ध्यानमग्न कविता (मुक्तपीठ)

जुई कुलकर्णी
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

द. भा. धामणस्कर यांच्या कवितेतून मिळणाऱ्या साक्षात्काराच्या ध्यानमग्न आनंदाची तुलना दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी होत नाही. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा धामणस्करांवर प्रभाव आहे. त्यांची कविता साधनेसारखी परिपक्व असते.

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगा मला म्हणाला : द्या इकडे

मी मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....

द. भा. धामणस्कर यांच्या कवितेतून मिळणाऱ्या साक्षात्काराच्या ध्यानमग्न आनंदाची तुलना दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी होत नाही. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा धामणस्करांवर प्रभाव आहे. त्यांची कविता साधनेसारखी परिपक्व असते.

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगा मला म्हणाला : द्या इकडे

मी मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....

मी पुन्हा तरुण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला...

"हस्तांतर' ही कविता यंदाच्या गणपती उत्सवात सोशल मीडियावर जोरदार फिरत होती. ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची ही कविता. सणवार, कुळाचार, उत्सवाच्या एका वेगळ्याच पैलूवर आपलं लक्ष खेचून घेणारी ही एक अनवट कविता. सध्या सगळीकडे पसरलेल्या उन्मादी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परंपरेच्या ओझ्याखाली नवी पिढी कशी दबून जाते हे या कवितेतून ठळक होतं. परंपरा केवळ कर्मकांड बनते, तेव्हा त्यातील चैतन्य कसं हरवून जातं याकडेच या कवितेनं लक्ष वेधलं आहे.

मराठी कवितेच्या क्षेत्रात धामणस्कर हे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आहे. हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कवितेमधून झळकते. डोंबिवलीत राहणाऱ्या धामणस्करांनी वयाची पंचाऐंशी पार केली आहे. धामणस्करांची कविता ही प्रगत, वैचारिक आहे. ध्यान लागल्यावर जसे शांत- निवांत वाटते तसे त्यांची कविता वाचून वाटते. या कवितेतला आनंद वरवर मिळणारा उथळ आनंद नाही. त्यांच्या कवितेत झाडे सतत भेटत राहतात. झाडं, फुलं, समुद्र, आकाश, वारा, जमीन, पक्षी, माणूस अशी निसर्गाची सगळी तत्त्व असणारी ही कविता आहे. त्यासोबत समाजातल्या वर्गभेदाची जाणीव या कवितेत खोल उठलेल्या चऱ्यासारखी दिसते.
पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्य्राइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाबबरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्‍या पोरवयासह पळणाऱ्या झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
....................................
त्या वेळी मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्‍या कोवळ्या वयात, तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस....

समाजात विषमता असणार हे आपण स्वीकार केलेलं सत्य आहे. स्वतःचं त्या निबरटपणा आधीचं कोवळेपण आठवून पाहिलं, की या कवितेचा अर्थ जाणवतो आणि मग "प्राक्तनाचे संदर्भ' उमगतात. ही समाजातील विषमतेची कविता वाचताना संवेदनशील माणूस आत कुठेतरी हलतो. या कवितेतला "आत्मन' शब्द बघा. "आत्मन' या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे र्ढीीश डशश्रष. कुठलीही रस्त्यावरची परकी लहान कष्टकरी पोर "आत्मन' वाटायला मन किती विशाल असायला लागतं. धामणस्करांची कविता रसिकांना अस्वस्थ करूनही शांत करणारी कविता आहे.

"प्राक्तनाचे संदर्भ' आणि "बरेच काही उगवून आलेले' असे त्यांचे दोन कवितासंग्रह. त्यांच्या कवितेत चमचमत्या प्रतिमा नाहीत, नखरेल शब्द नाहीत, चेतवणाऱ्या भावना नाहीत. ही कविता स्वच्छ, निखळ साधेपणाची आहे. साधेपणातलं नैसर्गिक सौंदर्य ज्याला कळतं त्या रसिकाच्या मनांमध्ये या कवितेला विशेष स्थान आहे.

झाडं हा बऱ्याच कवींचा कवितांसाठी नेहमी प्रिय विषय असतो. परंतु धामणस्करांनी झाडांवर अशा काही कविता केल्या आहेत, की झाडांनी या कवींवर प्रेमाने पानांच्या चवऱ्या ढाळाव्यात. त्यांची "आपण फक्त' ही कविता पाहा ः
आपण पानाफुलांनी
बहरून केव्हा यावे हे
ऋतुंनी ठरवलेले
आपण फक्त
कोवळी आरस्पानी पाने
आपल्या हाती निबर होत
काळपटत कशी जातात एवढेच
पाहत राहायचे...

माणूस आणि सृष्टी यांच्यामध्ये जगाच्या निर्मितीपासून जणू उभा दावा सुरू आहे. धामणस्कर नावाचा कवी या झगड्यात सृष्टीच्या बाजूने आपल्या कवितांचे मृदू शस्त्र घेऊन जणू ठाम उभा आहे. त्यांच्या अनेक कविता याला साक्षी आहेत. त्यापैकीच "दुखऱ्या मुळांपर्यंत' ही एक.
सकाळ झालीय
फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत पोचली असेल

धामणस्करांच्या कवितेपर्यंत पोचण्यासाठी काहीशी आध्यात्मिक बैठक, विचारांची खोली असावी लागते. झेन तत्त्वज्ञान वाचलं असेल तर त्याला जवळची ही कविता आहे. धामणस्करांच्या कवितेबद्दल खरं तर काही बोलण्यापेक्षा ती केवळ एकट्यानं वाचावी, समजून घ्यावी. या कवितेतील शांतताच साजरी करावी. ही समंजस, देखणी, व्रतस्थ साध्वीसारखी कविता आहे. आयुष्याचं, कलानिर्मितीच सगळं सार या कवितेत उमटलंय.

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले

इथे इच्छा आहे ती नियतीची. नशीब प्रत्येक माणसाला त्याच्या पातळीवर संघर्ष, वणवण करायला लावतेच. तो संघर्षाचा, स्वीकाराचा अटळ टप्पा पार झाल्यावर आयुष्यात एका क्षणी जेव्हा ही अशी कविता उराउरी भेटावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jui kulkarni's article in muktapeeth