्तीनंतर या वयात मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, आपला पिंड, बाल व्यक्तिमत्त्व ज्या घराने, गावाने, परिसराने घडविलेले असते, याची शेवटपर्यंत मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा असते. ज्या घरात आपण जन्माला येतो, ते घर दैवयोगाने आपल्याला दिलेले असते. याच घरात बालपणीचा काळ काढावा लागतो. या घरातील संस्कृती, संस्कार घेऊनच आपण आपली स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, मनोदय साकार करून समर्थपणे स्वतःच्या पायावर उभे राहतो. कर्तव्यपूर्तीनंतर नकळत पुन्हा आपली पावले जुन्या आठवणी घेऊन जन्मभूमीकडे वळतात.

निवृत्तीनंतर या वयात मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, आपला पिंड, बाल व्यक्तिमत्त्व ज्या घराने, गावाने, परिसराने घडविलेले असते, याची शेवटपर्यंत मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा असते. ज्या घरात आपण जन्माला येतो, ते घर दैवयोगाने आपल्याला दिलेले असते. याच घरात बालपणीचा काळ काढावा लागतो. या घरातील संस्कृती, संस्कार घेऊनच आपण आपली स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, मनोदय साकार करून समर्थपणे स्वतःच्या पायावर उभे राहतो. कर्तव्यपूर्तीनंतर नकळत पुन्हा आपली पावले जुन्या आठवणी घेऊन जन्मभूमीकडे वळतात.

माझाही अनुभव असाच आहे. माझं जन्मगाव कुरण खुर्द हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा मावळांपैकी एक म्हणजे मोसे खोर येथे आहे. सह्याद्रीच्या कुशीत व पानशेत, वरसगाव धरणाच्या रम्य परिसरात वसलेले आहे. निसर्गाचे मोहक व नयनरम्य वरदान लाभलेला असा हा परिसर आहे. येथेच मी माझा बालपणाचा काळ घालविला. पानशेत येथील हायस्कूलमधून सन 1971 मध्ये एस.एस.सी. (जुनी 11 वी) परीक्षा मी प्रथमश्रेणीत पास झालो. पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी मला कोणत्याही परिस्थितीत माझे गाव व हा परिसर सोडावाच लागणार होता. काहीही झालं तरी खूप शिकायचं व मोठा अधिकारी व्हायचं, ही जिद्द व महत्त्वाकांक्षा मनी बाळगूनच सन 1972 च्या भयाण दुष्काळात गाव सोडलं.

गाव सोडताना माझं मन बालपणीच्या अनेक आठवणींनी भरून आलं. भूतकाळातील गावाकडील आठवणीत ते कधी रमून गेलं हे कळलंच नाही. कुटुंबीयांचा निरोप घेताना मनाची झालेली घालमेल व डोळ्यांतून आलेले अश्रू मी लपवू शकलो नाही. गावाकडे घालविलेले बालपण आठवलं. हिरवीगार शेती, शिवार हा परिसर डोळ्यांसमोर उभा राहिला. साठ वर्षांपूर्वी सुखसोईपासून वंचित असलेलं असं हे गाव. घरांच्या छतावर अर्ध्या भागात केंबळाच गवत व उरलेल्या भागात पत्रे व मातीची कौले, कूड मातीच्या भिंतीची घरे असत. बैल, गायी, म्हशी व तरणी खोंड यांनी घरासमोरचे गोठे भरलेले असत. जिरायती पिकांमध्ये नाचणी, वरई, आंबेमोहोरची भातशेती केली जाई. संपूर्ण गाव बांबूची दाट बने, आंबे, चिंचा, करवंदे, फणस व विविध प्रकारच्या जंगली झाडांनी वेढलेला असे.

गावासमोरील उंच डोंगरकडे व पावसाळ्यात ओढ्यांचे धबधबे यांचे दर्शन होई. निसर्ग प्रत्येक ऋतूत आपली रूपे बदलत असे. पटांगणात, माळरानात सवंगड्यांसोबत आम्ही विटी- दांडू, गोट्या, लगोरी, सुरपांरब्या, लंगडी, हुतुतू असे जुने खेळ खेळायचो. खेड्यात त्याकाळी वीज नव्हती. अजूनही आठवतंय, रॉकेलची चिमणी व मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही मॅट्रिकपर्यंतचा अभ्यास केला. असुविधा असूनही या वातावरणांचा कधी कंटाळा वाटला नाही. उन्हाळ्यात आंबी मोसी नदीच्या संगमावर डोहात पोहणे, मासे पकडणे ही मजा अवर्णनीय अशीच होती. 1961 मध्ये पानशेत धरण फुटलं त्या वेळी आलेला महापूर बालपणी मी गावाजवळून पाहिला. थंडीत आम्ही शेकोटीची मजा घेतली. वनातील वनभोजनाची वेगळीच मजा असे. घरी विपुल दुध दुभते असल्याने दूध, दही, ताक, तूप यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. सगळं कसं अगदी सकस व निर्भेळ असे. या वातावरणाची श्रीमंती आजच्या पिढीला नाही. हे सगळं आठवताना आज लक्षात येतं की, या सगळ्यामधून काय साध्य व्हायचं तर करमणूक व्यायाम, निकोप वातावरणाचा लाभ, आताच्या मुलांना हे सगळं विकत घ्यावं लागतं याची खंत वाटते. गावाकडील घर पुन्हा माझ्या मनात घर करून राहिलंय. काळानुरूप आमच्या पिढीने या घराचं रूपही बदललंय. सेकंड होम म्हणून तेथील वातावरणाचा आनंद आमचे कुटुंबीय घेत असते. वीकेंड व सण उत्सवाच्या काळात गावी जाऊन चार दिवस राहतो.

आज गाव सोडून पंचेचाळीस वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, गावाची हुरहुर कायम आहे. काळाच्या बदलानुसार खेडोपाडी खूपच बदल झालाय. गावाचं गावपण हरवत चाललंय. डांबरी रस्ते होऊन काटेरी सडका बुजल्यात. आड, विहिरीतील पाणी हंडे- घागरीने आणताना स्त्रिया, मुली दिसत नाहीत. जात्यावरची, औतावरची गाणी संपलीत. गुरे, ढोरे, खिल्लार बैल, गाई, म्हशी दिसत नाहीत. गोठे ओस पडलेत. दळणवळण वाढल्याने घरोघरी जीप, कार, दुचाकी झाल्यात. वाढत्या शहरीकरणांमुळे गावाकडील डोंगर जमिनींना चांगल्या किमती येत आहेत. पैसा दिसू लागल्याने माणुसकी, आपुलकी हरवत चाललीय. हे सगळं चित्र पाहिलं की, गावाकडे जाताना मन व्याकूळ होतं. जुने दिवस आठवतात. तरीही आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या घरातून मी मोठा होण्यासाठी बाहेर पडलो, त्याच घराकडे निवृत्तीच्या काळात पुन्हा पावले वळावीत, हा विलक्षण योगायोग आहे. आज याच घराची ओढ, आवड अधिक आहे. पुणे शहरातील यंत्रवत जीवनाचा कंटाळा वाटतो. वाढती वाहन रहदारी व प्रदूषणाच्या विळख्यात शहर अडकलंय. गावाकडील डोंगर-दऱ्या आंब्याची झाडे, हिरवीगार शेते पाहिली की, पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटते व मन प्रसन्न होते. बालपणातील परिसराच्या जुन्या खुणा आजही मनाला भुरळ घालतात. खरोखर निवृत्तीनंतर आजही गावाची हुरहुर अद्यापी मनात कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gavakade valtana