तेथे कर माझे जुळती। 

Independence Day
Independence Day

15 ऑगस्ट जवळ आल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापनदिन! आजची पिढी स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेत बऱ्यापैकी सुखावलेली आहे. काही जण दुर्दैवाने स्वैराचारात बुडाले आहेत. पण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागील कैक पिढ्यांनी आत्यंतिक हालअपेष्टा सोसल्या आहेत, असीम त्याग केला आहे, कित्येकांनी प्राणांची बाजीही लावली आहे. खरे म्हणजे त्या सर्वज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे पुण्यस्मरण करणे आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य ठरते. हा शुभदिन केवळ आणि केवळ त्यासाठीच आहे. 

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचे एक पान अलीकडेच अगदी योगायोगाने प्रकाशात आले. (1910 च्या बॉम्बे सिक्रेट ऍक्‍स्ट्रॅक्‍ट नं. 7 मधील पृष्ठ क्र. 520) या अहवालात इतर अनेकांबरोबर विशेष विस्ताराने उल्लेख असलेल्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव आहे गोविंद नारायण पोतदार. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी या अहवालाची सुरुवातच, "पोतदार हे एक अतिरेकी आहेत,' अशा शब्दांत केली आहे. पोतदारांचा जन्म 1880 चा. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे. हैदराबादच्या निजाम कॉलेजमधून शिक्षण घेऊन पुढे मद्रास विद्यापीठातून 1903 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. नंतर उपयोजित रसायनशास्त्राच्या (Applied Chemistry) अभ्यासासाठी त्यांनी जपानला प्रयाण केले. मुळातच स्वातंत्र्याची आस लागल्याने त्यांनी तेथे गेल्यावर टोकियोमध्ये "इण्डो जॅपनीज असोसिएशन'ची स्थापना केली. 

विशेष म्हणजे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे खानखोजे व नायडू या क्रांतिकारक तरुणांच्या मदतीने जपानचे तत्कालीन पंतप्रधान काऊंट ओकामाना यांना त्या असोसिएशनचे पहिले अध्यक्ष केले. या संस्थेचा तेथील इंडिया हाऊसशी संबंध होता. या संस्थेचे कार्य लंडनमधील इंडिया हाऊससारखेच आहे आणि तेथील वातावरण जपानमधील भारतीय तरुणांच्या राजनिष्ठेला तडा देणारे आहे, असा ब्रिटिश राज्यकर्त्यांना दाट संशय होता. फरीस कटातील के. डी. कुलकर्णी तसेच क्रांतिकारक होतीलाल वर्मा या दोघांशी पोतदारांचा संबंध येथेच आला. तसेच टोपणनावे घेऊन पोतदारांना मित्र व सहकाऱ्यांच्या सहाय्याने इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाने टोकियोत क्रांतिकेंद्र सुरू केले. डिसेंबर 1907 मध्ये भारतात परत आल्यावर पोतदारांनी वेस्टर्न मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीचा पायोनियर अल्कली वर्क्‍स या नावाने माहीम मुंबई येथे धुण्याचा सोडा बनविण्याचा कारखाना सुरू केला. त्यांचा सल्फ्युरिक ऍसिड बनविण्याचा तसेच स्वदेशी मॅच फॅक्‍टरी या नावाने कंपनी काढण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला. जपानमध्ये असताना पोतदारांनी बॉम्बनिर्मितीचे ज्ञान संपादन केल्याचे दिसते. 

