सोशल मीडियाची सोनेरी बाजू

विजय तरवडे
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

आभासी जगात रमणाऱ्यांना खरे मित्र नसतात, असे म्हटले जाते. माणसे एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा आभासी जगात अधिक भेटतात, अशीही टीका होत आहे. यात पूर्ण चूक असे काही नाहीच, पण तेच तेवढे बरोबर असेही नाही. आभासी जगात भेटलेले समानधर्मा प्रत्यक्षात एकमेकांसाठी धावूनही जातात. 
 

सोशल मीडियामध्ये भेटणाऱ्या आभासी मित्र-मैत्रिणींबाबत अनेकदा विपरीत बातम्या येतात, प्रतिकूल सूर लावला जातो. तो बहुतांश खरा असतोही. पण मला सोशल मीडियामध्ये चांगले मित्र-मैत्रिणीदेखील भेटले, हे सांगायलाच हवे. 

आभासी जगात रमणाऱ्यांना खरे मित्र नसतात, असे म्हटले जाते. माणसे एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा आभासी जगात अधिक भेटतात, अशीही टीका होत आहे. यात पूर्ण चूक असे काही नाहीच, पण तेच तेवढे बरोबर असेही नाही. आभासी जगात भेटलेले समानधर्मा प्रत्यक्षात एकमेकांसाठी धावूनही जातात. 
 

सोशल मीडियामध्ये भेटणाऱ्या आभासी मित्र-मैत्रिणींबाबत अनेकदा विपरीत बातम्या येतात, प्रतिकूल सूर लावला जातो. तो बहुतांश खरा असतोही. पण मला सोशल मीडियामध्ये चांगले मित्र-मैत्रिणीदेखील भेटले, हे सांगायलाच हवे. 

फेसबुकवर मी नवीन असताना डॉ. श्रीनिवास देशपांडे नावाचे सद्‌गृहस्थ वैद्यकीय विषयावर माहितीपर लेखन करीत. आधी माझा समज झाला, की ते स्वतःची अप्रत्यक्ष जाहिरात करीत असावेत. पण त्यांचे बरेच लेखन वाचल्यावर तो गैरसमज दूर झाला. एकदा आम्ही प्रत्यक्ष भेटलो. मग फेसबुकवरचे इतर समानधर्मी लोक हळूहळू भेटू लागलो. त्यातून आमचा ‘रिगल मित्र समूह’ नावाचा फेसबुक-ग्रुप तयार झाला आणि आम्ही नियमित भेटू लागलो. वाचनाची, चांगले चित्रपट बघण्याची आवड असलेले समानधर्मी लोक हळूहळू एकत्र आले. विविध पुस्तकांवर गप्पा मारू लागले. आम्ही पुण्यातले सदस्य चांगले चित्रपट किंवा सांस्कृतिक कार्यक्रम एकत्र पाहू लागलो.

आंतरजालाच्या सुविधेमुळे पुण्याबाहेरचे आणि जगभरातले मित्रदेखील आमच्या समूहाशी जोडले गेले. बघता बघता आमचे एक मोठे कुटुंब तयार झाले. कुटुंब असल्याने या समूहात कोणी अध्यक्ष, चिटणीस, खजिनदार नाहीत. दरमहा पहिल्या रविवारी आवर्जून रिगल हॉटेलमध्ये जमायचे, एरवी बाहेरचे पाहुणे आले, की एकमेकांच्या घरी किंवा अन्यत्र ठरवून भेटायचे हा मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. आपापल्या कुटुंबातले सुखदुःखांचे क्षण आम्ही वाटून घेऊ लागलो.   

