बोस्टनमध्ये हरवल्याचा शोध

जितेंद्र दाते
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

बोस्टनमधल्या शहरालगतच्या जंगलात हरवलो. काळोख वेगाने वाढत गेला. मी फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो. एक तरुणी तिच्या मित्रासह तिथे आली आणि या चकव्यातून बाहेर पडण्याची तिने वाट दाखवली.

बोस्टनमधल्या शहरालगतच्या जंगलात हरवलो. काळोख वेगाने वाढत गेला. मी फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो. एक तरुणी तिच्या मित्रासह तिथे आली आणि या चकव्यातून बाहेर पडण्याची तिने वाट दाखवली.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कांही प्राध्यापकांशी संपर्क साधून एक भाषांतर आणि फोनेटिक टेक्‍नॉलॉजी घडवण्याच्या हेतूने मी बोस्टनला रवाना झालो. बोस्टन अतिशय प्रेक्षणीय आहे. तिथे ऍक्‍टन टाउन या निसर्गरम्य ठिकाणी आमचे स्नेही सुहास व नीलिमा कासार यांच्याकडे मुक्कामास होतो. पुण्यातील पर्वती टेकडी चढण्या- उतरण्याची गेले अनेक वर्षांची सवय होती. मला रोज किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचे अंगवळणी पडलेले. त्यातून इतका सुंदर परिसर असल्याने पदभ्रमंतीची संधी मी घेत होतो. त्यादिवशीही मी घराजवळच्याच अतिशय रमणीय कालव्याभोवती फिरून त्याला लागूनच असलेल्या टाउन फॉरेस्टमध्ये, जंगलात चालण्याचे ठरविले. पाश्‍चात्य देशांमध्ये कालवा व नदीस "लेक' म्हणतात. घरापासूनच अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे ठिकाण. निघायला थोडा उशीरच झाला होता. लेकपर्यंत पोचलो तेव्हा इतर मंडळी परतत होती. लेकच्याभोवती एक प्रदक्षिणा घालून मग जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. लेकचे फोटो काढत, सेल्फी घेत अजून निम्मी प्रदक्षिणा पूर्ण झाली. लेकच्या भोवती थोडीच लोक राहिली होती. संध्याकाळची वेळ होती. मी टाउन फॉरेस्टच्या दिशेनं चालायला लागलो. अतिशय गगनचुंबी वृक्ष. सुंदर रंगीबेरंगी पानांनी नटलेली वृक्षवल्ली. हा पानझडीचा मौसम खूप प्रेक्षणीय असतो. मी जंगलात चालण्यासाठी खास बांधलेल्या ट्रेल रोडवरून चालत होतो. ट्रेल रोड सोडून जंगलात शिरलो. थोडेसे अंतर चालून गेल्यावर एक वयस्कर दांपत्य त्यांच्या कुत्र्याला फिरवत समोरून आले. त्यांना पाहून मला अजून चालण्याचा हुरूप आला. मी पुढे चालत राहिलो. दुरूनच एक लांब शिंगांचे हरण दिसले. सुसाट वेगाने नाहीसे झाले. पायाखालची पानझडीने भरलेली जमीन आता भूसभुशीत लागायला लागली होती. फार नाही, पण थोड्याशा उंच भागात मी येऊन पोचलो होतो. उंचावरून लेक आणि ऍक्‍टन टाउन साफ दिसत होते. उंचवट्याचे पठार आणि रंगलेले वृक्ष फार अंतरांवर नाहीत, हे लक्षात आल्यावर पठाराच्या माथ्यावर जाण्याचे ठरविले. तेव्हा बऱ्यापैकी उजेड होता. वर पोचल्यावर थोडी निराशा झाली. उंचवट्यापलीकडील खोऱ्यातली सुंदर फार्म हाऊसेस सोडल्यास फार काही नावीन्यपूर्ण पाहण्यासारखे नव्हते. मग परतीच्या मार्गाला लागलो. उंच झाडांमधून त्यांच्या बुंध्यांचा एक विशिष्ट वास येतो. खास करून परदेशात अजूनच वेगळा दर्प येतो. बहुतेक पानझडीमुळे असेल. उतारावर लागल्यावर सगळे मार्ग एकसारखे वाटायला लागले. थोडे गोंधळल्यासारखे झाले.

