जागातिक विक्रम करणारी माणसं मागील बाकांवरील

prabhakar pachpute
prabhakar pachpute

पावसाळा सुरू झाला की, बारीक कौलारू छप्‍परातून एक-एक थेंब घराच्‍या आत टपकायचा. घरातील भांड्यांची वारी पावसाचे थेंब तोंडात घ्‍यायला पंगतीनं रांगेत उभी राहायची. रात्र जागून पावसाच्‍या मंजूळ स्‍वरांचा आनंद आपल्‍या आयुष्‍यात भरून घ्‍यायचा. सकाळ झाली की, रस्‍त्‍यांवरील चिखल पावलांनी तुडवत सुगंधी पुस्‍तकांना मेनकापडात कोंबून कधी छत्रीविना तर कधी दोघं-दोघं एकाच छत्रीत पावसाचा मनमुराद आनंद घेत शाळेतील वर्ग खोली गाठायची. वर्गात खाली बसायला बैसरपट्टी नसायची. कौलांच्‍या फटींतून पाऊस आधीच वर्गात विराजमान झालेला असायचा.

पावसाच्या गाण्‍यात पाठ्यपुस्‍तकांतील कविता केव्‍हाच विरून गेलेली असायची. अभावाची दरी पावसाने केव्‍हाच मिटवलेली होती. परिस्थितीचा सोस मानेवर असला तरी पावसाचा आनंद सारं काही स्‍वतःसोबत वाहून घेऊन जायचा. संध्‍याकाळी जनावरांची आणि आमची शाळा एकाच वेळेस सुटायची. गाईच्‍या उडत्‍या शेपटांना हुलकावणी देत घर गाठायचं. निसर्गाच्‍या कुशीत पावसाचे ऑनलाईन शिक्षण निरंतर सुरू असायचे. आमची पिढी संसर्गाच्‍या, गावंढळ सभ्‍यतेच्‍या चिखलात मोठी झाली. पोट रिकामे असले तरी, मनाची भूक केव्‍हाच मिटलेली होती. आनंद चहूबाजूंनी व्‍यापला होता.

सुट्टीच्‍या दिवशी तलावाच्‍या सलंगावर मौज करायला. तर कधी कुंभारांच्‍या मुलांसोबत विरंगुळा म्‍हणून सकाटी घेऊन नाल्‍यावर मासे पकडायला अख्‍खा दिवस घालवायचा. पावसात कडाडणा-या विजांची प्रचंड भिती वाटायची. ती आजही कायम आहे. गावात कुणाच्‍या गोठ्यावर, शेतात वीज पडली की गावभर चर्चा व्‍हायची. वर्धा नदीने डाब फेकली की, वाहतूक ठप्‍प व्‍हायची. पुरात वाहून आलेले ओंडके, बारीक काड्या जमा करायला गावाबाहेर लोकांची तोबा गर्दी असायची. एखादा साप अंगावर धावून आला की, सारे दूर पळायचे. पावसात चूल कायम रुसलेली असायची. तिच्यात जीव भरण्‍यासाठी बायांचा त्रागा व्‍हायचा. तिच्‍याही डोळ्यात पाऊस अलगद यायचा. थेंबांना अलगद लपवत लेकारांसाठी चुलीला कवेत घ्‍यायची. धुरांचे ढग प्रत्‍येकांच्‍या घरावर तयार व्‍हायचे. शेतीच्‍या कामात गुंतलेले चिखलाचे पाय उंब-यात ठसा उमटवून जायचे.

