आनंदाचं झाड!

muktapeeth
muktapeeth

आपण मोबाईलच्या नादात इतके हरवून जातो की आपल्या मुलांना, कुटुंबीयांना खरंच वेळ देतो का, हा प्रश्‍न मनात येतो. केवळ देहाने नव्हे, मनाने कुटुंबीयांबरोबर असायला हवे.

लहान मूल असणाऱ्यांसाठी रविवारची संध्याकाळ, विशेषतः उन्हाळ्यातली रविवारची संध्याकाळ, ही अतिशय साचेबद्ध असते. पु.लं.च्या "रविवार सकाळ'सारखं "रविवार संध्याकाळ' म्हणूनही काही लिहिता येईल इतकी टिपिकल. उन्हं उतरल्यावर बाहेर पडायचं, एखादी बाग गाठायची, घसरगुंडी, झोपाळा, जंगलजीम, सी-सॉ इत्यादी खेळांवर, जागा आणि संधी मिळेल तशी, मुलांना फिरवायचं, ती खेळून दमली, नव्हे त्यांना खेळवून पालक दमले की लॉनवर बसायचं. मुलांचा खेळ इथंही चालूच असतो. फक्त इथले खेळ वेगळे. बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल तत्सम. तत्सम अशासाठी, कारण यातला एखादा खेळ चालू असतो असे नाही, सगळे चालू असतात, ते ही एकाच वेळेस. बरं बहुतेक आईवडिलांनी आपापल्या मुलासाठी काही ना काही खेळणं आणलेलं असतं; पण मुलांना नेमकं दुसरा खेळत असलेलं खेळणं हवं असतं. झालं मग, याची बॅट त्याच्याकडे, त्याची रॅकेट अजूनच भलतीकडे, मधेच एखादी फ्लाइंग डेस्क भिरभिरत येते, ही इतकी सरमिसळ होते की घरी जाताना आपलं मूल आणि त्याचा खेळ यांच्या जोड्या लावण्यात पालकांचा बराचसा वेळ खर्ची पडतो.

तात्पर्य, आमचा रविवारही काही फारसा वेगळा नव्हता. मुलाला घेऊन आम्ही घराजवळच्या एका बागेत गेलो. मुलाने तडक मोर्चा झोपळ्याकडे वळवला. अर्थात, तो रिकामा नव्हताच. त्यामुळे एका झोपाळ्यासमोर उभे राहून आम्ही तो रिकामा व्हायची वाट बघू लागलो. झोपाळ्यावर एक तीन-साडेतीन वर्षांची मुलगी झोका घेत होती. तिचा खेळ अगदी रंगात आला होता. उंचावरून झोका खाली येताना तिचे टपोरे डोळे अधिकच मोठ्ठे होत होते. माझ्या मुलालाही यातली गम्मत कळली असावी. कारण, खाली येताना तिने "झुईsss` असा आवाज करावा आणि याने खिदळत त्याला प्रतिसाद द्यावा, असा त्यांचा नवाच खेळ सुरू झाला. लहान लहान गोष्टींमधून आनंद वेचून घेण्याची कला लहान मुलांकडूनच शिकावी. काही वेळ यांचा खेळ असाच चालू राहिला.

अचानक काही कळायच्या आत ती मुलगी झोक्‍यावरून घसरली. अर्थात झोका फारसा जोरात नसल्याने आणि आजूबाजूला बरेच लोक असल्याने कोणीतरी तिला पटकन सावरलं. फारसं लागलं नसलं तरी घाबरूनच ती मुलगी रडू लागली. आत्तापर्यंत समोरच असूनही लक्षात न आलेली एक गोष्ट अचानक जाणवली. त्या मुलीची आई शेजारीच उभी होती. उजव्या हाताने मुलीला झोका देताना डावा हात मोबाईल कानाशी धरण्यात अडकला होता. किंबहुना मुलीच्या खेळाकडे तिचं फारसं लक्षं नव्हतंच. मुलगी रडायला लागली म्हटल्यावर मात्र बाकी साऱ्या गोष्टी बाजूला पडल्या, डब्यातून खाऊ निघाला, आईस्क्रीमचं प्रलोभन आलं आणि बघता बघता डोळे पुसून ती मुलगी परत खेळात मग्न झाली.

या छोट्याशा प्रसंगाने मी मात्र जरा विचारात पडलो. म्हणजे शाळेमध्ये निबंधाचे विषय असायचे त्याची आठवण झाली. "मोबाईल ः शाप की वरदान.'
जरा लक्ष देऊन आजूबाजूला बघितलं तर अजून उदाहरणं दिसू लागली. एक आजी आजोबा संध्याकाळचे बागेत फिरायला आले होते. काही वेळाने बघितलं तर आजोबा आजींच्या फर्लांगभर पुढे आणि आजी मधून मधून थांबत मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसेज बघत पुढे जात होत्या. एका झाडाखाली एक जोडपं बसलं होतं. त्यातली "ती' फोनवर बोलत होती तर "तो' कधी इकडे बघ, कधी तिकडे बघ, कधी उगाचच मोबाईल चेक कर, असं करत बसला होता. एका कारंज्यासमोर एक बाबा आपल्या मुलासोबत सेल्फी घ्यायच्या प्रयत्नांत होता. त्याला बहुदा फेसबुकवर "स्टेटस अपडेट' टाकायचा असावा ः feeling joyful, spending quality time with kid.

त्या "किड'ला फोटोमध्ये काडीमात्रही इंटरेस्ट नव्हता. त्याचं सगळं लक्ष कारंज्याच्या तुषारात खेळणाऱ्या मुलांच्या घोळक्‍याकडे होतं. मला प्रश्न पडला, या "स्पेंड' केलेल्या "टाइम'ची "क्वालिटी' ठरवायची कुणी? आपली आपण, का ज्यांच्याबरोबर, ज्यांच्यासाठी वेळ दिला, त्यांनी? मनात विचार आला की आपलं त्या वाल्या कोळ्यासारखं झालं आहे. तो आपल्या कुटुंबाला गृहीत धरत होता. आपण तरी वेगळं काय करतोय? मनात विचारांचं काहूर माजलं. वाटलं की विचार लगेच शब्दांत उतरवावेत. अनाहूतपणे हात मोबाईलकडे गेला, इतकंच नाही तर फेसबुकला "लॉगिन'ही केलं, तेवढ्यात ... "बाबा मी कुठे?' मुलाचा आवाज आला. त्याने झोपाळा सोडून घसरगुंडीवर चाल केली होती. घसरगुंडीची शिडी एकट्याने चढून तो वर उभा होता. आपल्या लेखी अतिशय क्षुल्लक वाटणारी ही गोष्ट पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद होता आणि त्याला तो माझ्या बरोबर वाटायचा होता. त्याक्षणी खजील होणं म्हणजे काय ते मला पुरतं कळलं. फोन मिटला आणि त्याच्या "घसरगुंडीगड' सर झाल्याच्या उत्सवात आनंदाने सहभागी झालो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com