आरं मुर्दाडांनो, बापाला जरा ठिवा की!

आरं मुर्दाडांनो, बापाला जरा ठिवा की!

शाळा भरली, प्रार्थनेची घंटा झाली, सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गाच्या ओळीत उभे राहिले. एका सुरात धीरगंभीर आवाजात प्रार्थना म्हटली गेली.

आमच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. ‘‘मुलांनो, उद्या आपल्या शाळेची तपासणी आहे. शाळा तपासणीसाठी कोल्हापूरहून मोठे अधिकारी येणार आहेत. तेव्हा तुम्ही उद्या कुणीही शाळा चुकवू नका. स्वच्छ युनिफॉर्ममध्ये शाळेत या. शाळेची शिस्त पाळा. वेडेवाकडे वागू नका. शिस्त राखा.’’

मी व माझा मोठा भाऊ मराठी शाळेत शिकत होतो. घरच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन शिकत होतो.

दुसरा दिवस उजाडला. शाळा भरली. सर्व विद्यार्थी स्वच्छ कपडे परिधान करून केसांचा भांग पाडून शाळेत आले होते. त्या दिवशी सारे कसे शिस्तबद्ध होते. मुख्याध्यापक स्वतः प्रत्येक वर्गात जाऊन साहेब आले आहेत, शांत बसा, असे सांगत होते. साहेब आमच्या तिसरीच्या वर्गात आले. आम्ही सर्व विद्यार्थी उठून उभे राहिलो. ‘‘साहेब, नमस्ते’’ म्हणालो. साहेबांनी आम्हाला अनेक प्रश्‍न विचारले व साहेब पुढच्या वर्गावर निघून गेले.

मधल्या सुटीची घंटा झाली. पंधरा-वीस मिनिटांनंतर शाळा पुन्हा भरली. मुख्याध्यापक माझ्या वर्गात आले. सर्व वर्गावर नजर फिरवली व माझ्यावर रोखली व मला म्हणाले, ‘‘तुझा मोठा भाऊ कोणत्या वर्गात आहे?’’ मी म्हणालो, ‘‘तो सहावीच्या वर्गात आहे.’’

‘‘त्याला माझ्याकडे घेऊन ये,’’ असे म्हणून आपल्या कार्यालयाकडे गेले. मी व मोठा भाऊ मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेलो. आम्हाला पाहून गुरुजी म्हणाले, ‘‘मुलांनो, त्या तिथे जेवण आहे. ते घेऊन घरी जा.’’ साहेबांना आणलेलं जेवण शिल्लक आहे. शिरा, भात, वांगी-बटाटे भाजी, चपाती, दही, लोणचं असे अनेक पदार्थ होते. मोठ्या भावाने आपले दप्तराचे फडके आणले. कारण दप्तर भरण्यास पिशवीही मिळत नव्हती. रोज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून दप्तर आणत होतो. कपड्यात सर्व पदार्थ भरले व आम्ही घराकडे गेलो. घरात आई खळ्यावरून आणलेले भाताचे मातेरे सुपात निवडत बसली होती.

‘‘आयेऽऽ, हे बघ, आम्ही काय आणलंय!’’ म्हणून फडक्‍यातील सर्व अन्न दाखविले व एकेक पदार्थ खाण्यास सुरुवात केली. आईने विचारले, कुणी दिलं? अगं शाळेतील आहे. आम्हाला हेड गुरुजींनी दिलंय म्हणून सांगितलं व समोरच्या अन्नावर तुटून पडलो. गोड शिऱ्याचा एक घास मी आईच्या तोंडात कोंबला. घास चघळता-चघळता आईच्या मनात बापाची आठवण चाळवली व आई म्हणाली, ‘‘आरं मुर्दाडांनो, जरा बापाला ठिवा की, सकाळधरनं दुसऱ्याचं रण तोडाय गेलाय.’’

आईच्या बोलण्याकडे आमचं लक्ष नव्हतं. बकाबका खाऊन सर्व पदार्थ संपविले. फक्त एक चपाती शिल्लक ठेवली. आयेऽऽ आम्ही मुर्दाड नाही, खादाड आहे गंऽऽ म्हणून शाळेकडे धूम ठोकली. वडील सायंकाळी घरी आले. रात्री आईने प्रथम वडिलांना जेवण वाढले. वडील ताटावर बसले व आईला म्हणाले ‘‘अगं लेकरास्नी पयला वाढ की.’’ आई रागानेच म्हणाली, ‘‘हं जेवा, ती जेवतील नंतर, मुर्दाड कुठले.’’

यथावकाश आम्ही शिकत होतो. मोठ्या भावाने अकरावीनंतर शाळा सोडली. मी शिकत होतो. बी.ए., एम.ए. केलं. मुंबईला बी.एड.साठी प्रवेश मिळाला. १९८३ मध्ये मुंबईच्या गोरेगाव उपनगरात सन्मित्र हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. १९८५ मध्ये गोरेगावमध्येच रात्रशाळेतही नोकरी मिळाली. आर्थिक स्थैर्य लाभले. पण एक गोष्ट मनात पक्की केली होती, की आपण मुंबईला आलोय कमवायला. गमवायला नाही. ही मुंबई नटरंगी नार आहे, गमवायला वेळ लागत नाही. जगण्यात समाधान वाटू लागले.

वडिलांना मुंबई दाखवायची म्हणून १९९३ मध्ये मुंबईला आणले. गेट वे ऑफ इंडिया व राणीची बाग दाखवली. त्याच वेळी मुंबईत साखळी बाँबस्फोट झाले. फार घाबरलो व कोल्हापूरची एस.टी. बस पकडून गावी आलो. मुंबईला परत जाताना वडिलांना खर्चासाठी पाचशे रुपये दिले व हवं ते खा म्हणालो. पैसे संपले की मला पत्र पाठवा, आणखी पैसे पाठवून देतो.

एक दिवशी पोस्टमन शाळेत तार घेऊन आला. तार होती वडिलांच्या निधनाची. गावी आलो. आईला मिठी मारली. गळ्यात पडून खूप रडलो. आईने कनवटीला लावलेले पैसे काढले व माझ्यासमोर धरून म्हणाली, ‘‘हे बघ मुला, तुजा बा काय ठेवून गेलाय’’ चारशे ऐंशी रुपये होते.

दहनास मृतदेह नेतेवेळी खांदेकऱ्यांनी बापाच्या बंडीच्या खिशातील पैसे काढून आईकडे दिले होते. मी मुंबईला परत जाताना वडिलांना पाचशे रुपये दिले होते. त्यातील चारशे ऐंशी रुपये शिल्लक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com