काळानुसार बदलत गेलेला शिक्षकांचा प्रवास! गुरूजी ते सर...

guruji.
guruji.

कधी काळी कणा नावाची कविता तुम्हा सगळ्यांच्या वाचनातून नक्कीच गेली असेल. कुसुमाग्रज यांची ही कविता एक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यावर भाष्य करते. महापुरात सगळंच गमावून बसलेला विद्यार्थी केवळ हिम्मत मिळावी म्हणून आपल्या शिक्षकांकडे जातो. ‘ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी...’ इथून सुरुवात झालेली ही कविता
शेवटी मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा..
इथे संपते.
ही कविता जेव्‍हा जेव्‍हा आठवते तेव्‍हा तेव्‍हा या कवितेतील विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही मनापासून ‘सॅल्यूट’ करावासा वाटतो. मुळात सारं काही गमावून बसल्यानंतर धीर आणि हिम्मत न खचलेला विद्यार्थी यात आहे.
संकटाने खचून न जाता ‘कणा’ शाबूत असलेला विद्यार्थी यात आहे आणि आयुष्यातील पुढील लढाईसाठी आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेण्याची भावना असलेला विद्यार्थीही यात आहे. या कवितेतील शिक्षकांचेही मला खूप कौतुक वाटते. कारण आयुष्यात संकट आल्यानंतर नव्‍याने उभारी येण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या नातेवाईक किंवा आप्तेष्टांपेक्षा शिक्षक जवळचा वाटणे हा विश्‍वास पेरणारा गुरूची. नक्कीच कौतुकास्पद आहे. खरेतर जेव्‍हा जेव्‍हा शिक्षण या प्रक्रियेबद्दल आपण विचार करतो तेव्‍हा तेव्‍हा वरील कवितेतील विद्यार्थी आणि शिक्षक आज नाहीत याची खंत वाटते.

काळ बदलत गेला. शिक्षण ही प्रक्रिया बदलत गेली आणि कालौघात शिक्षकही बदलत गेला. कधी काळी गावातील लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर जगणारा गुरूजी नंतरच्या काळात पगारदार झाला आणि आजच्या काळात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाला. कधी काळी धोतर, सदरा ते आज अगदी जीन्सपर्यंत पोहोचलेला शिक्षक, चारचाकी वाहनापर्यंत पोहोचलाय. गुरूजीचे बदलत्या काळानुसार ‘सर’ झाले. पूर्वीच्या काळात असलेला मान मरातब, आदर, आप्तभाव आज कुठेतरी लोप पावत चाललायं.

आज शिक्षकाची पैशाने पत नक्कीच वाढलीय. मात्र, समाजात असलेली पूर्वीची पत आता आढळत नाही. यासाठी केवळ शिक्षकालाच दोषी मानता येणार नाही. आपल्या आजूबाजूचा समाज बदलत गेला. जिथे साऱ्याच गोष्टींचे व्यावसायीकरण आणि बाजारीकरण झाले तिथे शिक्षण हे क्षेत्र तरी कसे अलिप्त राहणार आणि म्हणूनच गुरूजींचा आज सर झाला. हा बदल केवळ नावापुरताच झालेला नाही तर पाहण्याचा दृष्टीकोण, पत, आदर, दरारा अशा सर्वच पातळ्यांवर झालायं. गुरूजी या शब्दात असलेला सन्मान, आदर सर या शब्दात नाहीच मुळी.

आमच्या काळात गुरूजींचा दरारा होता. म्हणजे गुरूजी आले इतके जरी कळले तरी धूम पळायचो. काही मारकुंड्या शिक्षकांच्या दहशतीमुळे त्या काळात काहींनी शाळा सोडल्या असं म्हणतात. पण जे टिकले त्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल केलं. कधी काही पत्र लिहून देणारे, वाचून सांगणारे गुरूजी, गावातील सोयरिकीच्या कार्यात मुख्य मान असणारे गुरूजी होते. अगदी अलीकडच्या काळात पंधरा वर्षांपूर्वीही. ग्रामीण भागात लग्न सोयरिकीच्या बैठकीत गुरूजींना मान देऊन बोलावणे आणि सल्लामसलत करणे हे चालायचे. आज मात्र हे प्रकार काहीसे दुर्मीळ होत चालले आहेत.

गुरूजी पूर्वी नोकरीच्या ठिकाणी वास्तव्‍यास असायचे. त्यामुळे साहजिकच गावाशी, गावकरी मंडळींशी गुरूजींची नाळ जोडल्या गेलेली असायची. गावाचं सुख-दु:ख गुरूजी जाणून असायचा. काळानुसार विविध वेतन आयोग लागत गेलेत आणि आर्थिक दर्जा उंचावत गेला. गावात वास्तव्‍यास असणारा गुरूजी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्‍यास गेला. शाळेच्या वेळेपुरता गावाशी संबंध येऊ लागला. गावाशी असलेली शिक्षकाची नाळ कमकुवत झाली. अर्थातच या सगळ्यात आपण हे ही विसरता कामा नये की शिक्षकालाही त्याच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार
यामागे असावा. हा बदल केवळ गुरूजींकडून झाला असे नव्‍हे तर गाव पातळीवरील लोकांची मानसिकता बदलत गेली. गुरूजी लोकांचे वाढलेले वेतनही, बदलत गेलेली जीवनशैली या बाबी कुठेतरी खुपत गेल्या. सोबतच या व्‍यवसायाबद्दल असलेली अनास्थाही दोन्ही घटकांचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत ठरला.

कधीकाळी शिक्षकांनी मारले हे घरी सांगताबरोबर पुन्हा मार पडायचा. कारण गुरूजींनी मारले म्हणजे आपण चूक असणार आणि गुरूजी बरोबर असणार हे गृहीतक होते. आता कायद्यानुसार विद्यार्थ्याला प्रसाद देता येत नाही आणि केवळ इतकेच नव्‍हे तर विद्यार्थ्याला काही रागावून बोलल्यास लेकराला धोपटणारे पालकही शिक्षकाला जाब विचारायला येतात. शिक्षकांनीही आपली भूमिका केवळ वर्गात शिकवणे इथपर्यंत मर्यादित ठेवली आहे. जसे पालक आज प्रोफेशनल पद्धतीने वागतात तशीच वागणूक शिक्षकांनीही अंगीकारली आहे.

ग्रामीण भागात विद्यार्थी-शिक्षक हे नातं काही प्रमाणात तग धरून आहे. काही शिक्षकांनी आजही शिक्षणाच्या प्रतीमेच्या बाहेर जावून आपल्या विद्यार्थ्यांशी भावबंध निर्माण केलेले आढळतात. पण अशा शिक्षकांची संख्या फार कमी आहे. ‘तारे जमीं पर’ सारख्या चित्रपटातील शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते आपल्याला आवडते मात्र प्रत्यक्षात असे शिक्षक कमी आहेत आणि एकीकडे प्रत्येक बाबींकडे ‘प्रोफेशनली’ पाहणा-या पालकांनाही असे शिक्षक खरेच हवे आहेत का? असा प्रश्‍नही अनुत्तरित राहतो. सारं काही बदलत जात असताना गुरूजीचा सर झालेला असतानाही ‘कणा’ या कवितेतील विद्यार्थी-शिक्षक भावबंध आत्ताच्या काळातही अस्तित्वात यावेत, अशी अपेक्षा करूया.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com