esakal | गुरुचरणी सडा पडावा। भक्ती प्रेम पुष्पांचा
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

श्री गुरुपौर्णिमेनिमित्त ब्रह्मलीन संत रघुनाथराय पत्तरकिने महाराज यांना आदरांजलीपर लेख

गुरुचरणी सडा पडावा। भक्ती प्रेम पुष्पांचा

sakal_logo
By
-डॉ. दिलीप वामनराव देशपांडे 85 प्रसादनगर नागपूर- 36

विदर्भ ही संतांची भूमी. वैदर्भिय संतांच्या या मांदियाळीतील अनेक संत पुरुषांनी सामाजिक प्रबोधनातून आपले कार्य पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सामाजिक भान ठेवूनच समाजातिल दैन्य, दूरावस्था लोकांचे अज्ञान दूर करून त्यांना आत्मज्ञानाचा आणि भक्तिचा सोपा मार्ग कथन केला आहे.

शेगावीचा राणा श्रीगजाजनन महाराज, रामदासी संप्रदायाचे श्री प्रल्हाद महाराज, नरखेडचे संत आडकुजी महाराज, वं. तुकडोजी महाराज, माधानचे संत गुलाबराव महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज, पवनारचे संत श्री विनोबा भावे, कौंडिण्यपूरचे संत अच्युत महाराज, आकोटचे श्रीहरी बुवा, नागपूरचे ताजुद्दीनबाबा, संत रघुनाथराव पत्तरकिने महाराज इत्यादी संत मंडळींनी लोकोद्धाराचेच कार्य करण्यासाठी आपला देह चंदनासम झिजविला. आपल्या वाणीतून, लेखणीतून भक्तीची शक्ती एकवटून सामाजिक, अध्यात्मिक जागृती आणि प्रगती साधण्याचा प्रयत्न करून लोकांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जनसेवा हीच ईश्‍वरय सेवा हे ब्रीद अंगी बाळगणारे आणि आधी केले मग सांगितले या वृत्तीप्रमाणे कृती करणारे हे समाज सुधारक संत होते.

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या अनेक शिष्यांमध्ये नागपूरचे संत श्री रघुनाथराय पत्तरकिने महाराजांचे नाव आदराने आणि श्रद्धापूर्वक घेतले जाते. वंदनीय राष्ट्रसंतांच्या कार्याने श्री रघुनाथराय महाराज अधिक प्रभावशाली झाले. अध्यात्माचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

श्री रघुनाथराय महाराजांचा जन्म इ. स. 1913 साली भंडारा जिल्ह्यातील मोहाडी या ग्रामी नदी तीरावरील विठ्ठल मंदिरात झाला. त्या दिवशी श्रीरामनवमीचा परम पावन शुभमुहुर्त असल्यामुळे त्यांचे नाव रघुनाथ ठेवण्यात आले. त्यांच्या मातोश्री जानकीबाई आणि वडील तानकोपंत उर्फ अण्णाजी दोन्ही घराण्यात संतपुरुषांचे वास्तव्य आणि अध्यात्माचा प्रभाव असल्यामुळे साहाजिकच त्याचा परिणाम रघुनाथाच्या मनावर झाला आणि अध्यामाच्या आणि साधुत्वाच्या संस्कारातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. रघुनाथराय हे पाच वर्षाचे असताना नोकरीनिमित्त त्यांचे आई वडील नागपुरात आले.

दादासाहेब उधोजी यांच्या वाड्यात त्यांना राहावयास मिळाले. कुलीन घराण्यातील संस्कारामुळे हे घराणे प्रिय झाले. त्याकाळात हा वाडा बड्या मंडळींनी गजबजलेला असे. दादासाहेब राजकारण्यांचे भिष्माचार्य गणले जात होते. त्यामुळे राजकारणी मंडळींची तेथे वर्दळ असे. डॉ. मुंजे, बॅ. अभ्यंकर, डॉ. खरे, डॉ. हेडगेवार, नारायणराव अळेकर, किनखेडे, पाध्ये इत्यादी मंडळींचा त्यामध्ये सहभाग होता. रघुनाथावर या सर्वांचा लोभ होता. त्यांची लहान सहान कामे ते चटकन करीत बॅ. अभ्यंकर हे रघुनाथाच्या हजरजवाबी उत्तरामुळे व त्याच्या चुणचुणीतपणामुळे खूष होते.