आपण फोन संपर्काच्या बाहेर आहोत, याची आता जाणीव झाली. जरा चपापलो आणि चालण्याचा वेग वाढवला. पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्यातून चालणं जास्त कठीण जात होते. थोडे अंतर पुढे चालून गेल्यावर उजव्या क्षितिजाजवळ सूर्यप्रकाश दिसला. मी अपेक्षेने त्या बाजूस वळलो. तिथे पोचण्यास तब्बल पंचवीस मिनिटे लागली. पोचून पलीकडे पाहिल्यावर मला जाणवले की, आपण पुन्हा वरच्या पठारावर आलो आहोत. तिथून खालच्या बाजूस ऍक्‍टन टाउन आणि शेजारचा लेक दिसत होता. मग त्या दिशेने जोरा जोराने चालायला सुरवात केली. सूर्य जवळपास मावळला होता व रातकिड्यांचे आवाज साथ देऊ लागले. अर्धा तास चालून गेल्यावर भर जंगलात वृक्षांच्या बुंध्यांमध्ये एक विचित्र प्रकार आढळून आला. वृक्षांवरून पडलेली पिवळी लाल पाने माझ्यासमोर हवेत तरंगत होती व माझी वाट अडवत आक्रमकपणे ती पाने एक विशिष्ट रचनेत हवेतच अधांतरी थांबली होती. मी एकदम स्तब्ध झालो. हा काय प्रकार आहे? एखाद्या कोळ्याच्या किड्याच्या जाळ्यात अडकून तरंगत असतील; पण एकूण पानांच्या रचनेचा आराखडा पाहता इतके मोठे जाळे असू शकत नाही, असा निष्कर्ष काढला. मग भीतीदायक विचार मनात घर करू लागले. त्यात अजून भर म्हणजे अमेरिकेत श्राद्धाचा पितृसप्ताह चालू होता. या हॅलोविन दिवसांमधे आपले दिवंगत पूर्वज पृथ्वीवर भेटीस येतात, अशी समजूत आहे. मी फार अंधश्रद्धाळू नसूनसुद्धा भीतीपोटी "भ्रम-राक्षस'! मी भीतभीत तरंगत्या पानांच्या जवळ गेलो. अंधुक प्रकाशामुळे झाडांच्या पानाच्या बारीक फांद्या दिसत नव्हत्या. फक्त पाने अधांतरी दिसत होती.
 
एव्हाना काळोख बराच पडला होता. समोर फक्त दाट जंगल दिसत होते. तेवढ्यात समोरून एक पांढरा कोट घातलेली तरुणी अणि तिच्यासोबत एक धिप्पाड तरुण टॉर्च हातात घेऊन येताना दिसले. माझ्या जीवात जीव आला. त्या तरुणीने सांगितलेल्या रस्त्याने निघालो. काळोखात एक मैल अंतर आता देशांतर वाटू लागले. शेवटी एकदाचा या तरुणीने सांगितलेला फाटा लागला. फाटा पाहिल्यावर आतापर्यंतचे दडपण बरेच कमी झाले. लगेचच डावीकडचा उतार रस्ता घेतला व लगबगीने उतरायला लागलो. बरेच अंतर अंधारात चालत राहिलो आणि एकदम पाण्याचा खळखळाट ऐकू आला. थोडे पुढे गेल्यावर दोन झाडांच्या मधून ट्रेल रोडचा लाइट दिसला. घरी पोचलो तर नीलिमा हॅलोविनची आरास करण्यात मग्न होती.

Web Title: jitendra date's muktapeeth article