पावसाआधी झाडाला कु-हाडीच्‍या मदतीने आकार देण्‍याकरिता फांद्या छाटल्‍या जायच्‍या. कधी-कधी झाडांचे बुडच छाटले जायचे. मुळांनी मात्र झाडाला घट्ट पकडून ठेवलेले असायचे. मुळांना मंजूर नसायचे घाव झाले तरी अस्तित्‍व नष्‍ट करणे. झाडाच्‍या घावातून फुटवे (भादवे) बाहेर यायचे आणि मृतप्राय झालेल्‍या झाडाच्‍या बुध्‍यांला हिरवाकंच बहर यायचा. झाड पुन्‍हा नव्‍याने उभी राहायची. परिस्थितीला भीक न घालता उभं राहण्‍याचं बळ मुळांनी दिलेलं असायचं. समाजात अशी अनेक माणसं आहेत, ज्‍यांना परिस्थितीनं कितीही पछाडलं असलं तरी, थांबणे त्‍यांच्‍या शब्दकोशात नाही. भादव्‍यांसारखे पुन्‍हा पुन्‍हा उगवणे ठाऊक असते.

परीक्षांचे निकाल घोषित झाले की, गुणांची सूज घेऊन बाहेर पडणा-या जेत्‍यांचे कौतुक होते. त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाचे सर्वत्र गुणगाण गायल्‍या जाते. नापास होणा-या विद्यार्थ्‍यांना उपेक्षांचा मार सहन करत तोंड लपवावे लागते. एखाद्या विद्यार्थ्‍यांने उत्‍तुंग शिखर गाठले म्‍हणजे, त्‍याच्‍या यशात सहभागी असणा-या शिक्षकांचे फोटो सर्वत्र झळकतात. ‘हा माझा विद्यार्थी आहे’ असे मोठ्या अभिमानाने सांगतात. पण, धडपडण्याच्‍या शर्यतीत मागे पडलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पाठिशी कुणीही नसते. अपयशाच्‍या सावलीची जबाबदारी घ्‍यायला कुणीही धजत नाही.

अपयश आलं म्‍हणून खचून न जाता, अपयशी माणसांनी प्रचंड मेहनतीने यशाची शिखरं काबीज केली आहेत. प्रभाकर पाचपुते अशाच अस्‍सल गावरान वातावरणाचा साक्षीदार. वर्धा नदीच्‍या काठावर, कोलमाईनच्‍या परिसरात त्‍याच्‍या बालपणाची जडणघडण झाली. वडिलांच्‍या अकाली निधनाने त्‍याच्‍या बालमनात संवेदनेची पोकळी निर्माण झाली. मोठ्या भावाच्‍या, आईच्‍या आधाराने आयुष्‍याचा प्रवास सुरू केला. इयत्‍ता दहावी म्‍हणजे समाजाने ठरवलेली भविष्‍यकालीन यशापयशाची पहिली पायरी. पहिल्‍याच पायरीत त्‍याला इंग्रजी आणि गणिताने दगा दिला.

नापासीच्‍या कातरजाळ्यात अडकलेल्‍या मुलांना समाजाच्‍या काटेरी शब्‍दनजरेचा सामना करावा लागतो. त्‍याने अनेकांचे बोलणे ऐकले. हताश झाला पण खचला नाही. त्‍याला चित्रकलेची प्रचंड आवड. काही स्‍पर्धेत आपले कर्तृत्‍वही सिद्ध केले होते. पुनर्रपरीक्षा देऊन कसाबसा दहावी पास झाला. त्‍याच्‍यातील चित्रप्रतिभा ओळखून अनेकांनी त्‍याला चित्रकलेचं शिक्षण घेण्‍याचा सल्‍ला दिला. बारावीनंतर परंपरागत शिक्षणाला फाटा देत त्‍याने थेट छत्‍तीसगड येथील खैरागड गाठले. आर्थिक चणचण सहन करून बी.एफ.ए. पूर्ण केले. नंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून एम.एफ.ए. पूर्ण केले.

मुंबईत वडापाव खाऊन अनेक आर्ट गॅलरीत काही दिवसं काढले. सांघिक स्‍वरुपात अनेक आर्टिस्‍ट सोबत कामही केले. नव्‍या नव्‍या विषयांना आपल्‍या अभिव्‍यक्तित स्‍थान देऊ लागला. पण त्‍याचे मन गावाकडील मातीच्‍या ओढीनं अस्‍वस्‍थ राहिले. गावाकडचे सामाजिक जीवन कलेच्‍या माध्‍यमातून जागतिक केले. कोलमाईनचा परिसर, तेथील अंतरंग, कामगार आणि आजची स्थिती, जागतिकीकरणाचा शेतीवर झालेला परिणाम... आदी विषय कलेच्‍या सृजन शैलीने मांडले.