लो. टिळकांच्या घरात बॉम्ब निर्माण करण्याविषयी गोविंद पांडुरंग बापट व होतीलाल वर्मा यांच्यामधील सखोल चर्चेत पोतदारांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने व्हावा याला विशेष अर्थ आहे. टिळकांची भेट घेऊन 26 फेब्रु. 1908 ला मुंबईला आल्यावर होतीलालना भेटण्यास आलेल्यांच्या त्यांच्या दैनंदिनीत लिहिलेल्या नावांमध्ये पोतदारांचा उल्लेख विशेषत्वाने आहे. होतीलालच्या सूचनेवरूनच बॉम्ब बनविण्याच्या सूत्रांचे 45 पानी हस्तलिखित पोतदारांनी 19 मार्च 1908 या दिवशी बुकपोस्टने बापटांकडे पाठवले. 16 मे 1908 रोजी आपटे वाड्यात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात जोशी व बापट यांनी दिलेल्या साक्षीत याचा स्पष्ट उल्लेख केला होता. एव्हाना पोतदारांच्या बॉम्ब निर्मितीच्या ज्ञानाची माहिती सर्व क्रांतिकारक तरुणांना झाली होती आणि दामोदर हरी जोशी, के. डी. भागवत, डॉ. आठल्ये, डी. लिमये तसेच पांडुरंग शास्त्रीदेखील ते तंत्र मिळविण्यासाठी पोतदारांकडे गेले असल्याची माहिती पुढे जोशी व लिमये यांनी दिलेल्या एका साक्षीतून बाहेर आली. पुढे जोशी हे पोतदारांना घेऊन बेळगावला गेले. तेथे पोतदारांनी बेळगाव मॅच फॅक्‍टरीमधील मित्रांच्या सहाय्याने खटाव अँड कंपनी सुरू केली. नंतरच्या काळात मुंबई व सुरत येथील देशभक्त तरुणांच्या सहाय्याने मद्रास इलाख्यातील राजमहेंद्रीच्या गोतरे गिवनराम याला पेपर मिल सुरू करण्याच्या दृष्टीने एक कंपनी स्थापन करण्यासाठी मदत केली. बंगालमध्ये होतीलाल वर्मावर कलम 121-अ आणि कलम 124-अ खाली चालू झालेल्या खटल्यात पोतदारांनी होतीलालच्या वतीने साक्ष दिली. 

ब्रिटिश सरकारच्या या गोपनीय अहवालात शेवटी म्हटले आहे "आमच्याजवळ असणाऱ्या माहितीवरून असे दिसते, की पोतदार एक अतिरेकी असून, बॉम्बनिर्मितीच्या ज्ञानाचा प्रसार करणारे केंद्र आहेत आणि ते ज्या-ज्या उद्योगाशी संबंधित आहेत, त्या-त्या ठिकाणी त्यादृष्टीने हाती घेतलेले कोणतेही काम गुप्त ठेवण्याची अपवादात्मक उत्तम व्यवस्था केलेली आहे. म्हणूनच ते एक निःसंशय धोकादायक व्यक्ती आहेत. त्यांच्या हालचालींवर व कृतीवर काळजीपूर्वक पाळत ठेवणे गरजेचे आहे व जर ते बेळगावला परत आले तर त्यांचेवर त्वरित देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांचे मित्र व सहकारी यांची खास नोंद ठेवली पाहिजे. या दरम्यान मुंबई पोलिस कमिशनरनी पोतदारांचे माहीम येथील उद्योग शोधून काढण्याचा प्रयत्न जारी ठेवावा.'' याच अहवालाच्या पृष्ठ 40 परिच्छेद 60 मधील नोंद वैशिष्ठ्यपूर्ण आहे. म. गांधी यांची भेट घेण्यासाठी बॉम्बे नॅशनल युनियनच्या 250 सन्माननीय सभासदांची बैठक दि. 13 जाने. 1915 रोजी हिराबाग, मुंबई येथे निमंत्रित केली होती. त्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या महत्त्वाच्या 8-10 व्यक्तींमध्ये लो. टिळकांच्या समवेत पोतदारांचाही उल्लेख आहे. 

1929 साली मुंबईच्या डेक्कन मर्चंट्‌स को-ऑप. बॅंकेचे पोतदार चेअरमन होते तसेच बऱ्याच केमिकल फॅक्‍टारीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. पोतदारांच्या कार्यासंबंधात एवढीत माहिती उपलब्ध झाली आहे. इतिहासाची पुढची पाने कालोदरात लुप्त झाली आहेत. पोतदार आणि त्यांचे इतर समविचारी मित्र व सहकारी यांचे बाबतीत पुढे काय काय घडत गेले या विषयात इतिहास मूक बनला आहे, आणि पहा, काळदेखील कधीकधी काहींच्या बाबतीत किती कठोर बनतो ते! कार्यकर्तृत्वाच्या या महामेरूची फार म्हणजे फारच थोडी माहिती त्याने पोतदारांच्या वंशजापर्यंत झिरपू दिली. इतकेच माहिती झाले, की त्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांचे वास्तव्य बेळगावमध्ये होते व तेथेच जाने. 1945 मध्ये त्यांचे देहावसान झाले. 

स्वातंत्र्यसेनानी मा. गोविंद नारायण पोतदार व त्यांच्याबरोबर तसेच आगेमागे होऊन गेलेल्या त्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे प्रचंड, प्रेरक कर्तृत्व पाहता पुढील काव्य पंक्तीचे स्मरण होऊन आपण नतमस्तक होतो. ​

परी जयांच्या दहनभूमिवर नाही चिरा नाही पणती। 
तेथे कर माझे जुळती।। 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com