त्या सुमारास माझ्या पत्नीला पाठदुखी आणि गुडघेदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. तिला आधाराशिवाय नीट उभे राहणे किंवा घरातल्या घरात चालणेदेखील अवघड झाले. किरकोळ वेदनाशामक गोळ्या काम करीनात. डॉ. श्रीनिवास आणि डॉ. शर्मिला या जोडप्याने त्या काळात मार्गदर्शन केले. आम्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भीतभीत गेलो. तपासण्या केल्या. मणक्‍याची आणि गुडघ्यांची अशा दोन शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रिया टाळता येतील का यावर वर्षभर खल झाला. देशपांडे दांपत्य, डॉ. महेश मोने, डॉ. संजीव केंद्रे, फॅमिली डॉक्‍टर आणि नात्यातले दोन आयुर्वेदिक डॉक्‍टर या सर्वांचे शस्त्रक्रियेवर एकमत झाले. मर्यादित ‘बजेट’मुळे तिन्ही शस्त्रक्रिया एकदम करणे शक्‍य नव्हते. म्हणून आधी मणक्‍याची शस्त्रक्रिया आणि नंतर काही दिवसांनी गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. मधल्या काळात वेदनाशामक औषधांचा वापर टाळून रोजचे व्यवहार पार पडावेत यासाठी डॉ. संजीव केंद्रे यांनी खूप मदत केली. रात्री-अपरात्री केव्हाही फोन केला, तरी डॉ. राजेंद्र जोशी, डॉ. अरुण गद्रे, डॉ. सदानंद जोशी, डॉ. बिपीन कुलकर्णी हे स्नेही न चिडता मार्गदर्शन करीत. 

आमच्या घरात माणूसबळ अजिबात नाही. आम्ही दोघे आणि माझी वृद्ध आई. पण अशा वेळी फेसबुकवरचे मित्रच कामाला आले. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी आणि नंतर डॉ. शर्मिला देशपांडे आणि डॉ. कल्पिता नटराजन अनेकदा भेटल्या, सोबत थांबून पत्नीला धीर दिला. रिगल मित्र समूहातले इतर सारे स्नेही सोबत थांबायला येत. एकेदिवशी रुग्णालयात अर्जंट पैसे भरायचे होते आणि माझे कार्ड चुकीच्या पिनमुळे ब्लॉक झाले तेव्हा 

अनिरुद्ध नावाच्या फेसबुक मित्राने धावत येऊन पाच आकडी रक्कम भरली. डिस्चार्जच्या वेळी फिजिओंनी सांगितले होते, की शस्त्रक्रियेनंतर वर्षभर गुडघ्यांवर जिथे टाके आहेत तिथे हिवाळ्यात किंवा वारा सुटल्यावर तीव्र वेदना होतात. त्या सहन कराव्या लागतात. मनात विचार आला, की गुडघ्यांसाठी ‘नी कॅप’ असते तशी लोकरीची वजनाला हलकी ‘नी कॅप’ करता येईल का? सहज डॉ. कल्पिताला विचारले. त्या (समाजसेवेचा भाग म्हणून) अत्यवस्थ आणि गरीब रुग्णांसाठी लोकरीचे कपडे विणून त्यांना मोफत देत असतात. त्यांनी त्यांच्या व्यापांतून वेळ काढून तशी ‘नी कॅप’ बनवली. तिचा पत्नीला अतिशय उत्तम उपयोग झाला. या ‘लोकरी नी कॅप’चे रीतसर डिझाइन बनवून कल्पिता यांनी पेटंट घ्यायला हवे. कारण उतारवयात गुडघ्यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांना सर्वांना याचा लाभ मिळेल. 

आमच्या कुटुंबात आम्ही दोघेच आहोत. मुले परगावी खासगी नोकरीत असतात. अडीअडचणीला धावून येणे जेव्हा त्यांना शक्‍य होत नाही तेव्हा आमचे फेसबुक स्नेहीच मदतीला धावून येतात. रिगल मित्र समूह हेच आमचे कुटुंब झाले आहे.  
इतरांनादेखील असे मित्र-मैत्रिणी लाभोत हीच शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden edge social media