तिकडे घडते आहे, मग... 

jagruti
jagruti

माझा नातू प्रणव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीत आहे. एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘‘मोठा (आजी) माझ्याबरोबर मराठीतला एक लेसन करतेस?’’ मी एकदम आनंदाने ‘हो’ म्हणाले. त्याने पुस्तकातला धडा समोर ठेवला. धडा होता रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित. मी प्रणवला म्हणाले, ‘‘तू वाचतोस?’’ तो म्हणाला, ‘‘नाही, तू वाच. मी ऐकतो.’’ मी धडा वाचायला सुरवात केली आणि बघता बघता धड्यातल्या घटनेत गुंतत गेले. कर्मवीरांचे कार्य वाचताना मी एक वेगळाच थरार अनुभवत होते. धडा वाचून संपला. मी प्रणवकडे पाहिले. तो माझ्याकडेच बघत होता. त्याला धडा समजल्याचे भाव त्याच्या डोळ्यांत होते. माझ्या लक्षात आले की, वाचताना माझ्यात कोणताही नाटकीपणा नव्हता. पण तो अभिनिवेश नक्की होता. त्यामुळे प्रणवला त्या धड्यात रस वाटला. 

पुन्हा एकदा आम्ही दोघे धड्यातल्या घटनेबद्दल बोललो. मग मी त्याला प्रश्‍न विचारला, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील मुलांची काळजी कसे घ्यायचे?’’ प्रणव उत्तरला, ‘‘करमवीर भाऊराव पाटील....’’ मी त्याला थांबवले. विचारले, ‘‘काय म्हणाला? करमवीर? अरे, करमवीर नाही, कर्मवीर.’’

खरेच, ‘कर्मवीर’ या शब्दाचा ‘करमवीर’ असा अपभ्रंश कसा झाला? हे काय आहे? ‘कर्मवीर’सारख्याच ‘धर्मवीर’, ‘परामर्श’, ‘अथर्वशीर्ष’ तसेच ‘कृतज्ञ’, ‘कृतघ्न’, ‘कृतकृत्य’ या शब्दांच्या उच्चारणावर आणि लेखनाला अवघड अशा अनेक शब्दांवर अर्थपूर्ण अभ्यास होत नाही का? जोडाक्षरांचे उच्चार आणि अर्थ विद्यार्थ्यांना कळण्यात काही शैक्षणिक अडचण येतेय का? इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी ‘मराठी’ हा एक असा तसाच विषय असतो. इंग्रजी शाळांमध्ये मराठी केंद्रस्थानी नाही. हे मान्यच करायला हवे की, जगात इंग्रजी ही व्यवहाराची भाषा झाली आहे. पण अनेक देशांमध्ये त्यांच्याच मातृभाषेला प्राधान्यक्रम दिला जातो. रशिया, चीन, जपान, कोरिया, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषांमधून शिक्षण दिले जाते. हे सगळे देश प्रगती झालेले आहेत. मग आपल्याकडेच अशी नकारात्मक विचारधारा का? ‘माय मरो, पण मावशी जगो’ हा भाषेसाठी आग्रह का?

मला खूप वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवतो. लहानपणी आम्ही भाऊ-बहिणी एकत्र जमलो होतो. मला यायला उशीर का झाला, असे विचारले गेले. मी म्हणाले, ‘‘खूप रहदारी होती.’’ सगळे हसायला लागले. मला कळेना का हसतायत? एक भाऊ म्हणाला, ‘‘अगं, रहदारी काय? सरळ मराठीत ट्रॅफिक म्हण ना!’’ सगळे कॉन्व्हेंटमधले होते ना! मीच काय ती एकटी मराठी शाळेतली! मला तेव्हा खूप वाईट वाटले. पण आज अजिबात वाटत नाही. उलट, चांगले मराठी शिकल्याचा अभिमानच वाटतो मला!

आज मराठी माध्यमातल्या शाळा परदेशात सुरू झाल्या आहेत, अशी बातमी माझ्या वाचनात आली. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी, आपली मातृभाषा, संस्कृती व विचार यांचा विसर पडू नये म्हणून मराठी शाळा सुरू करण्याचा मानस केला आणि टोरांटो, अटलांटा आणि शिकागो येथील स्थानिक व राज्य पातळीवरील शैक्षणिक संस्थांनी त्याला मान्यताही दिली आहे. अमेरिकेतच जन्माला आलेली ‘मराठी’ मुले तेथे मराठी शिकू लागली आहेत. त्यांना मराठी मूळाक्षरे, शब्द शिकवताना मराठी बालगीतेही शिकवली जातील. मराठी संस्कृतीची ओळख होईल त्या अमेरिकन मराठी पिढीला. हे अमेरिका, कॅनडात घडते आहे आणि येथे महाराष्ट्रात आपली मुले मराठी धडा वाचताना शंभर चुका करत आहेत. मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या इथे संकुचित होतोय. हे बदलले जावू शकते, फक्त शिक्षक आणि पालक यांच्याकडूनच. मराठी भाषेविषयीची अस्मिता व आस्था ते मुलांमध्ये जागृत करतील, ही आशा बाळगायलाच हवी. मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण द्या, पण घरी मराठीतच बोला. अक्षर ओळखीइतकेच, किंबहुना अधिकच मौखिक भाषाज्ञान महत्त्वाचे आहे. उच्चार नीट करायला शिकवले पाहिजेत. तसेच हिंदी शब्दांची भेसळ करण्यापासूनही मुलांना दूर ठेवले पाहिजे. सध्या मराठी भाषकाचीच मराठी बिघडते आहे, त्या पार्श्‍वभूमीवर भाषा जपली पाहिजे, असे वाटते.

जाता जाता एक मौलिक सल्ला ः 
शिक्षक आणि पालकांना भाषा संवर्धनासाठी एक गोष्ट करता येईल. इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रातील एकेक चांगली बातमी विद्यार्थ्यांकडून मोठ्यांदा वाचून घ्या. वाचनसंस्कृती वाढली तर मुलांना निश्‍चितच फायदा होईल. उच्चारतंत्र व लेखनतंत्र हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निश्‍चितच विधायक भर टाकेल. त्यांची सृजनशक्ती वाढेल. 
बघू या, सर्वांचीच ही जबाबदारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com