जगातील प्रतिभावंत ‘व्हिज्‍यूअल आर्टिस्‍ट’ च्‍या यादीत त्‍याचे नाव अत्‍यंत आदराने घेतले जाते. नॅशनल आर्ट गॅलरीसह जगातील विविध गॅलरीत त्‍याच्‍या कलेने स्‍थान प्राप्‍त केले. जगभरातील पाच ऑर्टिस्‍टच्‍या कलेचं प्रदर्शन इंग्‍लंडमध्‍ये मंडाई आर्ट फेस्‍टीवल पुरस्‍काराच्‍या शर्यतीत आहे. त्‍यातील प्रभाकर एक असून, आशिया खंडातून तो एकमेव प्रतिनिधित्‍व करतो आहे.

सध्‍या पुण्‍यात त्‍याचा स्‍टुडिओ आहे. त्याची पत्‍नी रुपाली पाटील ही देखील भारतीय समाज बदलांचे सार्वत्रिक चित्र कलेत मांडणारी स्त्रीवादी आर्टिस्‍ट आहे. आपल्‍यासारखीच खेड्यांतून मुलं घडावी, म्‍हणून तो धडपडत असतो. अनेक विद्यार्थ्‍यांना आपल्‍या मिळकतीतून शिष्‍यवृत्‍ती प्रदान करतो. नापासीच्‍या काळात भोगावे लागलेले उपेक्षांचे शिक्‍के त्‍याने पुसले. आपल्‍या देशात कलेकडे मनोरंजनाच्‍या अंगाने बघितले जाते. कला मानवी संस्‍काराचा एक उत्‍तम व्‍यवसाय आहे. अपयशाला हरवत परंपरागत शिक्षण न घेता वेगळी वाट चोखाळली म्‍हणून त्‍याला अर्धेअधिक जग पालथे घालता आले.

मागे पडले पाऊल
पुढे टाकायचे आहे
प्रस्‍तराच्‍या भाळावर
नाव कोरायचे आहे.
जरी कोपला हा काळ
तरी मारू नये मन
चालणा-या पावलांना
थिटे विराट अंगण .

आपल्‍या देशात सर्वांना सारखे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणांनुसार शिक्षण दिले जात नाही. पण, ज्‍याला ज्‍या विषयांत कौशल्‍य प्राप्‍त करायचे आहे, त्‍याला संधीही उपलब्‍ध आहे. धाडस आणि थोडी जोखीम पत्‍करण्‍याची तयारी हवी. तसे रोजचे आयुष्‍य चालता-बोलता जोखीमच आहे. नापासांचे पालकत्‍व स्‍वीकारणे म्‍हणजे प्रवाहाचे अंतर्बाह्य मूल्‍यमापनाची संधी प्राप्‍त करून घेणे होय. थांबणे म्‍हणजे नव्‍याने सुरुवात करणे. चालणा-या माणसांच्या स्‍वागतासाठी धरती उभी असते. केवळ पुस्‍तकांच्‍या पानांतून जगण्‍याचे ध्‍येय गाठता येत नाही. अनुभवांची, प्रेरणांची, कठिण श्रमाची तयारी अपेक्षित आहे. ज्‍यांची पावलं अपयशाच्‍या चिखलांनी माखलेली असतात, ते समाजाच्‍या उपेक्षांचा विचार करत नाही. गावपण त्‍यांच्‍या उरात कोंबून असते. म्‍हणून, त्‍यांना मानवाच्‍या उत्‍तीर्णतेचे मैदान माहीत असते. जागातिक विक्रम करणारी माणसं मागील बाकांवरील होती, हा इतिहासाचा दाखला विसरून कसे चालेल.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com