esakal | मुलीचे पालक म्हणून...
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीचे पालक म्हणून...

मुलीचे पालक म्हणून...

sakal_logo
By
कल्पना गोसावी

स्त्रीभ्रूणहत्येच्या बातम्या ऐकल्या, की काळजात नुसती कालवाकालव होते; पण मुलगी मोठी होत जाते, तशी तिच्याविषयीची काळजी वाढते. मुलीचे पालक म्हणून अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

मला एकच मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मुलगी नाकारणारी आमची मानसिकता नाही किंवा दुसरी संधी घेऊन मुलगा होतोय का हे आजमावावे, असेही कधी वाटले नाही. आमच्या मुलीच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिला आम्ही उच्च शिक्षण दिले. पायावर उभे केले. तिच्या मनाप्रमाणे थाटात लग्न करून दिले; पण तरीही आजूबाजूचे अनुभव पाहिले, की जाणवत राहते, की मुलीचे पालक होणे सोपे नाही.

मुळात मुली जात्याच खूप हळव्या असतात, त्यामुळे भावनिक पातळीवर त्यांना समजावून आणि सामावून घ्यावे लागते. पालक आपले कर्तव्य आणि प्रेम यासाठी शिक्षण आणि लग्न यावर भरपूर खर्च करतात आणि काही वेळेस तो कर्ज काढून करतात; पण यात जावई आणि मुलगी आपल्या पालकांची बदललेली आर्थिक घडी याचा किती विचार करतात?

माझ्या एका मैत्रिणीचे बोल मला प्रातिनिधिक वाटतात. तिच्या दोन्ही मुली सुविद्य आणि नोकरी करणाऱ्या. चांगली स्थळे आली म्हणून त्यामानाने लवकरच त्यांची लग्ने करून दिली. पुढे लग्नानंतर दोन्ही जावयांनी मुलींना नोकरी सोडावयास सांगितले. कारण, काय तर आर्थिकदृष्ट्या त्यांना त्यांच्या नोकरीची गरज नव्हती. ही मैत्रीण उदासपणे मला म्हणत होती, की आम्ही मुलींना कर्ज काढून शिकवले. त्या दोघी खूप हुशार आहेत; पण... आता बघ कशा घरात बसल्यात.
आम्ही कर्ज काढून मुलींना शिक्षण देतो, प्रसंगी त्यासाठी परदेशातही पाठवतो आणि त्यांची लग्न झाली की, सगळी समीकरणेच बिघडतात. किती मुली लग्नानंतर पालकांचा आर्थिक भार उचलतात? फारच कमी.

आपला समाज काळानुसार बदलत चालला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह व्हायला लागलेत. जुनाट कालबाह्य रूढी, परंपरा नजरेआड होत आहेत; पण.. किती लग्न खर्चात वधू-वर पक्ष समान वाटा उचलतात किंवा किती उच्चशिक्षित वधू-वर आपापल्या पालकांना हे करायला भाग पाडतात? आपल्या समाजाची पूर्वापार मानसिकताच अशी बनली आहे, की कुणीही मुलाकडच्यांकडून अपेक्षा ठेवत नाहीत आणि वर हमखास सांगितले जाते. की मुलीकडचेच हौसेने करत आहेत.
थोडक्‍यात काय, तर मुलींच्या आई-वडिलांनीच मुलीच्या लग्नानंतर आपल्या बॅंक बॅलन्सची काळजी करत बसायचे. मुलीच्या लग्नादरम्यान पालक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले असतात. मुलीच्या प्रेमाखातर आणि सामाजिक खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नात भरमसाट खर्च केलेला असतो. नंतर स्वतःच्या दुखण्याखुपण्यासाठी, वेळप्रसंगी आकस्मिक खर्च भागवायला मुलीकडे किंवा जावयाकडे मोकळेपणाने पैसे मागता येत नाहीत. किती मुली समजून घेऊन मदतीचा हात पुढे करतात? फार कमी. कारण, त्यांना त्यांच्या संसाराला प्राधान्य द्यायचे तर असतेच; पण मदत करायची झाली तर जावयाला ती प्रथम आपल्या आई-वडिलांना करायची असते.

सध्याच्या काळात शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी यामुळे जावई-मुलगी कमालीचे "इगोयिस्ट" झालेत आणि त्यांची जीवनशैली बदलली आहे. तसेच त्यांच्यात सोशिकताही कमी झाली आहे. जरा काही बिघडले, की घटस्फोटाची भाषा सुरू होते. या परिस्थितीत मुलीचे पालक भरडले जातात. कारण, ही मुलगी बहुधा घटस्फोटाची भाषा आई-वडिलांच्याच जीवावर करत असते. कुणाचीही मुलगी घरी परत येते, ही बाब क्‍लेशदायक असते. अशा पालकांपुढे किती यक्षप्रश्‍न उभे राहत असतील? मुलगी एकटी असेल तर परिस्थिती सोपी असते; पण जर मुलीला अपत्य असेल, तर प्रश्‍न प्रचंड गंभीर होतो. कारण, या सर्वांच्या संगोपनाचा भार पालकांवर पडतो. मुलगी जर नोकरी करणारी असेल, तर थोडा दिलासा असतो; पण जर ती कमावती नसेल तर?
घटस्फोटाच्या प्रक्रियेला मुलाच्या पालकांनाही भावनिक धक्का बसलेला असतो. तो प्रामुख्याने सामाजिक कारणांसाठी असतो; परंतु मुलीच्या पालकांना या प्रश्‍नापेक्षा अधिक मोठ्या समस्या हाताळायच्या असतात. या काळात मुलगी आणि नातवंडं मानसिकरीत्या खचलेले असणार. म्हणजे, त्यांना भावनिक आधार देऊन उभे करणे हे जिकिरीचे काम.

घटस्फोट झाला, की मुलांचे पुनर्विवाह त्यामानाने लवकर होतात; परंतु त्या मुलींचे काय? अपत्यासकट तिला स्वीकारणारे फार कमी. आपण घटस्फोटाची प्रकरणे पाहिली तर मुलीच्या पालकांवर एक आरोप असतो, की त्यांचा मुलींच्या संसारात सततचा हस्तक्षेप. "काळजी" आणि "हस्तक्षेप" यामध्ये फरक आहे. माहेरच्यांची काळजी हा सासरच्यांना हस्तक्षेप वाटतो; पण असा हस्तक्षेप सासरची मंडळी करत, असतील तर तो त्यांचा कौटुंबिक प्रश्‍न असतो. म्हणजे, मुलीचे प्रश्न हे माहेरच्यांचे कौटुंबिक नसतात?
शेवटी मला आग्रहाने सांगायचे आहे, की सुनेला लेकीसारखे वागवा. अन्यथा घर सुने सुने व्हायला वेळ लागणार नाही.

loading image