सुटीच्या वेळी ते त्याला राजकारणी दौऱ्यावर आपल्यासोबत नेत सभा सुरु होण्याआधी गीत म्हणयला सांगर्त. कधी कधी बोलावयासही सांगत. त्यांच्या सहवासाचा रघुनाथावर अत्यंत प्रभाव होऊन त्यायंच्या हृदयात त्याग, धडाडी, निर्भयता, स्पष्टवक्तेपणा व मोकळेपणा निर्माण झाला. अशा तऱ्हेने राष्टभक्तिचे बाळकडू त्यांना बालपणी प्राप्त झाले. तसेच पारमार्थिक जीवनाचा पायाही याच काळात रचला गेला. उधोजीच्या वाड्याजवळ श्री मोतीबाबा साहेब जामदार नावाचे दत्त भक्त असणारे सत्‌पुरुष होते. त्यांच्या सहवासात रघुनाथांना परमार्थाची ओढ लागली. नागपूरच्या ताजुद्दीनबाबा अवलीया यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

वंदनीय तुकडोजी महाराजांच्या कार्यामध्ये रघुनाथांनी स्वतःला झोकून घेतले. त्यांच्या आज्ञेचे विश्‍व शांती नाम सप्ताहाचे कार्य रघुनाथांच्या वाड्यातूनच झाले. रघुनाथांनी आपली शाळा बंद करून महाराजांच्या आज्ञेने श्री गुरुदेव मासिक आणि सेवामंडळाच्या कार्यात ते सक्रिय झाले. त्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली. गुरुकुंज आश्रमातील मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने छात्रपाल म्हणून महाराजांनी रघुनाथरायांची नियुक्ती केली.

रघुनाथराय हे कवी मनाचे होते हा समृद्ध वारसा त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या घराण्यातूनच मिळाला होता. जनसेवेच्या गंगाजळाने त्यांचे अंतकरण पवित्र आणि स्थिर होत गेले. महाराजांनी वेळोवेळी येऊन त्यांच्या अंतकरणाला उजाळा देत म्हणावे, रघुनाथा, तू मराठी हिंदीतून तर लिहितोस पण आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे स्वरूप इंग्रजीतून नाही का व्यक्त करू शकणार. आपली कृपा असेल तर तसेही घडेल असेच मनोमन वाटून रघुनाथ स्तब्ध राहिला. योगायोगाने या घटनेनंतर एका रात्री अडीच वाजता श्री रघुनाथराय यांना झोपेतून एकाएकी जाग आली व त्यांना इंग्रजीतून काव्य करण्याची स्फूर्ती झाली त्या रात्री त्यांना सोळा ओळी सुचल्या लागोपाठ पाच रात्री अशी जाग येऊन त्यांना सातशे ओळींचे काव्य स्फुरले.

पूज्य रघुनाथराय महाराजांनी जवळपास तेरा ग्रंथांची रचना केली आहे. 1) गुरुबोध ग्रंथ भाग 1. भाग 2 भाग 3 भाग 4
5) परमार्थ पदावली 6) सद्‌गुरु प्रसाद 7 साधना सुपथ 8) प्रेमधारा प्रवाहा 9) प्रातर्ध्यान व सायं उपासना पाठ 10) स्वानमंद यात्रा 11) Divine Dawn 12) श्री सद्‌गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ओवीबद्ध चरित्र ( चरितामृत ग्रंथ) 13) संत रघुनाथ महाराज पत्तरकिने नागपूर यांचे संक्षिप्त जीवन आणि काव्यदर्शन

संत रघुनाथ महाराजांनी प्रेमधारा परिवार मंडळाची स्थापना केली यांच्या नागपूर मुंबई येथे शाखा असून त्याचे अनेक शिष्य या परिवाराशी जोडलेले आहेत. प्रेमधारा परिवारातर्फे त्यांच्या उपासना होतात. महाराजांनी लिहिलेली भजने तालासुराच्या संगतीत उपासनेत म्हटली जातात महाराजांच्या उपासनेत, महाराजांच्या हयातीत त्यांच्या उपस्थितीत उपासना व्हायच्या. त्यावेळी शिष्यमंडळींशी महाराज अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने त्यांच्या शंकांचे निराकरण करायचे उपासनेच्या कार्यक्रमाच्या शिष्यांच्या प्रतिक्रिया विचारायचे ही आत्मीयता महाराजांनी शेवटपर्यंत जोपासली होती. अशा या ब्रह्मलीन संत रघुनाथराय पत्तरकिने महाराजांचे म्हणजे सद्‌गुरुचरणी माझे विनम्र अभिवादन.