ते आले आणिक गेले....

जयंत कोपर्डेकर
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोण कुठची माणसे आयुष्यात येतात व जीव जडवून निघून जातात. काय असते त्यांचे आणि आपले नाते? दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा... आठवणी तर कायम उरतात की आपल्याकडे.

आम्ही बाणेरला रो हाउसमध्ये राहायला आलो. आम्हाला घाई असल्याने बिल्डरने आमचे घर लवकर पूर्ण करून दिले. इतर घरांचे व आवारातील बरेच काम बाकी होते. एक मजूर कुटुंब शेजारीच एका पत्रा शेडमध्ये राहात होते. नवरा- बायको व एक वर्षाचा छोटा मुलगा. नवऱ्याचे नाव मारुती. तो बिगारी कामगार व त्याची बायको राधा, तीपण मजुरीकाम करायची. आम्ही रोज त्यांना बघत असू. एक दिवस माझ्या पत्नीला तिने घरकाम द्या म्हणून विनंती केली. तिनेही ते मान्य केले. दुसऱ्या दिवसापासून ती आमच्या घरी धुणेभांडी करू लागली.

हळूहळू ती माझ्या पत्नीशी गप्पा मारू लागली. ते मराठवाड्यातून कामासाठी पुण्यात आले. घरची गरिबी, गावात छोटेसे घर, त्यात आई-वडील, दोघे भाऊ, त्यांच्या बायका. सगळे मजुरी करणारे. दुष्काळामुळे मजुरी मिळेना म्हणून काम मिळेल या आशेने हे पुण्यात आले. गावाकडच्या एका माणसामुळे एक काम मिळाले; पण थोड्याच दिवसांत तेपण सुटले. आता या कामावर आहेत. परिस्थिती हलाखीची. संध्याकाळी मुकादम पगार देणार, त्यात सामान आणून स्वयंपाक. चूल, चार भांडी आणि दोन गोधड्या एवढाच संसार.

दिवस पुढे सरकत होते. एक दिवस रात्री मुलाच्या रडण्याचा खूप आवाज येत होता. न राहून पत्नी त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गेली. मूल भुकेने रडत होते. त्याला दुधाची जरुरी होती. लगेच पत्नीने घरून दूध गरम करून त्याला दिले. मुलगा दूध पिऊन शांत झोपला. घरी येऊन ती म्हणाली, ‘‘मी रोज सकाळ, संध्याकाळ त्याला एक एक कप दूध देणार.’’ 

घरातील जुने कपडे, चादरी, काही जाराची भांडी त्यांना दिली. राधा खूप खूष झाली. पोटाची खळगी भरायला हे लोक दुरून येतात, इमाने इतबारे काबाडकष्ट करतात; पण कायमच उपेक्षित राहण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यांना फक्त आजची पोटाची खळगी कशी भरेल याचीच चिंता असते.
गरिबी काय असते, आयुष्याशी झगडणे काय असते, जीवन किती खडतर आहे, हे आम्ही जवळून पाहात होतो; पण ते दोघे मात्र आनंदाने याला सामोरे जाताना आम्ही बघत होतो. जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करत होतो. हे सगळे बघितल्यावर आम्हाला कळले, की आपण किती सुखी- समाधानी आहोत, तरी बऱ्याच वेळा आपल्याला हे सुख टोचत असते. आणखी हवे हा आपला अट्टहास असतो. आपण या लोकांचा कधीच विचार करत नाही.
उलट आम्हाला असा अनुभव आला, की आजूबाजूचे लोक यांना लाचार, गरीब समजतात, त्यांचा गैरफायदा घेतात. घरची कामे हक्काने करून घेतात; पण पाच पैसे देत नाहीत. मुकादम तर शिव्या देऊनच बोलतात, जास्तीत जास्त काम करून घेतात; पण पैसे देताना काही कारणे सांगून पैसे कापून घेतात, याचाही अनुभव घेतला. हे दोघे काम करतात, त्या वेळी तो छोटा मुलगा वाळूवर टाकलेल्या पोत्यावर उन्हातान्हात खेळत असतो, हे चित्र बघून हृदय पिळवटून येते. 
बाहेर फिरताना ज्या ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणच्या माणसांची हीच गत आहे, हे प्रकर्षाने जाणवले. पंखा, ए.सी. लावल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही. कारमधून जातानासुद्धा आपल्याला ए.सी. चालू लागतो. पण हेच लोक, जे आपल्यासाठी घरे बांधतात, आपल्याला हक्काचा निवारा देतात, तेच लोक पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, चुलीवर स्वयंपाक करतात, उन्हा- पावसात 
काम करतात.
काही महिने उलटून गेले, आमच्या सोसायटीतील काम पूर्ण झाले आणि त्या बिल्डरने मारुतीला कामावरून काढून टाकले. राधा रडतच त्या दिवशी घरी आली. नोकरी गेली. पत्र्याची शेड तोडली. उद्याचे काय, याची चिंता वाढली होती. माझे मन द्रवले. पण, मी काय करू शकते, हा प्रश्‍न पडला. शेवटचा उपाय म्हणून बिल्डरला एक फोन लावला व मारुतीला दुसऱ्या साइटवर नोकरी देण्याची विनंती केली. ते ओळखीचे असल्याने मारुतीला लगेच त्यांनी दुसऱ्या साइटवर जायला सांगितले.

मारुती व राधा दोघेही रडत होते. आभार मानून ते परत निघाले, तेव्हा राधा पत्नीला म्हणाली, ‘‘तुमचे खूप उपकार झाले, ताई. तुम्ही रानच्या पाखरालाबी जीव लावता, आम्ही तर माणसं, तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही.’’

ते दोघे आमच्याजवळ काही दिवसांसाठी आले आणि आठवणी ठेवून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant kopardekar mukatpeeth article

टॅग्स